प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक , नाटककार . रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ' महाद्वार ' मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली.
इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजीत केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा सादर केली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. रुपमहाल (१९५२) , कणंव (१९६०) , जाण (१९६२) , कातळ (१९६५) , गंधाली (१९७१) , कमोदिनी (१९७८) , आलेख (१९७९) , मधुमती (१९८२) , मोरपंखी सावल्या (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले.
सामाजिक आशयाच्या , ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणा-या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी , माझा गाव , या प्रारंभीच्या कादंब-यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली.
या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या श्रीमानयोगी या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता आधिकच वाढली.
ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंब-यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमानयोगीतील शिवाजी आणि त्यांचे गुरु रामदासस्वामी यांच्या नात्यांना देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (१९८०) , पावनखिंड (१९८०) , कर्णाच्या जीवनावरील राधेय (१९८६) , राजा रविवर्मा (१९८६) , अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंब-या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंब-यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.
गरुडझेप (१९७३) , रामशास्त्री (१९८३) , स्वरसम्राट तानसेन , हे बंध रेशमाचे , कांचनमृग , धन अपुरे , वारसा , स्वामी , आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण , रंगल्या रात्री अशा , सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन , स्नेहधारा , मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले.
पुस्तकाचे नाव - अभोगी पुस्तक प्रकार - कादंबरी लेखक - रणजित देसाई प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस मूल्य - २२० पृष्ठ संख्या - २०२
रणजित देसाई. मराठी साहित्य क्षेत्रातील एक अजरामर नाव. ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’, ‘राधेय’ ह्या त्यांच्या बहुश्रुत कादंबऱ्या न वाचलेला मराठी वाचक म्हणजे विराळाच म्हणावा लागेल.ऐतिहासिक पार्श्वभूमी, ओघवती शैली आणि भरपूर वर्णने ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्यं परंतु ‘अभोगी’ च्या निमित्ताने एक वेगळेच रणजित देसाई वाचायला मिळाले.
'अभोगी' वाचताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत या कादंबरीची रचना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक उलगडत जाते. "नियतीने लादलेल्या, काहीवेळा स्वेच्छेने स्वीकारलेल्या जीवनातल्या अपूर्णतेचा डोळस स्वीकार आणि कलेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरवणारा मूल्यविचार हे या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे".
महेश आणि कैलास या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लेखक स्वजीवनातील घटना, आवडीनिवडी, मंगेशीवरील श्रद्धा, संगीताविषयीची आवड, गायकांवरील निष्ठा व जवळीक, कलेसाठी त्याग करण्याची वृत्ती, उतरत्या वयातील एकाकीपणाचे शल्य, जीवनातील जोडीदारांविषयीचे संमिश्र अनुभव,मृत्यूविषयीचे चिंतन, कलावंत म्हणून वाट्याला आलेले अनुभव याविषयीचा तपशील मोठ्या कौशल्याने मांडताना दिसतो.
आयुष्यभर कितीही सुख मिळालं तरी भुकेला असतो, तो कलावंत. कारण त्याच्यासाठी कलेतून मिळणारे ' दाम ' नाही तर कलेला मिळणारी ' दाद ' महत्त्वाची असते, तीच त्याची भूक असते आणि ती भूक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कलावंत जिवंत असतो. कलावंताचा जन्म तेवढा सोप्पा नाही याची प्रचिती या कादंबरीतून मिळते.
आशयानुरूप सार्थ शीर्षक ही या कांदबरीची आणखी एक जमेची बाजू आहे. शोकात्म भाव, प्रेमातील विव्हलता, तळमळ, अंत:करणातील भावपूर्णतेचे प्रकटीकरण होण्यासाठी 'अभोगी' हा राग उपयुक्त मानला जातो. या कसोट्यांवर प्रस्तुत कादंबरीची सरसता आणि सकसता लक्षात घेणे गरजेचे वाटते.
प्रेम, मैत्री, भक्ती, आदर, विश्वास, मत्सर, विरह, दु:ख अशा अनेक भावना पात्रांबरोबर वाचकाला सुद्धा अनुभवायला लावणारी ‘अभोगी’ ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी हेच आत्मनिवेदन.
निवडक संवाद: "सारेच ओहोळ सागराला मिळत नसतात. काही वाटेतच लुप्त होऊन जातात. पण धाव मात्र थांबत नाही."
"पालथा हात हा नेहमी आशीर्वादासाठी असतो. पसरलेला हात फक्त दानासाठी असतो."
"जीवनाच्या पळवाटा सारेच शोधतात. पण त्यातून समाधान मिळतं का?"
"सप्तसुरांतून गाणं कधीच उपजत नसतं. ते मनातून उपजावं लागतं"
अभोगी ही कादंबरी देसाईंच्या इतर पुस्तकांपेक्षा खूप वेगळी आहे. यात दोन कथा आपल्याला हळुहळू उलगडताना दिसतात. आणि शेवटाकडे येताना त्या एकमेकांत मिसळून जातात. सुरुवातीला कैलास आणि उल्का ही पात्रे महत्त्वाची वाटतात आणि नंतर एका टर्निंग पॉईंट वर केशर आणि महेशची कथा समोर येते.
•
ही कादंबरी मला बऱ्याच अर्थी महत्त्वाची वाटते. देसाईंनी यात खूप वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे. केवळ कैलासचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि त्याने आपली चिंता करू नये म्हणून त्याला खोटी पत्रं पाठवणारी उल्का आपल्याला सुरूवातीपासून जवळची वाटते. स्वतः डॉक्टर असून स्वतःच्या माणसांचा जीव वाचवता न येण्याचं कैलासला आयुष्यभर सलणारं शल्य आणि त्यातून त्याला येणारी निराशा देसाईंनी अत्यंत कौशल्याने मांडली आहे. कैलासचा आणि केशरचा एकटेपणा देसाईंच्या स्वानुभवामुळे जास्त हृदयद्रावक वाटतो. त्याकाळी असलेली टिबी या आजाराची भीती विसरून महेशबरोबर यायला तयार झालेली केशर प्रेमात जरुरी असणारी समर्पणाची तयारी दाखवते. जोगतीण या अघोरी जमातीचीही या पुस्तकाने दखल घेतली आहे. अशा असंख्य विषयांना या पुस्तकात स्थान असूनही कोणत्याही विषयावर अन्याय झालाय असं वाटत नाही इतक्या रास्त प्रमाणत प्रत्येक विषय या अडीचशे पानांच्या पुस्तकात देसाईंनी मांडला आहे.
•
Character development हे या कादंबरीचं महत्वाचं अंग. कैलास आणि महेश यांची development ही वाचकाला धरून ठेवते. केशर आणि उल्का मात्र समजायला सोप्या आहेत. केशरचं महेशवरचं प्रेम सुरूवातीपासून सारखंचं होतं परंतु महेशचं प्रेम समजायला खूप अवघड. केशरच्या ओवळीच्या गजऱ्याची आठवण ठेवून ती सोबत नसताना ते गजरे कुरवाळणारा महेश खरा की क्षणात तिला भविणीची पोर म्हणून तुसड्यासारखा वागवणारा महेश खरा हे ओळखणं अवघड होऊन बसतं. माणसांपेक्षा महेश नेहमीच कलेला महत्त्व देतो आणि कलेपायी सगळ्या जवळच्यांपासून दूर जातो. त्याला स्वार्थी म्हणावं की एक सच्चा कलाकार हे एक कोडंच!
कैलासचही प्रेम खूप निराळं. तरूण वयात आलेलं एकटेपण सतारीच्या सोबतीने विसरणं हे त्यालाच जमावं. महेशच्या गाण्यावरही असलेलं त्याचं प्रेम हे फक्त उल्काच्या आठवणीमुळे होतं की खरोखरीच होत कोण जाणे.
महेशला पूर्णपणे समर्पित असलेली केशर मात्र शेवटी जो स्टँड घेते तो शिकण्यासारखा आहे. एकंदरीत सगळीच पात्र देसाईंनी अतिशय सुंदर पद्धतीने रंगवली आहेत.
• कादंबरीचे शीर्षक हेही अतिशय समर्पक आहे. अगदी अखेरीस महेश कैलासला अभोगी ऐकवतो. त्यात मनमुराद जागा घेतो. अंत:करणातील भावपूर्णतेचे प्रकटीकरण होण्यासाठी अभोगी हा राग उपयुक्त मानला जातो.