ओंकाराच्या आदिम नादातुन निर्माण झालेला स्वर माणसाने कंठस्थ केला, साचेबद्ध केला. यातुन निर्माण झालं संगीत. त्याला शाश्वत नियमावली लागू करुन शास्त्रीय संगीत जन्माला आलं. हिंदुस्थानी असो कि कर्नाटकी, दोन्ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य शाखा. समजायला थोडं अवघड असेल म्हणुन किंवा आधुनिक संगीताचा पगडा किंवा शान-शौकीचा, खर्चिक विषय म्हणुन सामान्य माणुस फारसा त्या वाटेला गेला नाही.
“नादवेध" च्या निमित्ताने लेखक द्वयीनी या विषयाची अभ्यासपुर्ण व सोप्या शब्दात मांडणी वाचकांसमोर ठेवली आहे.मुख्यतः "हिंदुस्थानी"तील जवळपास ७० रागांची कलाकारांच्या चित्रचौकटीसह दुपानी लेखांतुन निवडक माहिती दिली असल्याने, पुस्तक वाचताना खुप एकाच जागी खुप रेंगाळल्यासारखं होत नाही. शिवाय प्रत्येक राग, त्याचे विशेष,लोकप्रिय हिन्दी/मराठी चित्रपट,नाट्यगीतांची उदाहरणं देऊन हलक्याफुलक्या पद्धतीने समजावला आहे.त्यामुळे माहिती वाचताना वाचकाला हरवल्यासारखं होत नाही. त्याला परिचित संगीताची कास धरुनच त्याचा शास्त्रीय संगीत समजुन घ्यायचा प्रवास चालु राहतो.
स्वतःचा संगीतप्रवास,रागांची ओळख व स्वभाव,त्यावर बेतलेली प्रसिद्ध गाणी,गीतकार,संगीतकार,गायकांचे किस्से/आठवणी, त्याला अनुरूप कवितांच्या ओळी असा रंजक "नादवेध" यात आहे. गानरसिकांसाठी तर हा माहितीचा अद्भुत खजिनाच ठरणार असुन शास्त्रीय संगीताबद्दल जाणुन घेण्याची इच्छा असणाऱ्यानाही या पुस्तकाची बरीच मदत होईल हे सांगणे न लगे !
शास्त्रीय संगीत, स्वर आणि स्वरांच्या मांडणीतून बनलेले राग यांची माहिती दिली आहे प्रत्येक रागाबाबत लेखकाने अनुभवलेले किस्से सुद्धा जोडले आहेत. शास्त्रीय संगीतातील महान कलाकारांची माहितीही या पुस्तकातून मिळते ज्यांना ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. संदर्भासाठी दिलेल्या चीज, बंदिशी, रचना इंटरनेट वर सहज उपलब्ध होत असल्या कारणाने ज्या रागाबाबत वाचतोय तो राग ऐकत ऐकत वाचल्यामुळे ते अधिक जवळच वाटत. भारतीय शास्त्रीय संगीताची माहिती देण्याचा व वाचकाला एक वेगळी सफर घडवून आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
मित्राने सुचवले. घेतले. वाचले. शास्त्रीय संगीताची मुलभुत बैठक जाणण्यासाठी उपयुक्त. शास्त्रीय संगीत तसे समजण्यास कठीण. आरोह-अवरोह. वादी-संवादी, राग-रागिणी, ध्रुपद, ख़्याल या गोष्टी तसेच मालकंस, भीमपलासी, भैरव, मारवा, मल्हार, बागेश्री ई. राग व त्यातील गाणी दिली आहेत ती YouTube वर ऐकण्यास मज्जा आली. अजुन सुलभ करून सांगता आले असते..