आपण आपला म्हणतो तो समोसा आपला नसून मूळचा आफ्रिकेचा आहे. मोदकांसारखे momos चीन आणि तिबेट या देशांतही केले जातात, पिझ्झा हा इटलीचा नसून अमेरिकेचा आहे. आपण आज नेहमीच खात असलेले ज्वारी, बटाटे,मिरच्या आणि अश्या अनेक गोष्टी मूळ आपल्या नाहीतच हे ह्या पुस्तकात वाचल्यावर आश्चर्यच वाटले. शेतीच्याही आधी माणूस शिकार कशी करत होता? त्याकाळी एखादी मोठी शिकार मिळाली की ती वाजत गाजत कशी गावात आणली जात असे आणि त्याचा कसा समारंभ होत असे याचे मनोरंजक वर्णन लेखकांनी ह्या पुस्तकात केले आहे. सुमारे इसवी सनपूर्व दहा हजार वर्षांपूर्वी पासून तर आजतागायतचा अन्नाचा इतिहासाचा खजिनाच जणू हे पुस्तक आहे. अश्मयुगीन माणूस आपल भटक जीवन जगत असताना शिकार कशी करायची त्यानंतर आगीचा शोध, मग हळू हळू त्याची शेतीकडे होणारी वाटचाल, पशुपालन आणि त्या मागचा इतिहास. पशुपालन पासून दुधाचा लागलेला शोध आणि त्यानंतर ते आपल्या दैनंदिन आहारात त्याचा कसा समावेश झाला. बीयर चा शोध त्यानंतर भांडी आणि अग्निचा वापर करायला माणूस कसा शिकला. ब्रेड, तेल, तूप,चरबी,मीठ,मसाले,साखर,मद्य,कॉफी,चहा,चॉकलेट आणि सोडा ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास ह्या पुस्तकामध्ये अत्यंत रंजक पद्धतीने सांगितला आहे, त्यातल्या ह्या काही रंजक गोष्टी.... 👉ओटोमान मध्यपूर्वेमध्ये साम्राज्याच्या वेळी असणाऱ्या ओव्हन्सला 'तंदीर' असं नाव होतं. या तंदीरमध्ये ब्रेडचे शेकडो प्रकार करता येत होते. हे तंदीर सिलिंडरच्या आकाराच्या उभट भट्ट्याच होत्या आणि त्याच्या आतल्या बाजूला ब्रेडची कणीक चिकटून यात ब्रेड तयार करायचे. अगदी अशाच प्रकारच्या भट्ट्या आज आपण हॉटेल्स आणि धाब्यांच्या बाहेर पाहतो आणि ते नावही आपण तंदीवरूनच अपभ्रंश करून तंदूर केलं. 👉गव्हाच्या कणकेत सोअर-डो स्टार्टर घातलं की ब्रेड का फुगतो हे मात्र कुणालाच कळत नव्हतं. त्याला लोक जादू तरी मानायचे किंवा धार्मिक गोष्ट तरी मानायचे. शेवटी गॅलिलिओ आकाशाचं निरीक्षण करत असताना अँटोनी फॉन लिव्हेनहूकनं आपल्या सभोवतालच्या वस्तूंवर काही सूक्ष्मजीव तरंगत असलेले पाहिले. त्याला त्यानं 'ॲनिमलक्यूल्स' असं नाव दिलं. त्यानंतर १८४० मध्ये लुई पाश्चरनं ते यीस्ट असतात आणि त्याच्यामुळेच ब्रेड फुगतो आणि बिअरही यांच्यामुळेच तयार होते हेही त्यानंच सांगितलं. 👉कोलंबस म्हणा किंवा बास्को द गामा म्हणा, हे लोक कोणत्या कुतूहलानं आणि कोणत्या जिद्दीनं अनोळखी आणि बेभरवशाच्या प्रवासाला निघाले असतील ? आपल्या प्रांताच्या पलीकडचा प्रांत कसा आहे? तिथली माणसं कशी आहेत ? तिथली भाषा, अन्न, संस्कृती कशी आहे? या सगळ्या उत्सुकतेपोटी माणूस वेगवेगळ्या देशांत जाऊन तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होता.