The story relates the experiences of a 12-year-old orphan named Ivan Bondarev during World War II.
सारांश : खूप खूप वर्षे युद्ध माहीत नसलेली काही माणसे आहेत. त्यांच्या शहरांवर विमानांनी बाँब टाकले नाहीत, रणगाड्यांच्या चाकांखाली त्यांची पिके चिरडली नाहीत. जवळच्या माणसांच्या मरणाच्या वार्ता घेऊन येणाऱ्या मूक पोस्टमनांनी त्यांच्या घरांची दारे ठोठावली नाही. ह्या माणसांना युद्ध माहीत आहे पुस्तकांमार्फत, चित्रपटांमार्फत, म्हाताऱ्या माणसांच्या कथनामार्फत.
युद्ध माहीत नसलेल्यांना हे पुस्तक कदाचित चकित करील. ज्याने शाळेत जायचे, अभ्यास करायचा, मित्रांबरोबर खेळायचे, असा एक सर्वसामान्य मुलगा रणधुमाळीत अडकला व त्याला सैनिकाचे मरण आले, ही कथा त्यांना वास्तव वाटायची नाही. पण ह्या पुस्तकाच्या नायकाबद्दल तुम्ही जे काही वाचाल, इवान असे रशियन नाव असलेल्या रशियन मुलाबद्दल – ते सर्व खरे आहे.
त्याहून आणखी सांगतो : ही कथा म्हणजे युद्धावरील मुले नामक आश्चर्यकारक वीर - इतिहासाचे एक पान आहे, अत्यंत कठोर सत्याचा एक भाग आहे
युद्ध लढणे पुरुषांचे, प्रौढांचे काम आहे हे सर्वांना माहीत आहे. कोणे एके काळी कदाचित तसेच होते. पण आधुनिक युद्धे - साम्राज्यवादी, आक्रमक - निर्दय आहेत. ही युद्धे ना मुलांची, ना स्त्रियांची, ना म्हाताऱ्यांची गय करतात. ह्या युद्धांमध्ये आक्रमक केवळ सैनिक नसतात, तर खुनी सैनिक असतात.
फॅसिस्ट जर्मनीचे सोविएत संघाविरुद्धचे युद्ध असे होते. अत्यंत कठोर, मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत विध्वंसक युद्ध.
..२१ जून रोजी रात्री उशीरा सोविएत स्टेशन ब्रेस्त इथून जर्मनीला आगगाडी रवाना झाली. मालडब्यांवर खडूने “धान्य” असा छोटा, भला शब्द होता. आम्ही पश्चिमेला धान्य धाडले होते, आम्हाला शांतता हवी होती.
ज्या दिशेला आगगाडीमधून धान्य पाठवले होते, त्याच दिशेने आणखी दोन तासांनंतर, २२ जून १९४१ च्या पहाटेला, आमच्या देशावर पोलादाच्या आणि आगीच्या लाव्हारसाचा वर्षाव झाला. आणि फॅसिस्टांच्या रणगाड्यांच्या झुंडी वाटेत आडव्या येणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करीत सीमा ओलांडून घुसल्या. घरे कोसळली, पिके जळली. सैनिकांशेजारीच लहान मुले ठार झाली.
मुलांचे रक्षण करण्यासाठी, युद्धाच्या आगीच्या ज्वाला जेथे पोहोचणार नाहीत अशा दूर पिछाडीला त्यांना पाठवण्यासाठी, आमच्या लोकांनी कल्पनातीत प्रयत्न केले. मुलांना सर्वप्रथम युद्ध आघाडीपासून दूर नेण्यात आले, त्यांच्यासाठी मोटारींची आणि विमानांची तरतूद करण्यात आली.
पण मोठी माणसे सर्व मुलांना वाचवू शकली नाहीत.
ब्रेस्तजवळच्या जंगलातील एक एकाकी समाधी मला आठवते. खांबाला ठोकलेल्या पाटीवर लिहिलेय: “इथे तान्या झोपलीय." कोण ही तान्या? ती फॅसिस्टांची बळी कशी ठरली? ह्या पुस्तकाचा नायक इवान ह्याच्याप्रमाणेच ती छोटी सैनिक होती, अथवा केवळ ती मायभूमीत जगत-हिंडत होती, उन्हात आनंदाने बागडत होती, म्हणून फॅसिस्टांनी दुष्टपणे तिला ठार मारून टाकले?
शत्रूच्या पिछाडीला अनेक सोविएत मुले होती आणि मोठ्या माणसांच्या खांद्याला खांदा भिडवून ती लढली.
शांतताकाळात ती कणखर बनली होती. अवघड किलोमीटर म्हणजे काय हे त्यांना हे त्यांना कवनांमधून समजले होते, शेकोट्यांपाशी त्यांना रात्र समजली होती. सहनशील होण्यास, अचूक नेमबाजी करण्यास, जखमींना बँडेज बांधण्यास, ती शिकली होती. नवजात सोविएत राज्यासाठी केलेल्या लढाया आठवून मोठ्या माणसांनी त्यांना शिकविले शाळांमध्ये त्यांना शिकविण्यात आले. पुस्तकांनी त्यांना शिकविले.
सोविएत मुलांचे आवडते लेखक आर्कादी गैदार यांनी युद्धाची भेट अशा शब्दांमध्ये घेतली होती : “मला मृत्यूचा तिटकारा आहे. मला बंदूक द्या आणि गोळ्या व संगीन यांच्या साह्यानं मायभूमीच्या रक्षणाला मी जाईन.”
हा धडा आमच्या मुलांना उपयोगी पडला.
युद्धावरची मुले. मोठ्यांना ती ओझे बनली नाहीत. अत्यंत अवघड क्षणी त्यांचे काम हलके करण्याचे सोविएत माणसांनी प्रयत्न केले. मुलांमध्ये अनेक चिवट, निर्भय योद्धे निघाले.
युद्धाच्या शेवटच्या तोफा धडाडल्यानंतरच्या दिवसापासून अनेक वर्षे उलटलीत, पण वालोद्या दूबीनिन, गूल्या कोरोल्येवा, झोया कोस्मोदेम्यान्स्काया, अशा बाल-योद्धयांची नावे लोकांच्या कायम स्मरणात आहेत. आणखी अशी खूप खूप नावे त्यांच्या ध्यानात आहेत.
झोया कोस्मोदेम्यान्स्काया पहिल्यांपैकी एक होती. ती अठरा वर्षांची होती. ती टेहळणीसाठी गेली असताना फॅसिस्टांच्या हाती सापडली. त्या कृश अंगकाठीच्या अबोल मुलीने दाखविलेले धैर्य व निर्धार पाहून फॅसिस्ट थक्क झाले. फॅसिस्टांच्या उलटतपासणीवेळी ती गप्प राहिली, तिचा छळ करण्यात आला तरी तिने स्वतःच्या सहकाऱ्यांचा विश्वासघात केला नाही. नंतर जेव्हा तिला विवस्त्र अवस्थेत, अनवाणी पायांनी, बर्फावरून चालवत वधस्थळाकडे नेण्यात आले, तेव्हा तिने दयेची याचना केली नाही. अत्यंत थंडपणे तिने मृत्यूला स्वीकारले. तिचे नाव अजरामर झाले. त्या नावाने आमच्या मुलांना पराक्रमांना उद्युक्त केले व शत्रूला धडकी भरवली.
वालोद्या दूबीनिन युद्धापूर्वी सहावीत शिकत होता. केर्च येथे भूमिगत गुंफांखाली शत्रूपासून दडून राहिलेल्या पार्तीझानांच्या तुकडीत तो टेहळ्या बनला. हा मुलगा निर्भय होता, चपळ होता, जेथे एकही मोठा माणूस घुसू शकला नसता अशा फटींमध्ये घुसायचा. शत्रूवर सूड घेणाऱ्या लोकांच्या तुकडीला त्याने खूप मदत केली. त्याला वीरमरण आले.
युद्धावरची मुले. अर्थात सर्वांनीच हाती शस्त्रे घेतली नाहीत. अनेकांनी स्वतःच्या शक्तीनुसार मोठ्यांना मदत केली.
लेनिनग्रादमधील मुलांनी स्थापन केलेल्या एका छोटया म्युझियममधील शालेय तक्ता मला आठवतो. त्यात फक्त उत्कृष्ट आणि बरे शेरे होते. आता तसे शेकडो हजारो तक्ते आहेत, पण त्यांना काही म्युझियममध्ये ठेवत नाहीत! पण तो तक्ता होता १९४१-१९४२ च्या हिवाळ्यात लेनिनग्रादमध्ये शिकलेल्या एका मुलीचा शहर जळत होते, शहर उपासमारीमुळे आणि थंडीमुळे मृत्युमुखी पडत होते, शहरावर सतत बाँब व तोफगोळ्यांचा वर्षाव चालू होता, शहराला शत्रूचा पोलादी वेढा पडला ह...