● पुस्तक - डियर तुकोबा
● लेखक – विनायक होगाडे
● साहित्यप्रकार - वैचारिक / आध्यात्मिक
● पृष्ठसंख्या – १६९
● प्रकाशक– मधुश्री पब्लिकेशन
● आवृत्ती - ०७ वी । प्रथम आवृत्ती - २०२२
● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी
● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐⭐
तुकोबा.. वारकरी परंपरेचा मानबिंदू.. विद्रोहाच्या मशालीची वात.. मराठी साहित्यात एक ना अनेक रुपात तुकोबा आपल्याला भेटायला आलेले आहेत. ते आ. ह. साळुंके बाबा यांच्या ‛विद्रोही तुकाराम’ मधून असतील, सदानंद मोरे यांच्या ‛तुकाराम दर्शनातून’ असेल तसेच ‛says tuka’ मधून दिलीप चित्रे यांनी पोहोचवलेले तुकाराम असतील..
डियर तुकोबा लिहीत विनायक होगाडे तुकारामांच्या याच दिंडीचे भोई झाले आहेत.. काळाला भेदून तुकोबाराया ते आपण सर्व वाचक यांना जोडणारा असा हा अभेद्य पूल.. हे पुस्तक हातात घेतलं की संपूच नये असं वाटत राहतं. खरं तर या पुस्तकासाठी विनायक यांचे आभार मानावेत तेवढे कमीच.. आजच्या काळात तुकोबांच्या विचारांच वैश्विक दर्शन घडवणारं, इतकं सहज, सुंदर आणि मनात इंद्रायणीतील तरंगासारखे कल्लोळ उठवणारं हे लिखाण मराठी साहित्याच्या समृद्धीची हमी देतं.
तुकारामांच्या विचारांचं दर्शन घडवत असताना, लेखकाने तीन वेगवेगळ्या विभागात पुस्तकाची विभागणी केली आहे. ती म्हणजे तुकारामायन, मीडिया ट्रायल ऑन तुकोबा आणि डियर तुकोबा..
यातील प्रत्येक विभाग तितकाच सक्षम लिखाणातून साकारला गेलाय.
‛तुकारामायन’ या भागात लेखकाने तुकोबा आणि तुकोबांच्या विचारांची मशाल धगधगत ठेवणाऱ्या आधुनिक युगातील तुकारामांची भेट गद्य स्वरूपात घडवून आणली आहे.. हे करताना त्यांनी आजच्या सामाजिक, वैचारिक परिस्थितीला तुकोबांच्या अभंगाच्या रूपाने प्रस्तुत केले आहे.
त्यात सॉक्रेटिस आहे, साने गुरुजी आहेत, शाहू महाराज आहे आणि अगदी गॅलिलिओ सुद्धा.. हे संवाद लिहिताना लेखकाने या ‛प्रत्येकातील तुकाराम’ सहजतेने अधोरेखित केलाय.
जसे गॅलिलिओ ला धीर देत तुकोबा म्हणतात,
तुका म्हणे छे छे । कसा रे तू गॅल्या ।
लगेच मानला । पराभव ।।
नको सोडू मध्ये । साथ ती सत्याची ।
हमी विजयाची । तुका देई ।
तसेच कर्मवीरांचे कौतूक करताना तुकोबा म्हणतात,
रयत शिक्षण । कर्म मोठे किती ।
पेटविल्या ज्योती । शिक्षणाच्या ।।
झाला वटवृक्ष । दिलीस तू छाया ।
पाखरांना माया । केलीस तू ।
दुसरा भाग म्हणजे ‛तुकोबा ऑन मीडिया ट्रायल.’ आजच्या काळातील सर्व प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडिया यांना तुकोबांच्या काळाशी जोडून, त्यांच्या जीवनातील सगळ्या महत्वाच्या प्रसंगांचे आजच्या काळाशी सुसंगत असे वर्णन लेखकाने केले आहे. यात तुकोबा धर्मपीठाला सामोरे जातात तो प्रसंग वाचताना तुकोबा अगदी आपल्या समोर उभे राहून बोलत आहेत असा भास होतो. वेदांच्या अभ्यासाचा आणि त्यांचा अर्थ लावण्याचा अधिकार सगळ्यांना आहे हे ठणकावून सांगत ते प्रस्थपित वर्णश्राम विरुध्द विद्रोही भूमिका घेतात. हा प्रसंग कालातीत तसेच सांकेतिक भासतो.
खटल्याचा निकाल लागल्यानंतर, तुकोबा कविता इंद्रायणीत बुडवतात. या प्रसंगापासून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकगंगे ने त्याच कविता मनामनात तारून नेईपर्यंत प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्शून जातो..
आणि मग हॅशटॅग ट्रेंड होतो तो हा,
#तुकाम्हणे..!!
तिसऱ्या ‛डियर तुकोबा’ या प्रकरणात लेखकाने तुकोबांना आशयपूर्ण पत्र लिहीत त्यांच्या मनातील तुकाराम वाचकांपर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पत्र म्हणजे आजच्या पिढीचा तुकोबांकडे आणि पर्यायाने आपल्या भूमीच्या संतपरंपरेकडे पाहण्याचा नवा, आशावादी दृष्टीकोन देणारं ठरतं. या पत्रात, वैश्विक विचारसरणी बद्दल तुकोबांना प्रश्न विचारताना विनायक म्हणतात, “तुकोबा, ‛आयतं मिळालेलं’ आणि ‛कमावलेलं’ दोन्हीही शांतपणे पाण्यात सोडून देण्याइतपत ताकद कुठून रे आणली? ना सावकारीचा ‛गर्व’ ना गाथेचा ‛अहं’..!! अहंकाराचं डंख उतरवणारं हे प्रतिविष कुठून कमावलंस??”
या पुस्तकाची जमेची अजून एक बाजू म्हणजे, लेखकाच्या शब्दांना न्याय देणाऱ्या अश्या दर्जेदार रेखाचित्रांची..!! पुस्तकाचं मुखपृष्ठ तसेच प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला असलेली रंगीत चित्रे आणि
प्रसंगानुरूप साजेशी अशी चित्रे, हे पुस्तक वाचण्याचा अनुभव समृद्ध करतात..
अश्या या वेगळ्या धाटणीच्या पुस्तकातून
विनायक होगडे यांना समजलेले तुकोबा त्यांनी वाचकांसमोर आणले त्यासाठी त्यांचे आभार.. सरतेशेवटी त्याबद्दल,
बरे झाले विनू |तुका आणला भेटीस
गाथा तुकोबांची | उमगली ।
बरे झाले केला | हा अट्टहास |
विवेकबुद्धी ही | समृद्ध केली |
लेखक म्हणतात तसं, तुकाराम म्हणजे संवेदनशीलता.. आणि तीच जपली गेली पाहिजे.. त्यासाठी अशी अजून पुस्तके यायला हवीत.
तुकोबांच आधुनिकतेच्या दुर्बिणीतून दर्शन घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा..
©पुस्तकायन