बारोमास मध्ये एका शेतकरी कुटुंबाची सध्याची परिस्तिहि दिलेली आहे. एका ग्रामीण युवकाची अवस्था कशी असते त्याचे बरोबर चित्रण केलेले आहे. शेतकरी कुटुंबातील युवक शिकून जेव्हा नौकरी नाही मिळवू शकत तेव्हा त्याचा मनाची कशी उलघाल होते ह्याचे खूपच सुंदर चित्र लेखकाने रेखाटले आहे . एक ग्रामीण भागातला शिकलेला युवक कशा दुर्लाक्ष्यात आहे हे आपल्याला जाणवते. आपला शेतकरी अजून पण किती निसर्गावर अवलंबून आहे आणि हे चांगले की वाईट हे आपले आपण ठरवैचे. अति ह्यब्रीद गोष्टी वापरून आपण कसे अधोगती कडे चाललो आहोत हे पण लेखकाने दाखवले आहे .
शेतीवर आधारित ग्रामीण जीवनाचं भयाण वर्णन कादंबरीतून अनुभवायला मिळत . एकनाथ नावाच्या सुशिक्षित बेरोजगाराची शोकांतिका अतिशय योग्य प्रकारे मांडली आहे . प्राणी-पक्षी आणि माणूस यांतील नाते खूप सुंदर तर्हेने दाखवण्यात आलंय . भ्रष्टाचारी शासनकर्ते , निर्लज्ज राजकारणी , नोकरी मिळवण्यासाठी चारावे लागणारे पैसे , निसर्गाची अवकृपा , शेतकऱ्यांच्या दैनंदिन कौटुंबिक समस्या आणि लुबाडणारे व्यापारी याचे हुबेहूब वर्णन वाचताना डोळ्यासमोर उभे राहते . शहरात राहणाऱ्या नोकरदार वर्ग आणि खेड्यात राहणाऱ्या "खऱ्या दलितांमधला " फरक अलका (एकनाथची बायको ) आणि एकनाथ यांच्यारूपाने मांडण्यात आला आहे .
खेड्यापाड्यातलं आयुष्य जगलेल्या/जगणाऱ्यांसाठी आरसाच आहे बारोमास. फक्त शेतकरी असणं हे किती भयानक आहे ते दाखवुन देतं. जात्यातल्या शेतकऱ्यांवर तुच्छ कटाक्ष टाकणारे स्वतः सुपात आहेत आणि शेतकरी वाचला तरच ते वाचणार आहेत याची जाणीव करुन देणारी वास्तवदर्शी कादंबरी.
या वास्तवदर्शी ग्रामीण पार्शवभूमी असलेल्या कादंबरीचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन 'व्यथा', हाच शब्द त्यासाठी जास्त समर्पक होईल. एका शेतकरी कुटुंबाची कहाणी सांगणारी कथा आपल्याला यापूर्वीही अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून दिसल्यामुळे तशी बऱ्यापैकी परिचित आहे. पण या कादंबरीचं वेगळेपणा लेखकाने केलेल्या या चिरपरिचित कथेच्या मांडणीतून दिसतो. उपरोलिखित बहुतेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट जिथे शेती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कथेचा समूहाच्या पातळीवर विचार करतात, तिथे हि कहाणी एका कुटुंबाला मध्यभागी ठेवून त्याच्या आसपास असलेल्या समाजाबद्दल भाष्य करते.
कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा भारताचा शेती इतिहास मोठा आहे. ज्याच्या भरवशावर हा इतिहास लिहिला गेला , ज्याने इंग्रजांना कर्जात ठेवले तो आज कर्जापायी आत्महत्या करतोय हे सत्य आहे, आणि भविष्यात घडणाऱ्या अनिष्टाचं भाकीत. "बारोमास" ,सदानंद देशमुख लिखित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी , शेतकरी आणि शेतीचे वास्तव ह्यांचा अनुभव देते. सहज सोपी आणि बोलीभाषेतील कथात्मक वर्णन, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. भारतीय कृषिव्यवस्था म्हणण्यापेक्षा भारतीय समाजव्यवस्था आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत चालत असलेल्या राजकीय घडामोडींचे शेतकरी कसे बळी ठरतात. नोकरदार वर्ग, इतर सुशिक्षित आणि शहरी वर्गामध्ये शेतकऱ्यानंप्रति असलेली मानसिकता हे आश्चर्य नसले तरी वाईट आहे.लायकी असून सुद्धा व्यवस्थेचे बळी ठरलेले एकनाथ सारखे ,सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण शेतकरी तरुण हे शेतीतील भविष्याची छवि आहेत. नानूआजा शेवंता माय अन् सुभानराव सारखे अशिक्षित परंतु अनुभवी व्यक्ती शेतीतील बदलत्या आणि कोलमडणार्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतात. शेतकरी पुत्रांच्या विवाहाचा मुद्दा सुद्धा त्यात अधोरेखित करावा असा आहे. मंगला च्या नवर्याने केलेली आत्महत्या ही अपराधभाव, आर्थिक विवंचना ह्यातून घडलेली हकीकत आहे. नरुकाका सारखे लोक तरुण शेतकऱ्यांना शेतकरी चळवळ सुरू ठेवण्यासाठी जे प्रोत्साहन देतात, शेतकरी संघटनेचा , शरद जोशींचा उल्लेख मला आपलासा वाटणारा आहे. शेती आणि ग्रामीण परिस्थिती ह्यावर लिहिलेली मराठी साहित्यातील उत्तम ठेव ही कादंबरी आहे. नक्की वाचा.