महाभारत, एक सूडाचा प्रवास एक मुदलातून वाचावं असं पुस्तक.
महाभारतावर अनेक लेखकांनी भाष्य केलं आहे, देवदत्त पटनायक आपल्याला आजी अजोबांपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीचं महाभारत सांगतो, सुष्ट आणि दुष्टांचा संघर्ष, सत्याचा असत्यावर विजय वगैरे, एकदम अद्भुत असं. आनंद नीलकंठन कौरवांच्या बाजूने महाभारत सांगतो. भैरप्पा सगळे कौरव पांडव शेवटी कसे माणूसच होते, मर्त्य होते हे सांगतात, युद्धाचं तर बीभत्स म्हणता येईल असे वर्णन आपल्या डोळ्या समोर उभं करतात, त्यांच्या लेखनात सगळच मानवीय आहे, अद्भुताला थारा नाही. थोडक्यात सांगायचं तर महाभारताचा बऱ्याच लेखकांनी अनेक पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न केलाय, पण दाजीनी महाभारत हे गोष्ट रूपानं सांगितलच नाही आहे, ते त्यांचं भाष्य ही नव्हे, त्यांनी महाभारताच विश्लेषण केलंय, अगदी सगळी प्रमुख पात्र घेऊन प्रत्येकाचं विवेचन करून पूर्ण महाभारत हे कसं सूड घेण्यासाठी'च' घडलं होतं हे दाखवलंय.
बोध वगैरे नाही, महाभारत आणि त्यातल्या प्रत्येक पत्राची अक्षरशः चिरफाड केलेली आहे आणि परशुरामा पासून, आंबा, द्रोण, पांडव अगदी अश्वत्थामा पर्यंत सगळेच कसे सूड ह्या एकाच उद्देशा ने पेटले होते आणि त्यासाठीच जगले हे सोदाहरण पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. ह्या अंगाने महाभारताकडे कोणा लेखकाने पाहिल्याचे ऐकिवात नाही.
आणि नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना तर अप्रतिम आहे. विशेष म्हणजे ती सरधोपट प्रस्तावना नसून पुस्तकाची परखड शब्दात समीक्षा आहे. कुरुंदकर अगदी स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात टीकाही करतात. हे सुखद आणि अचंबित करणार आहे. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात लिहिणारे कुरुंदकरही थोर आणि ती प्रस्तावना आपल्या पुस्तकात छापू देणारे दाजी देखील. आजच्या काळात तर सुखद धक्का.