#bookreview
पुस्तकाचे नाव - वामन परत न आला
पुस्तक प्रकार - विज्ञानविषयक कादंबरी
लेखक - जयंत नारळीकर
प्रकाशन - मौज प्रकाशन गृह
मूल्य - १७५
पृष्ठ संख्या - १३३
डॉ. जयंत विष्णू नारळीकर. जागतिक विज्ञान क्षेत्रातील एक आघाडीचे आणि नावाजलेले नाव. नारळीकरांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान आपण सर्व जाणतोच पण त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाकडे आपल्याला कानाडोळा करता येणार नाही. मराठी साहित्यात अनेक प्रकार खूप मजबूतपणे हाताळले गेले आहेत त्यात विज्ञानविषयक लिखाण जरी कमी असले तरी ती कमी नारळीकरांनी आपल्या मुक्त आणि विशिष्ट अशा शैलीने भरून काढली आहे अस म्हणता येईल.
आधुनिक विज्ञानाच्या आधारावर भविष्यवेधी कल्पकतेने रचलेल्या मानवी जीवनातील संभाव्य घडामोडी डॉ. नारळीकर यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये व्यक्त होतात. अशाचप्रकारे नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून फुललेली, विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ व भक्कम पायावर उभी असलेली, कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेली, वरवर चकव्यासारखी वाटणारी पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणारी कादंबरी म्हणजे 'वामन परत न आला'
एकंदर बदलत्या कृत्रिम जगात वावरत असतानाची ही गोष्ट आहे. मानव जातीच्या वाढत्या अशा अपेक्षा आणि कृत्रिम रोबोट यांची ही गोष्ट. या रोबोट सोबत पुढे जाणारी ही कहाणी अनेक वळणं घेत पुस्तकाचे रहस्य उलगडते. नारळीकरांनी पुस्तकात हाताळलेल्या पात्रांवर मानवांच्या स्वभावाचा असर तर आहेच पण विज्ञान युगात घडू शकेल अशा विविध घटनांचा नकळत आणि अनपेक्षित असा प्रभावही आहे.वाढत्या कृत्रिमतेचा भाव,आभाव,परिणाम,दुष्परिणाम या साऱ्यांनी तयार केलेले कोतवाल पुस्तकात नक्कीच गुंतवून ठेवते पण हे सर्व असताना पुस्तकातील विनोदवादी विरंगुळा कायम राहतो त्यामुळे पुस्तक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
नारळीकरांच्या कल्पकतेच्या रसायनाने विज्ञानाच्या क्षेत्रातील माणसांचे भावविश्व, त्यातील नाट्यपूर्ण संघर्ष, त्यातील गूढ रहस्यमयता आणि मानवाच्या हिताची अंतिम मूल्यदृष्टी या सर्वांचे एकत्रित दर्शन देणारी ही कादंबरी आपण सर्वांनी वाचावी हेच आत्मनिवेदन.
- ©®गायत्री😇