Jump to ratings and reviews
Rate this book

Elgar

Rate this book

Unknown Binding

12 people are currently reading
175 people want to read

About the author

Suresh Bhat

13 books12 followers
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.त्यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.

हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी मृत्यू झाला.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
37 (71%)
4 stars
12 (23%)
3 stars
3 (5%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Vishwajeet Gudadhe.
Author 4 books4 followers
March 10, 2020
जीवनाचे समग्र सार : एल्गार (पुस्तक समीक्षण)


"इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते"

अवघ्या दोन ओळींमध्ये मानवी जीवनाचे सारासार तत्वज्ञान मांडणारा हा अजरामर शेर. जो आजही तमाम काव्यरसिकांच्या काळजावर राज्य करतोय. असे अनेक सदाबहार शेर आणि गझला असणारा सुरेश भटांचा 'एल्गार' हा काव्यसंग्रह. एल्गार म्हणजे 'जोराचा हल्ला'. अगदी नावाप्रमाणेच या काव्यसंग्रहात सुरेश भटांनी आपल्या धारदार लेखणीने अवतीभवती घडणार्‍या घटनांवर प्रभावीपणे भाष्य केले आहे. काव्यसंग्रहाच्या प्रारंभीच आपली भूमिका विशद करताना ते म्हणतात...

"साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही !"

जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना असे अनेक प्रसंग येतात जिथे आपल्याला कुणाची तरी मदत भासते. अशा वेळी अगदी मोठ्या भावाप्रमाणे वाट दाखविणार्‍या आणि गरज पडल्यास दोन धपाटे घालून शुद्धीवर आणणार्‍या कविता या काव्यसंग्रहात आहेत. जीवनाचे समग्र सारच जणू त्यांनी या काव्यसंग्रहात मांडले आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली जाती व्यवस्था असो किंवा शिकूनही नोकरीच्या शोधात पायपीट करणारी तरुणाई. प्रत्येक विषयाला सुरेश भट यांनी योग्य न्याय दिला आहे.

"पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही - माणूस कोणता मेला ?”

"देवदूता तुझा पगार किती ?
का मला सांग नोकरी नाही"

आभासी सुखाच्या मागे धावताना माणसाला संस्कार, तत्वे, मुल्य या गोष्टींचा विसर पडत चाललाय. त्याची वृत्ती भोगवादी बनत चालली आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर ती बळजबरीने हिसकावण्यात किंवा त्यासाठी काहीही करण्यात त्याला गैर वाटत नाही. परिश्रम करण्याची त्याची तयारीच नाही. एकंदरीत या भोगवादी वृत्तीमुळे माणसाची पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशा वेळी देवाला जाब विचारताना सुरेश भट म्हणतात...

"हे खून... हे दरोडे... ही लूट... हे दंगे
हे देवते अता का फोटो तुझा मुका ?"

समोर आव्हान दिसताच पळ काढणाऱ्यांना उद्देशून ते लिहितात...

"जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला"

सुरेश भटांनी जेव्हा गझल लिखाणास सुरुवात केली तेव्हा त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. गझल मराठी मातीत रुजावी म्हणून त्यांनी आपले अख्खे आयुष्य वेचले. याचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळून येतात. त्यांच्या समकालीन लोकांनी जरी त्यांना विरोध केला तरी येणारी पिढी नक्कीच आपल्या परिश्रमांचे चीज करेल याची त्यांना खात्री होती.

"मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते"

"जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही !"

लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते हे कालांतराने लोकांवरच जुलूम करायला लागतात. नाईलाजाने जनता हतबल होवून जाते. सर्व काही मुकाट्याने सोसत राहते. परंतु आपल्या हक्कांसाठी सामान्य जनता पेटून उठली तर ते नक्कीच परिस्थिती बदलू शकतात. सुरेश भट अनेक शेरांमधून झुंज देण्याची प्रेरणा देत राहतात.

"काय साधी माणसे बोलून गेली
घेतले सिंहासनाने हेलकावे"

"लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो"

प्रेम हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे. प्रेम म्हणजे दोन जीवांची एकरूपता. प्रेम म्हणजे समर्पण. जीवनात प्रेम नसेल तर इतर गोष्टींना काही अर्थ उरत नाही. म्हणून कवी आपल्या सखीशी, प्रेयसीशी संवाद साधतात. तिला भेटल्यावर होणारी मनोवस्था किती सुंदर शब्दांत टिपली आहे बघा...

"तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते"

"अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली"

अशा शब्दांत दोघांच्या प्रेमातील उत्कटता व्यक्त केली आहे. "सुन्यासुन्या मैफलीत माझ्या..." आणि "केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली" यासारखी अजरामर गीते या काव्यसंग्रहात आहे. एका ठिकाणी मिश्किलपणे आपल्या प्रेयसीला उद्देशून ते म्हणतात...

"जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही"

प्रेम म्हटले की विरह आलाच. विरहावरील या अप्रतिम ओळी बघा...

"हा असा चंद्र... अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी"

कितीही दुःख असले तरी दुःखाचे अवडंबर करण्याची कवीला सवय नाही. जगात आपल्याहून अधिक दुःखी कित्येक लोक असतील. त्यांच्या दुःखाचे निवारण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उगाच दुःखाला कुरवाळत बसू नये असे ते वारंवार सांगतात.

"पाहिले दुःख तुझे मी जेव्हा
दुःख माझे लहानसे झाले"

"आसवांनी मी मला भिजवू कशाला ?
एवढेसे दुःख मी सजवू कशाला ?"

संकटांपुढे हतबल होवून हार मानण्याच्या वृत्तीवर सुरेश भट कडाडून हल्ला करतात. काहीही झाले तरी हार मानू नये. शेवटपर्यंत झुंज देत रहावी. अशी शिकवण ते देतात. त्यांच्या गझलेत एक उत्तुंग आशावाद आहे. त्यांचे शेर आपल्याला प्रयत्नवादी बनायला शिकवितात.

"सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो"

"नेले जरी घराला वाहून पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरू या"

काव्यगुणांचा विचार केल्यास प्रत्येक बाबतीत सुरेश भटांची गझल आघाडीवर आहे. गझल लेखनासाठी त्यांनी विविध वृत्ते लीलया हाताळली आहेत. वृत्तबद्ध काव्य लिहताना विचार आणि वृत्त यांची सुरेख गुंफण त्यांनी केली आहे. मात्रापूर्तीसाठी कुठेही भरीचे शब्द वा शुद्धलेखनाशी तडजोड केलेली आढळून येत नाही. गझला वाचताना एक लय जाणवते. त्यांनी वापरलेल्या नवनव्या प्रतिमांनी त्यांची गझल अधिक उठावदार झाली आहे.

जितक्या ताकदीने ते सामाजिक विषयांवर लिहतात तितक्याच हळुवारपणे ते आपल्या सखीशी, प्रेयसीशी हितगुज करताना दिसून येतात. एकच व्यक्ती सणसणीत टोला लगावणारी आणि अंगावर मोरपीस फिरवल्यागत वाटणारी कविता कशी काय लिहू शकते, हा विचार एल्गार काव्यसंग्रह वाचणाऱ्याला बुचकळ्यात टाकतो. यातून सुरेश भटांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. त्यांची कविता किंवा गझल कुठल्याही एका विशिष्ट विषयापुरती मर्यादित नाही. तिचा सर्वत्र विस्तार झाला आहे. इतकी वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या काव्यात आजही तेच नाविन्य जाणवते. त्यांच्या शेरांचे संदर्भ आजही जसेच्या तसे लागू पडतात. त्यांची कविता कालातीत आहे. नव्या गझलकारांना मार्गदर्शन म्हणून काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला 'गझलेची बाराखडी' दिलेली आहे. हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर वाचक गझलेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.

विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.