डॉ. मीना प्रभु म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जसं आनंदी स्मित त्यांच्या मुखावर सतत विलसत असतं तसं त्यांचं लेखन कागदावर फुलत असतं. सभोवतीचं जग त्या आपल्या डोळ्यांनी निरखीत असतात आणि कागदावर उमटतो गद्यातील स्वभावोक्ती अलंकार, आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी सहारा वाळवंटासारखे रुक्ष प्रदेशसुद्धा ओअॅसिस बनवून टाकले आहेत. त्यांची पुस्तकं केवळ प्रवासवर्णनं नसतात तर कधी बोटाला धरून तर कधी मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून त्या आपल्याला बरोबर घेऊन जातात.
सौंदर्याचा वेध घेत घेत त्यांची लेखणी चालत असते. त्या नावाप्रमाणे साक्षात शब्द-प्रभू आहेत. त्यांच्या लेखनात कुरुपतेला वाव नाही. नचातुर्यार्थ कलाकामिनीङ हा ज्ञानेश्वरांचा शब्द त्यांचं लिखाण वाचणाऱ्या रसिकांना नक्की आठवेल असे मला वाटते. निसर्गप्रेमी बालकवी ठोमरे जर आज असते तर त्यांच्या फुलराणीनं मोगऱ्याची फुलं घेऊनच मीनाताईंचे स्वागत केले असते. आजपर्यंत जवळजवळ चार हजार पानं वाचकांपुढे ठेवून त्यांनी मराठी माणसाला जगाची सुंदर ओळख करून दिली आहे. नव्हे, मराठी साहित्यात नवे दालन खोलून ते एकहाती भरघोस केले आहे. मराठीच काय इंग्रजी वा अन्य कुठल्याही भाषेत, कोणत्याही लेखकानं इतकं प्रचंड काम प्रवासवर्णन प्रकारात केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही!
Meena Prabhu is an acclaimed author of Marathi travelogues. She lives in London.
मीना प्रभुंचं "ग्रीकांजली" हे प्रवासवर्णन पुस्तक वाचून संपलं. बरेच दिवस झाले वेळ मिळेल तसे वाचत होतो. त्यांच्या इतर पुस्तकांसारखंच हे पुस्तक सुद्धा छान आहे! साऊथ अमेरिकेतील बहुतेक देशांप्रमाणे ग्रीस मध्येही मीना प्रभु एकट्याने फिरल्या. तिथे त्यांना अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या.
दोन वर्षांपूर्वी "इंद्रायणी सावकार" यांचं "असा होता सिकंदर" हे अलेक्झांडरच्या जीवनावरचं पुस्तक वाचलं होतं, तसेच पूर्वी सोनी टीव्हीवर "पोरस" सिरीयल बघितली होती त्यातही अलेक्झांडरच्या जीवनाबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली, त्यामुळे ग्रीकांजली वाचायची उत्सुकता खूप होती आणि पुस्तक वाचायला शेवटी 2020 नोव्हेंबर डिसेंबरचा मुहूर्त लाभला.
लोकशाही, ऑलिम्पिक, मॅरेथॉन, लिपी, नाटक, शिल्पकला अशा कितीतरी गोष्टींची सुरुवात ग्रीकांनीच केली. आपले आणि ग्रीकांचे पुराणकथेतील देव यांच्यात खूप साम्य आहे. जग जिंकायला निघालेला सम्राट अलेक्झांडर, तसेच सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टाँटल हे तत्वज्ञानी तसेच पायथागोरस हा भूमितीतज्ञ पण इथलाच! स्पार्टा आणि "ट्रोजन हॉर्स"ची कथा इथलीच! इसापनीतीचा जन्म इथलाच. स्पार्टाच्या अद्भुत स्पार्टन लोकांबद्दल वाचून खूपच आश्चर्य वाटले. इंग्रजीतील चाळीस टक्के अल्फाबेट आणि शब्द ग्रीक मधून आलेत. काही ग्रीक शब्द संस्कृतमधून आलेत. ग्रीसच्या थिब्जमधली स्त्रीचं तोंड, सिंहिणीचं अंग आणि पाठीवर पंख असलेली जगप्रसिद्ध स्फिंक्स पण इथलीच! पण स्फिंक्सचा मोठा पुतळा मात्र इजिप्तमध्ये आहे असं ऐकलं आहे.
"अलेक्झांडरच्या पण आधीपासून आर्य लोक ग्रीसमध्ये गेले होते त्यामुळे त्यांच्या आपल्या पुराणकथांमध्ये खूप साम्य आहे", "ग्रीसमध्ये ऑलिव्ह खूप आढळतात, तसेच तिथले लोक वांग्याचे भरीत पण खातात" ही आणि अशा प्रकारची भरपूर माहिती यातून मिळते. ग्रीस देश हा अनेक छोट्या मोठ्या बेटांनी बनलेला असून त्याच्या डावीकडे इटली, उजवीकडे तुर्कस्तान, खाली इजिप्त आहे. ग्रीसचे पारंपरिक हाडवैरी देश म्हणजे तुर्कस्तान आणि पर्शिया (आताचा इराण)!
एकूणच प्रवासाची, भूगोलाची आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी ग्रीकांजली वाचायलाच हवे.
जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे ग्रीक संस्कृती. पाश्चिमात्य जगाच्या सर्व कलांना, जीवनाला या संस्कृतीने व्यापले आहे. या पुस्तकात लेखीकेबरोबर प्रवास करतांना त्यांची संस्कृती, पौराणिक कथा आपल्यासमोर उलगडत जातात. ग्रीक आणि भारतीय संस्कृतीतले साम्यही काही ठिकाणी कळते. अर्थात ग्रीक संस्कृती एका पुस्तकात सामावणे केवळ अशक्य पण थोडक्यात आढावा घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.