प्रस्तुत कथासंग्रहासाठी निवडलेल्या कथा सोविएत काळातील काही महत्त्वाचे साहित्यिक व त्यांच्या लेखनाचा एक मोठा पट आपल्यासमोर उभा करतात. गोर्कीच्या कथेपासून सुरुवात करून त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोविएत काळातील अनेक संवेदनशील लेखकांच्या १७ कथांचा समावेश या संग्रहात केलेला आहे, हे कथालेखक समाजाच्या विविध स्तरांतून आलेले, त्यांतले अनेक अतिशय गरीव कुटुंबांतून आलेले आहेत. हे वेगवेगळ्या विद्याशाखांचे शिक्षण घेऊन व्यावसायिक जीवन जगत साहित्यनिर्मिती करणारे सर्जनशील लोक आहेत. सोविएत रशियाच्या ऐतिहासिक प्रवासात वाट्याला आलेल्या क्रांती, गृहयुद्ध, दुसरे महायुद्ध, अंतर्गत राजकीय दबाव व संकटे, पिरिखोइका व ग्लासनस्तसारखी राजकीय धोरणे अशा सर्व घटनांत एक नागरिक व साहित्यिक या भूमिकांतून त्यांनी सहभाग घेतला. आपले मातृभूमीवरील प्रेम व पितृभूमीप्रती कर्तव्य यांच्याशी बांधिलकी असणारे जीवन ते जगले आहेत. लहान मुलांच्या भावविश्वापासून प्रेम, विवाह, कुटुंब आणि स्त्री, सामाजिक- राजकीय जीवन, पर्यावरण असे विविध विषय या कथाजगतात चित्रित झाले आहेत. त्यातून एका बाजूला मानवी जीवनाची वैश्विक साम्यस्थळे जाणवतात, तर दुसर्या बाजूला. खास रशियन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्येही समजून घेता येतात.