● पुस्तक - पूर्वरंग
● लेखक – पु. ल. देशपांडे
● साहित्यप्रकार – प्रवासवर्णन
● पृष्ठसंख्या – २४५
● प्रकाशक – श्रीविद्या प्रकाशन
● आवृत्ती - ३०वी । प्रथम आवृत्ती - १९६३
● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी
पु. ल. देशपांडे.. महाराष्ट्राला पडलेलं एक मार्मिक, निरागस स्वप्न.. पुल म्हंटलं की आपल्याला चितळे मास्तर आठवतात, नारायण तसेच नामु परीट आठवतो आणि आठवतात नाच रे मोरा चे बोल आणि संगीत.. आपल्यातील बहुसंख्य वाचकांना पुलंची फक्त विनोदी लेखक ही एकच बाजू माहीत असते. पण पुलंनी चतुरस्त्र लिखाण केलेलं आहे.
पूर्वरंग हे प्रवासवर्णन त्यातील एक अविष्कार.. हे पुस्तक, भारताला आणि पूर्वेकडच्या देशांना सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या जोडणारा पूल आहे.. पुलंनी अतिपूर्वेकडच्या देशांची सफर केली आणि ते करत असताना प्रत्येक देशातील कला, संस्कृती तसेच भेटलेली माणसं यांचं पूर्वेच्या कॅनव्हास वर त्यांनी रेखाटलेलं चित्र म्हणजे पूर्वरंग..
प्रवासवर्णन लिहिताना वाचकाला गाईड न करता त्याची उत्कंठा वाढवत त्यांना शब्दांच्या आणि अनुभवाच्या नितळ तळ्याकाठी नेऊन सोडण्याची पुलंची शैली आनंद देऊन जाते. हे पुस्तक लिहिताना प्रवास केलेल्या जागेसोबतच तिथल्या माणसांना, खाद्यसंस्कृती तसेच तिथे रुजलेल्या, वाढलेल्या कलेला पुलंनी सतत अधोरेखित केले आहे.. १९६३ मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आजही कालातीत भासतं. जागा कदाचित बदलल्या असतीलही पण आपण स्वतःही भेट देऊनही, पुलंच्या समृद्ध नजरेने जे पाहिलंय ते कदाचितच पाहू शकू..
एखादा प्रसंग आहे तसा आपल्या लिखाणात उतरवण्याची आणि वाचकाला तो अनुभवायला लावण्याची अशी ताकद पुलंच्या लिखाणात आहे..
पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना पुलंचा मिश्किल विनोद मधेच डोकावतो आणि त्या क्षणांसाठी पुलंची निरीक्षण दृष्टी वाचकांना देऊन जातो.
पुलंनी आपल्या या देशाटनात सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, हॉंगकॉंग आणि जपान असा प्रवास करून प्रत्येक देशातील जीवनशैली, तेथील माणसांच्या धार्मिक व आध्यात्मिक संकल्पना, त्यांची कलासक्ती, खाद्यसंस्कृती ई. सहजपणे रेखाटले आहे. महत्वाचे म्हणजे हे करताना त्या त्या देशातील परंपरेशी भारताचे असलेलं नातंही पुलंनी उलगडून दाखवले आहे. म्हणूनच की काय, बाली मधल्या खेड्यातल्या जत्रेत त्यांना गोव्यातील शांतादुर्गेच्या जत्रेची आठवण झाल्याखेरीज राहत नाही..
लेखकाला कालपरत्वे लेखन करावं लागतं, तर काही लेखक काळाच्या पुढे जाऊन लिखाण करतात. सामान्य वाचकांना समजेल, त्यांच्यात अभिरुची निर्माण करेल अश्या शैलीत लिहिणं आणि त्यातही हलके फुलके विनोद विणणं हे पुलंनी सहज साध्य केलंय..
पूर्वरंग चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात प्रसंगानुरूप दिलेली व्यंगचित्रे.. शि. द. फडणीस यांनी शब्दविरहित चित्रांनी ये प्रवासवर्णन सजवले आहे.. ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने प्रत्येक प्रसंगातील विसंगती टिपून अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले आहेत.. पुस्तक वाचताना ही चित्रे लगेच त्या प्रसंगाचा सार वाचकाला सांगत , वाचनाचा अनुभव समृद्ध करतात..
पुलं म्हणतात “प्रवासाला निघताना विद्वत्तापूर्ण तयारी करून निघू नये.. मनाची निगेटिव्ह कोरी असावी म्हणजे सुंदर चित्रे उमटतात..” प्रवासवर्णने किंवा इतर पुस्तके वाचताना, वाचक म्हणून आपणही मनाची निगेटिव्ह अशी कोरी ठेऊन वाचलं तर आपल्या मनावर नानारंगी अनुभवाची आणि नव्या क्षितिजांची चित्रे नक्कीच उमटतील..
अशी ही पूर्वेकडची यात्रा संपवून, अक्षरांचे धनी असलेल्या पुलंनी, वाचकांसाठी या पुस्तकाचे मावंदे घातले आहे.. ते गोड मानून घ्यावं अशी विनंती पुलंनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत केली आहे.
पुलंच्या अनुभवांनी समृद्ध झालेलं हे प्रवासवर्णन
नक्कीच वाचा..!!
©पुस्तकायन