लेखक मुंबईच्या रगाड्यातून आपल्या गावी असेलेल्या घरी येतो. आताशा पडझड झालेल्या घरात शिरताच, तिथली प्रत्येक खोली, खांब, भिंती त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जातात. आणि तिथून या पुस्तकाचा प्रवास सुरु होतो. लेखकाने केलेल्या व्यक्तीचित्रणांमधून त्या व्यक्ती अगदी जिवंत वाटू लागतात. त्यातल्या कितीतरी व्यक्ती हयात नसतात. त्यांचे स्वभाव, वागणं-बोलणं, त्यांच्यातली भांडणं हि जगावेगळी असली तरी त्या प्रत्येकामधलं माणूसपण हे टिकून होतं. लेखकाच्या शेजारी बाबूली नावाचा इसम राहत असे, ज्याच्याशी त्यांचं कधी पटत नसे. अजून एक इसम होते, ज्यांच्या अलिप्त आणि निसर्गवार प्रेम करण्याच्या स्वभावामुळे त्यांना सर्व हॉफमॅड म्हणत असतं. आता दशावतार नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. त्यात दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचं नाव "हॉफमॅड बाबूली" असं होतं. कदाचित त्या चित्रपटाच्या लेखकाने सुद्धा हे पुस्तक वाचलं असावं किंवा मग निव्वळ योगायोग. कुणी सांगावं.