What do you think?
Rate this book


263 pages, Unknown Binding
“ जनतेला सत्य समजू न देण्याचा परिणाम नेहमी वैफल्यातच होत असतो. लोकशाहीत कठोर सत्याची सार्वजनिक चर्चा होणे अत्यंत आवश्यक असते. कारण ह्या चर्चा अल्पकाळात कटुता निर्माण करणाऱ्या जरी दिसल्या, तरी दीर्घ काळात याच चर्चा विचार करणाऱ्या वर्गाच्या मनाची जडणघडण बदलून टाकीत असतात. ”
“ अनिष्टांचा त्याग करून इष्टाचा भ्रामक गौरव करणे हा इतिहासाचा उपयोग नसतो. तो इतिहासाचा दुरुपयोग असतो. हलक्या, भाबड्या , स्वप्नाळू श्रद्धा सत्याच्या कठोर अग्नीत परिशुद्ध करून घेणे व अपरिहार्य वास्तवाची जाणीव करून देणे हे इतिहासाचे काम असते. तोच इतिहासाचा उपयोग असतो. या दृष्टीने पाहताना क्रमिक इतिहासात घटनांच्या जंत्रीपेक्षा प्रवाहांची मीमांसा महत्त्वाची ठरली पाहिजे. “
“ माणूस हा मोठा चमत्कारिक प्राणी आहे. तो भुकेच्यापोटी कोणते पाप करणार नाही ? सगळीच पापे करील, हे खरे आहे. पण समोर सुग्रास अन्न वाढून ठेवलेले असतानासुद्धा एकदा हा माणूस हट्टाला पेटला, की भुकेच्या बजनाखाली सारे शरीर क्षीण होत जात शेवटी मरणही पत्करले जाते, पण अन्नाचा स्वीकार केला जात नाही. मानवी जीवनात मूल्यांच्या निष्ठा प्रकृतीवर मात करण्याइतक्या प्रबल असू शकतात. ही काहींच्या ठिकाणी असणारी मूल्यांची प्रबलता सर्वसामान्य मानवी जीवनाचा सार्वत्रिक भाग केल्याशिवाय केवळ पशुत्वाशी तडजोडी करून प्रेरणांच्या दयेवर संस्कृती सुरक्षित होऊ शकत नाही.
गांधींचे सारे तत्त्वज्ञान एक छोट्या सूत्रातून येते. ते सूत्र म्हणजे लढण्यासाठी तलवार आवश्यक असते, पण पुरेशी नसते. तलवारीखेरीज लढण्याची जिद्द असणारे मनही हवे असते. हीच गोष्ट घरालाही लागू आहे. निवाऱ्यासाठी छप्पर आवश्यक असते, पण पुरेसे नसते. छपराखाली राहण्याची इच्छाही आवश्यक असते. राष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी व स्वातंत्र्य अबाधित ठरण्यासाठी संघटना आवश्यकच असते. पण ती पुरेशी नसते. त्यासाठी स्वातंत्र्येच्छ मन असावे लागते, आणि या मनात प्रसंगी मूल्यांसाठी बलिदान देण्याची शक्ती असावी लागते. गांधीवादाचे अर्थकारण वादग्रस्त असू शकते. माणुसकीचा कणा शिल्लक कसा ठेवावा, याचे गांधीवादाने दिलेले उत्तर विवाद्य ठरण्याची वेळ अजून आलेली नाही. आज विज्ञान शस्त्राच्या जोरावर सर्व मानवजात नष्ट करू शकेल इतके बलवान झाले आहे, ही भीतीची खरी बाब नाही. खरी चिंतेची व भीतीची बाब माणूस निर्माण करण्याचे विज्ञानाचे सामर्थ्य वाढत आहे, ही आहे.”
“ तुमचा आमचा संबंधच काय, तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करा, आम्हांला वाटेल ते आम्ही करू, तुमच्या गल्लीत तुम्ही राहा, आमच्या गल्लीत आम्ही राहू, ही सहिष्णुतेची फारच ओबडधोबड व्याख्या झाली. सहिष्णुतेचा अर्थ परिपूर्ण होण्यासाठी एका श्रद्धेची गरज असते. ती श्रद्धा म्हणजे माझ्या विचारातील काही भाग चुकीचा असू शकेल, तो मी दुरुस्त करण्यास तयार आहे. - या भूमिकेला सहिष्णुता असे म्हणतात. सहिष्णुतेचा गाभा म्हणजे नको असणारे सहन करणे हा नसतो. सहिष्णुतेचा गाभा न पटणाऱ्या भूमिकेला सहानुभूतीने समजून घेण्याची तयारी हा असतो.”
“ सत्याग्रह एकीकडे राजकीय लढ्यात लक्षावधींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत होता. तशी संधी सशस्त्र चळवळ उपलब्ध करून देऊ शकत नव्हती. दुसरीकडे सत्याग्रह जनतेचा आत्मविश्वास जागा करीत होता. द्वेषाने पेटलेल्या मनाने अंधारात पोलीसठाणे जाळले तरी जाहीररीत्या सरकारची प्रतिष्ठा तशीच शिल्लक राहते. कारण पोलीसचौकी जाळणारे लोक उघड्यावर येऊन आपला हक्क व समर्थन घोषित करू शकत नाहीत. गांधीजींनी जनतेला जाहीररीत्या इंग्रजांचे कायदे मोडण्याची शिकवण दिली. मोकळेपणाने एकेक कार्यकर्ता कोर्टात सांगत असे की, हा कायदा मी तोडलेला आहे, पुन्हा संधी मिळाली तर तो मी तोडीन. मात्र सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची चळवळ होती, तितकीच कायदा पाळण्याची चळवळ होती. सत्याग्रही तुरुंगाचे कायदे पाळीत. जेलमधून पळून जात नसत. ते पोलिसांशी झटापट करीत नसत. लाठीमारासमोर शांतपणे उभे राहत असत. मालमत्तेचा विध्वंस न करता ते कायदेही तोडू शकत असत, यातनाही भोगू शकत असत. अन्याय्य कायदा जाहीररीत्या निर्भयपणे तोडावा, कायदा तोडल्याबद्दलचे शासन शांतपणे बिनतक्रार सहन करावे, ही शिस्त गांधीजींनी लोकांना लावली. यामुळे निर्भयपणे इंग्रजांना 'देशातून चालते व्हा' म्हणून सांगण्याची मानसिक हिंमत जनतेत आली. लढ्यातून हुल्लडशाही, झुंडशाही, विध्वंस यांची लाट निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यलढ्याची प्रक्रिया या मार्गाने गेली, म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रयोग शक्य झाला.”