Priya Tendulkar (1954–2002)was an actress, social activist and a writer of Marathi origin, who is most known for her eponymous role in the television series Rajani.
माझ्या आवडत्या स्त्री लेखिकांच्या यादीमध्ये, सर्वांत वर जी दोन नावं आहेत, ती म्हणजे, "मेघना पेठे" आणि "प्रिया तेंडुलकर". निर्भीड, थेट, एक घाव आणि दोन तुकडे असं काही वाचायचं असेल तर, या दोन लेखिकांची पुस्तकं म्हणजे एक पर्वणीच. या पुस्तकातल्या साऱ्याच कथा खूप आवडल्या. कुठलेही आढे-वेढे न घेता, आपणं असं लिहिलं तर लोकं आपल्या बद्दल काय विचार करतील किंवा आजच्या भाषेत आपल्या इमेज च काय?, या सर्वांच्या पलीकडे जाऊन प्रिया तेंडुलकर यांचं लिखाण आहे.
काल प्रिया तेंडुलकरांचं “पंचतारांकित” वाचलं. खरं तर पुन्हा वाचलं असं म्हणावं लागेल, कारण कॅालेजमधे असताना पहिल्यांदा वाचलं होतं.त्यानंतर एकदम आता. आवडलं…तेव्हाही ते तेवढंच भावलं होतं.
एक गोष्ट खात्रीने सांगता येईल की त्यांचं लिखाण खुप वास्तववादी आहे.मोठमोठी वाक्यं, बोजड विचार,कल्पनाविलास यांना इथं थारा नाही.जे दिसलं,अनुभवलं ते रोखठोक लिहलं,पण,ते सरधोपट किंवा नुसतं गुळमुळीत नाही,एखाद्या संवेदनशील वाचकाला नक्की विचारात पाडेल इतकं परिणामकारक आहे.आपल्या अनुभवविश्वातुन तयार झालेली विचारांची स्वतंत्र बैठक आपल्याला त्यांच्या लेखांतुन दिसेल.
ऐंशी-नव्वदचं दशक दुरचित्रवाणी व जाहिरातींचंच म्हणावं लागेल. रेडिओ,चित्रपट,नाटकांच्या बरोबरीने टीव्हीही प्रेक्षकांनी आपलासा केला. घराघरांतला तो एक सदस्यच बनुन गेला.त्यामुळे मालिकेतुन काम करणारे चेहरे लोकांना रोज दिसु लागले व सर्वसामान्यांच्या आयुष्याचा भाग बनुन गेले.
टीव्हीची पोच व क्षमता इतकी जबरदस्त होती की जाहिरात क्षेत्रानेही त्याचा वापर केला नसता तर नवल ! मनोरंजनविश्वातही यामुळे बऱ्याच संधी खुल्या झाल्या.तरुणांना अर्थार्जनाचं नवं साधन टीव्हीवरील जाहिराती व मॅाडेलिंगमुळे उपलब्ध झालं.
मध्यमवर्गाला पंचतारांकित स्वप्नं दाखवायचं काम जाहिरातींनी चोख बजावलं.इतर व्यवसायांप्रमाणं हा ही एक व्यवसायच,त्याचेही काही अलिखित नियम असायचेच.पण जाहिरातींचं जग फसवं,इथं खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे ! हे ही बऱ्याचदा अनुभवास येतं.
जाहिरातीत काम करण्याचे स्वतःविषयीचे अनुभव सांगताना प्रियाताई म्हणतात- नवीन असताना,पैसे कमवायच्या नादात हे सारं कळणं,त्यावर विचार करणं,ठाम मत बनवणं हे सहजी शक्य झालं नाही पण, त्यावेळी नकळत किंवा काम मिळवायच्या चढाओढीत, जाहिरातीत चक्क खोटं बोलवुन घेतलं जायचं, त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पैसे कमवण्याचं एकमेव साधन असल्यानं अशा विचारांना तितकंसं महत्त्वही दिलं गेलं नाही.पुढे जशी समज वाढली,सजगता वाढली,संधीही चालुन आल्या तेंव्हा अशा फसव्या जाहिरातबाजीला त्यांनी ठाम विरोध केला.आलेले गोडकटु अनुभव हातचं न राखता वाचकांसमोर जसेच्या तसे ठेवायचे हे आपल्या स्वभावाला अनुसरूनच प्रियाताईंनी लिहिलंय.त्यांचं सडेतोड व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व त्यांच्या लेखणीतून तद्वतच उतरलं आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या अनेक व्यक्तिरेखा त्यांच्या लेखातून झळकतात.त्यातलं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांचे वडील विख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर, त्यामुळे अलबत ‘तें’बद्दल त्या भरभरून लिहितात. त्यांच्या एकंदर जडणघडणीत ‘तें’चा मोठा वाटा आहे हे सांगणं न लगे. याव्यतिरिक्त रजनीचे दिग्दर्शक बासु दा,“पंचतारांकित”मधील त्यांची काळजी करणारी दोन माणसं एक सिनिअर कॅप्टन अनिल याज्ञिक व दुसरी बिनधास्त मैत्रीण जॅकी हे ही ठळक लक्षात राहतात.
प्रिया तेंडुलकरांचं पुस्तक आणि “रजनी”चा विषय न निघेल तर नवल. आपल्या कारकिर्दीत रजनीची भुमिका किती महत्त्वाची होती हे सांगताना अन्यायाचा प्रतिकार करुन लढा देणाऱ्या “रजनी”ने काय काय दिलं हे ही त्यांनी “रजनीचे दिवस” मधुन सविस्तर सांगितलं आहे.भरभरुन प्रसिद्धी,पैसा,काम,सन्मान हे सारं तर मिळालंच पण त्याबरोबरीने होणारा मनस्ताप,दगदग हे ही बरंच सहन करावं लागलं हे त्या मोकळेपणानं कबुल करतात.
एकीकडे “वास”या लेखातुन गल्लीबोळातल्या घाणीत पडलेल्या बेवारस लहान रुबिनाचा, तिला त्या गलिच्छ विश्वातुन बाहेर काढू पाहणारा,तिचा सांभाळ करु पाहणाऱ्या धडपडणाऱ्या, आपल्या अगतिक मित्राचा त्यांना कळवळा आहे तर दुसरीकडे “पंचतारांकित”हॅाटेलमधे मौजमजेसाठी येणाऱ्या सुखलोलुप उच्चभ्रू लोकांनी स्वार्थापायी केलेलं कर्मचाऱ्यांचं शोषण पाहुन मनात आपसुक उमटणारी चीड आहे.
मध्यमवर्गातुन आलेल्या त्यांच्या सरळमार्गी विचारसरणीला छेद देणारे कितीतरी अनुभव त्यांनी मांडले आहेत.बाहेरुन स्वप्नवत वाटणारं “पंचतारांकित” जगाचं काळं सत्य अलगद समोर आणलं आहे. ते आज आपल्याला नवीन नसलं तरी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडणारं नक्कीच आहे !