आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा
मेड इन चायना हे पुस्तक वाचायला घेतले आणि अगदी ऑफिसला सुट्टी मारून एकाच बैठकीत वाचावे अशी तीव्र इचछा झाली. अर्थात आपणच आयोजित केलेल्या काही मिटींग्स असल्याने अश्या बेतास मुरड घालावी लागली. पण हातात घेतल्याक्षणापासून एखाद्या वेगवान सिनेमाच्या पटकथेसारखे हे पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवते.
सुरुवातीला चीनच्या इतिहासाचा, वेगवेगळ्या राजवटींचा अगदी इसवी सन पूर्व पासून महत्वाच्या घटनांचा धावता परिचय करून देते. ताओ, कन्फ्यूशिअस या तत्ववेत्यांसोबत इतिहासातील महत्वाच्या घटना ते राजेशाहीच्या अस्तापर्यंत घेऊन जातात. दरम्यान चीनमधील अफूची शेती आणि ब्रिटिशांचा व्यापार हक्क, चीन जपानचे नाते, झालेली युद्धे आणि त्यातून तैवानची निर्मिती, रशिया चीन संबंध, अश्या आपल्याला बहुतेकदा परिचित नसलेल्या गोष्टीची लेखक आपल्याला माहिती करून देतात.
चीनवर मोठा प्रभाव असणाऱ्या माओंचा उदय, त्यांचे खास असे विरोधाभासी तत्वज्ञान, विविध तत्वे हे चीनच्या विचारसरणीची गूढता आणि जटिलता उलगडून दाखवितात. भारताच्या सीमेपासून, तैवान पर्यंतचा चीनचा विस्तारवाद आणि माओंची तत्वे याची आश्चर्यकारक सांगड अचंबित करणारी आहे. सत्ता हाती येताच केलेले मूलगामी बदल आणि विविध क्षेत्रात जसे शेती, उद्योग, समाज जीवनाची कम्युनिस्ट शैली आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, आव्हाने यांना सामोरे जाणारी धोरणे याचा वृत्तांत छान सांगितला आहे .
पुढे डेंग शियाओपींग, हु जिंताव, जिनपिंग यांच्या कारकिर्दीतील आर्थिक सुधारणा त्यांचे आर्थिक धोरण आणि चीनची निर्याताभिमुख झालेली भरभराट यांचा सविस्तर उहापोह आणि जागतिक घडामोडींच्या पार्शवभूमीवर चीन कसा एकेक पाऊल पुढे जात होता याचे वर्णन आढळते. तसेच आजच्या चीनच्या सुबत्तेचे आणि जगभरातील बाजारपेठा आपल्या मालाने भरून टाकण्याचे रहस्य काही अंशी तरी उलगडते. त्याच बरोबर बौद्धिक संपदे सारख्या जागतिक कायद्यांना दिलेली बगल, आणि बक्कळ निर्यातीतील डॉलर कमाई वापरून अमेरिकी सरकारचे प्रचंड रकमांचे कर्ज रोखे खरेदी करणारे चायना हे सारेच थक्क करणारे आहे.
कम्युनिस्ट राजवट, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रे किंवा इतर माध्यमांवरील जबरदस्त सेन्सॉरशिप, नेत्यांना purge करणे (कागदोपत्री उल्लेख - नोंदी संपविणे) जागोजागी ऑरवेलियन सत्याची जाणीव करून देत असते. क्षी जिनपिंग यांच्या कराल राजवटीतील माहिती तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आपल्याच नागरिकांवर कशी बंधने आणतो याचे वर्णन अंगावर काटा आणते.
सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे शिक्षण आणि आरोग्य हे विषय चीन कसे हाताळत आहे याची याबद्दल थोडी माहिती असायला हवी होती असे वाटते. बदलत्या जागतिक परिस्थितीतील चीन समोरील आव्हाने मांडून पुस्तकाचा समारोप होतो.
लोकशाही पद्धतीने निवडून येऊन प्रत्यक्षात हुकूमशाही पद्धतीने राज्य करणाऱ्या पुतीन यांच्यावरील पुस्तकानंतर आणि मराठीत चीन या विषयावर फारशी पुस्तके नसताना लिहिलेले "मेड इन चायना" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचकांना आपल्या अवघड शेजाऱ्याबद्दल नवीन आयाम मिळवून देते. हा तेल नावाचा इतिहास आहे किंवा अधर्मयुध्द मधली आता बहुपरिचित असलेली शैली वापरण्यात कुबेरांचा हातखंडा असल्याने पुस्तक अत्यंत रोचक आणि वाचनीय बनलेले आहे.
भारताच्या सर्वात कठीण शेजारी राष्ट्राच्या वाटचालीची सविस्तर आणि रोचक मांडणी
गिरीश कुबेर आपल्या लोकसत्ता मधील संपादकीय आणि इतर लेखांमधून अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर मार्मिक लेखन करीत असतात. एकविसाव्या शतकात भारतासाठी आणि त्याचबरोबर संपूर्ण जगासाठी आर्थिक, लष्करी, वैज्ञानिक, राजनैतिक अशा अनेक मुद्यांवर सर्वात मोठे आव्हान उभा केलेला देश म्हणजे चीन. कोणत्याही देशाची पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज बांधायचा असेल तर त्याचा भूतकाळ समजावून घेणे नक्कीच महत्वाचे असते. कुबेरांनी आपल्या पुस्तकात कन्फ़ुशिअस पासून क्षी जिनपिंग पर्यंतचा मोठा कालखंड सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
प्राचीन चीन विषयी काही महत्वाच्या बाबींची या पुस्तकामुळे वाचकांना माहिती होते. Confucious, Taoism, Sun Tzu (Art of war) इत्यादी विद्वानांनी २५०० वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी अद्यापही चीन विसरलेला नाही. राजाने नोकरशाही नेमून राज्यकारभार करायचा ही सुरवात इसवी सनापूर्वी चीनमध्ये झाली. इ.पू. १६५ मध्ये सम्राट वेन याने आपल्या UPSC सारख्या भरती परीक्षा घेतल्याची नोंद आहे!
चेंगीझ खानाचा नातू कुब्लाई खान याने चीनला मोंगोल साम्राज्यात आणले. त्याची राजधानी पेकिंग म्हणजे आत्ताचे बेजिंग होती. ती राजवट युआन नावाने ओळखली जाते आणि तेव्हा पहिल्यादा कागदी चलन वापरात आणल्याने अजूनही चीनी चलन युआन नावाने ओळखले जाते.
पुस्तकात त्यानंतरचे ब्रिटिशांनी लादलेले अफू युद्ध, दुसरे महायुद्ध, जपानचे अमानुष राज्य, चैंग शैक यांचे राष्ट्रवादी आणि माओचे साम्यवादी यांच्यातील संघर्ष यावर थोडक्यात वर्णन आहे. मुख्य चर्चा माओवाद, त्यानंतरचा डेंगवाद आणि आत्ताचा क्षी जिनपिंग यांचा दडपशाहीचा काळ यावर केलेली आहे.
लेखन अतिशय सहज सोप्या भाषेत केलेले आहे. ओघवते लिखाण असल्याने आणि पुस्तकाचा आकार आटोपशीर असल्याने एखाद्या आठवड्यात सहज पुस्तक पूर्ण वाचून होऊ शकते.
पुस्तकातील दोन चुकांना पुढील आवृत्तीमध्ये दुरुस्त करणे आवश्यक आहे. १) चीन आणि ब्रिटन यामधील पहिल्या अफुयुद्धाचे कारण पुस्तकात चुकीचे नमूद केले आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात अफू उत्पादन करून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली होती आणि परिणामतः चीनमध्ये व्यसनाधिनता वाढलेली होती. त्यावर प्रतिबंध म्हणून अफू व्यापारास घातलेली बंदी हे त्या युद्धाचे प्रमुख कारण होते. यात अफू उत्पादनांचे स्थळ आणि बंदीचे कारण चुकविले आहे.
२) पृष्ठ क्रमांक ६ वर आणि २२ वर सारखीच ऐतिहासिक वचने दोनदा आलेली आहेत. मात्र पृष्ठ ६ वर ते वचन कॉन्फुशियस चे आणि पृष्ठ २२ वर तेच वचन सन त्झु यांचे असल्याचे लिहिले आहे.
वरील दोन बाबी वगळता आपल्या महाकाय शेजाऱ्याचा इतिहास वाचनीय पद्धतीने मांडला आहे.