गूढकथांना वास्तववादाची जोड देणारे लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ख्याती!
त्यांचं हे, मी वाचायला घेतलेलं पहिलंच पुस्तक. सोळा गूढकथांचा हा कथासंग्रह साधारण दोनशे पानी असावा. (मी किंडल आवृत्ती वाचल्याने त्यात पुस्तकासंबंधी बऱ्याच तपशीलांचा अभाव आहे. आवृत्त्यांबद्दलची माहिती नाही, मुखपृष्ठाचीही नाही…)
पुस्तकाच्या शीर्षक कथेने, अर्थात मृत्युंजयीने कथांची सुरूवात होते. सर्व कथांमधील सर्व पात्रं आणि त्यांच्या अवतीभवतीची वातावरणनिर्मिती मोजक्याच, पण तितक्याच प्रभावी शब्दांत करण्याचं लेखकाचं कसब कौतुकास्पद आहे. पहिल्या तीनही कथा चांगल्या जमून आल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
पण चौथ्या कथेपासून पुढील सात कथांनी माझी निराशा केली. या कथा खूपच औदासीन्य आणणाऱ्या आहेत. यातील “किडे” ही कथा तर वाचलीच का असा प्रश्न पडला. ( वाचकांसाठी सूचना-: या कथेत बलात्कारी माणसाची मनोवृत्ती दाखवून देताना लेखकानं तो प्रसंगही विस्तृत नसला, तरी लिहीला आहे, आणि अशा कथा तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. मला तर ती कथा मुळीच आवडली नाही.) त्यापुढील साधारण सर्वच कथा ( जंगल, हुशारी, टोक-टोक पक्षी, डायरी, प्रियकर, कर्ता-करविता, दु:स्वप्न, रूळ, निरोप, धुके-धुके ) एक प्रकारचा नकारात्मक प्रभाव टाकत वाचकाला सुन्न करतात. बहुधा या प्रत्येक कथेचा शेवट या नकारात्मकतेचं कारण असावं.. उदाहरणार्थ “निरोप” या कथेत आयुष्यभराच्या साथीपेक्षा ( तेही अगदी निरपेक्ष म्हणण्या इतपत ), महिन्याभराच्या जवळीकीला ( या जवळीकीला “प्रेम” म्हटलंय! ) एका अर्थी श्रेष्ठ ठरवलंय!
संपूर्ण पुस्तकातील मृत्युंजयी- भक्ष्य - थांब, मी आलोच! - शिंपल्यातील चांदणी - चमकत्या डोळ्यांचा मुलगा या पाचच कथा मला त्यातल्या त्यात चांगल्या वाटल्या. इतर कथांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत या कथा. पण या पाच कथांसाठी उरलेल्या अकरा कथा वाचण्याची शिफारस, मी करू शकत नाही…😐