उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य, लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह जगन्मान्य कवी कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलाय. सुरेख काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या घरात, हृदयात व मनातही जपून ठेवावा असाच आहे.
वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातुन पास झाले.
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धर्नुधारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.
१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भूरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले. 'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले.
कुसुमाग्रज एक आगंळ व्यक्तिमत्व त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळीचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
साहित्यसूर्य मावळला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरच प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे. अशा ह्या देवस्वरूप व्यक्तिमत्वाला आमचे कोटी कोटी प्रणाम.
एका ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाने दुसऱ्या ज्ञानपीठ विजेत्या लेखकाच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे आणि ते प्रकाशित करणे हा योगायोग या सम हाच..!!
१९४२ च्या प्रथम आवृत्तीत वि. स. खांडेकरांनी दिलेल्या प्रस्तावानेरूपी अर्ध्यदानातच या काव्यासंग्रहाची उंची आपल्यास कळते..
काव्य हा माणसाच्या सभोवतालच्या परिसराशी असलेला संवाद आहे ही कुसुमाग्रजांची कवितेची परिभाषा या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत प्रतीत होते.. समजायला अगदी सोपी व सहज उलगडणारी कविता जी काही वेळा मनातल्या तमात असंख्य आशावादी राविकिरणांचा वर्षाव करते तर कधी परिस्थितीच्या वास्तववादचे चटके ही देते..!! हीच कविता कधी कोलंबस चे गर्वगीत आपल्याला ऐकवते तर कधी वेडात दौडलेल्या सात मराठी वीरांची शौर्यगाथा कथन करते..
समाजातल्या प्रत्येक विषमतेवर फक्त धुमसत न राहता कुसुमाग्रजांच काव्य त्यांवर अग्निबाणांचा वर्षाव करत सुटतं. लिलाव, बळी ह्या कविता तर जणू शतकानुशतके चालत आलेल्या शोषनांवर कवीने उघडपणे केलेले भाष्य आहे.. कुसुमाग्रज म्हणतात,
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे! शोधण्याला भाकरीचा घास आला योजने आणि अन्ती मृत्युच्या घासात वेडा सापडे..!!
आणि मृत्यूनंतरही वंचना संपत नाही म्हणून,
भेकडांनो, या इथे ही साधण्याला पर्वणी पेटवा येथे मशाली अन् झडूद्या चौघडे..!!
मानवी आयुष्याच्या अश्या विषम बाजूकडे बोट दाखवत असताना कवीचा आशावाद पण मधेच डोकावलेला दिसतो. म्हणजेच काळरात्रीतून नवीन स्वप्ने घेऊन उष्:काल येणार आहे ह्याची खात्री पण कुसुमाग्रज पटवून देतात.. आपल्या जीविताचे कटाह नेमके कोणत्या विचारांनी काठोकाठ भरायला हवेत ह्यावर कुसुमाग्रज म्हणतात;
नभि लागे तारांचे मोहळ भुलवी त्यांची क्षणिक प्रभावळ रात्रीचे हे आश्रित केवळ ही मशाल त्यावर धरा जरा. हा काठोकाठ कटाह भरा!
वि. स. खांडेकरांनी या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी असे संबोधून हा काव्यसंग्रह मराठी कवितेतील एक भूषण मनाला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती सरसच आहे. कवितासंग्रहाचा शेवट कुसुमाग्रजांनी स्वतःच्या कवितेकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे अधोरेखित करून केलेला आहे..
समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा? जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा, तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा..!!
प्रत्येक काव्यरसिकाने परत परत वाचवी अशी ही काव्यभेट..!!
पुस्तकाचे नाव :- विशाखा कवी :- कुसुमाग्रज पाने :- ११० शैली :- कविता/ काव्य प्रकाशन :- कॉन्टिनेन्टल प्रकाशन पहिली आवृत्ती :- १९४१
उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य, लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह जगन्मान्य कवी कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलाय. ह्यात कविने ५७ बहुमोल कविता साठवल्या आहेत. विशाखा हा कुसुमाग्रजांचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवितासंग्रह आहे. १९४१ साली हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मराठी लेखक तसेच प्रथम मराठी ज्ञानपिठ पुरस्कार विजेते लेखक वि.स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला सुरेख अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. सुरेख काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या घरात, हृदयात व मनातही जपून ठेवावा असाच आहे.
I'm not actually a fan of poetry but I'm a huge fan of this book. Some of these amazing poems make you think about the world which does not even exist. And some of these poems make you cry. It's such a wonderful book.
कविश्रेष्ठाचा सर्वोत्कृष्ट काव्याविष्कार! सामान्य शब्दांच्या गुंफणीतून साधलेल्या काव्यचमत्कृती आणि उभारलेली प्रतिमासृष्टी केवळ कुसुमाग्रजांची प्रतिभाच करू जाणे!