Jump to ratings and reviews
Rate this book

के कनेक्शन्स

Rate this book
प्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज… अशी अडनिडी… धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ?

पहिला बेस्ट फ्रेन्ड… शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड… क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध… आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श… शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर… आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप…

असे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा !

के फॉर कुमार… के फॉर कल्याण….के कनेक्शन्स

192 pages, Paperback

Published April 1, 2025

3 people are currently reading
2 people want to read

About the author

Pranav Sakhdev

8 books2 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
5 (55%)
4 stars
4 (44%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 6 of 6 reviews
Profile Image for Vrunda Desai.
31 reviews
January 13, 2026
अतिशय नॉस्टॅल्जिया देणारं पुस्तक आहे. एका बैठकीत संपवू शकतो. ९० दशकात जन्माला आलेलो आपण प्रत्येक गोष्ट relate करू शकतो. पुन्हा एकदा शाळेत पोचले, सणांची मजा घेतली, आजी आजोबांच्या गोड आठवणीना उजाळा मिळाला. आणि अजून काही काळ तिथेच रमून रहावस वाटतंय.
कडबोळी काकू, अक्का, फणस आजोबा, मराठी शिकवणाऱ्या बाई, सरबत देणारे चाचा .. हे आपल्या ही आयुष्यात येऊन गेलेत. खूप साध सरळ लाघवी पुस्तक आहे.
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews12 followers
September 8, 2025
● पुस्तक – के कनेक्शन्स
● लेखिका – प्रणव सखदेव
● साहित्यप्रकार – कथासंग्रह, मोझाइक नॉव्हेल्स
● पृष्ठसंख्या – १९२
● प्रकाशक– रोहन प्रकाशन
● आवृत्ती – प्रथम आवृत्ती - २०२४
● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी
● मूल्य - २७५ रुपये
● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐

90s kids म्हणजेच आता म्हणतात ते Millennials.. लहानपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं मोबाईलला चिकटलेली नसायची तेंव्हाचा हा काळ.

”एखादी सायकल, एखादी खास जागा, क्रिकेट, जिभेवरील बोरकूटची चव, दिवेलागणी होई पर्यंत माळरानावर भटकणं, डायलर वाला फोन, स्काऊट गाईड च्या कवायती, पालिकेचं वाचनालय, एखादे आवडते शिक्षक, जीव लावणारी माणसं, शाळेत लावलेली जोडी, नकळत्या वयातलं आकर्षण.! ” या सगळ्या त्या काळातल्या इंटरेस्टिंग गोष्टी.!! आजही त्या गोष्टींची आठवण आली की एक अनामिक हुरहूर मनाला लागून राहते..

अशाच आठवणींनी विणलेली एक उबदार गोधडी म्हणजेच प्रणव सखदेव यांनी लिहिलेलं ‛के कनेक्शन्स’ हे पुस्तक.. लेखकाला त्या वयात भावलेली माणसं हा एक समान धागा घेऊन बारा वेगवेगळ्या गोष्टींची विणलेली ही रंगीबेरंगी गोधडी आहे. या पुस्तकात बालपणापासून तरुण होणाच्या काळातील संक्रमण, त्या काळातील भावना, नकळतपणे जागृत होणाऱ्या सुप्त जाणीवा लेखकाने अलगदपणे उलगडून दाखवल्या आहेत. प्रतिबिंबच

ज्या पुस्तकांतील कथांचा काही ठरविक क्रम नसतानासुद्धा ज्या एकमेकांशी एका समान आशयाने जोडलेल्या असतात अश्या मोझाईक नॉव्हेल्स प्रकारात मोडणारा साहित्यप्रकार.. नव्वदीच्या दशकातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात वाढणारा Teenager कुमार, हा या कथांचा नायक आहे. त्याच्या भावविश्वात सुरु असणारे भावनिक कल्लोळ, त्याला जीव लावणारी त्याची माणसं, सभोवताली घडणाऱ्या घटना, पौगंडाअवस्थेत शरीरात होणारे बदल, आपण मोठे झाले आहोत हि जाणीव अश्या अनेक नाजूक विषयांना लेखकाने हळुवारपणे स्पर्श केला आहे.

कुमार कडबोळी मावशी ला भेटायला कल्याण जंक्शनला येतो आणि जणू त्याच्या सोबत आपण आपल्या नव्वदीच्या काळात प्रवेश करतो. या मधल्या काळात कल्याण शहरात झालेले बदल, तिथल्या ओळखीच्या जागा यांचं एकदम जिवंत आणि नॉस्टॅल्जिक वर्णन लेखकाने केलं आहे. आताची फ्लॅट सिस्टम येण्याआधीच्या काळात 'संगत' नावाच्या ब्लॉक मध्ये कुमार वाढलाय. तिथल्या ब्लॉक्स ची सताड उघडी राहणार दारं जणू त्या काळातील माणसांच्या मोकळ्या मनाचं प्रतिबिंब दर्शवतात.

कुमारवर अपार माया करणाऱ्या कडबोळी मावशी आणि भाजीवाली आक्का या आपल्याला भेटतात तेंव्हा आपल्या बालपणी आपल्यावर प्रेम करणाऱ्या आजी, काकू यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. सगळ्या गोष्टीतलं थोडंफार कळतेय पण पूर्ण उमगत नाही अश्या अपरिपक्वतेकडून परिपक्वतेकडे घेऊन जाणाऱ्या काळात आपल्या संवेदना समृद्ध करणाऱ्या गोष्टी, चांगल्या सवयी, समाजाकडे बघण्याच्या दृष्टीकोन, सामाजिक जाणीवा या सगळ्या गोष्टीवर रंजकपणे भाष्य केलेलं या पुस्तकातून दिसून येतं. पतंग उडवणारा, एमटीबी सायकल वरून फिरणारा, दिवसभर क्रिकेट ग्राउंडवर पडीक राहणारा आणि वर्गातल्या मुलींशी बोलताना घाबरणारा कुमार हा आपल्या कुमारवयाचं प्रतिनिधित्व करतो असं सतत वाटतं राहत.

कुमारच्या या जगात क्रिकेट ग्रॉऊंडवर बर्फाचा गोळा विकणारा हुसेनभाई आहे, त्याला बचतीचे धडे देणारे फणस आजोबा आहेत, बोरकुट या अफलातून रसायनाशी त्याची ओळख करून देणारे आदूकाका आहेत, पुस्तकांच्या जगाशी त्याची मैत्री करून देणाऱ्या साळुंखे बाई आहेत तसेच रक्ताचं नात नसलं तरी त्याच्यावर जीवापाड माया करणारी भाजीवाली आक्का आहे. यातील प्रत्येक पात्राशी कुमारचे होणारे संवाद आणि त्यांचे त्याच्या निरागस आणि संवेदनशील मनावर उमटणारे प्रतिसाद लेखकाने मनाला भावातील अश्या शैलीत रेखाटले आहेत.

हे पूस्तक वाचताना " अरे मी तर माझ्या 'त्या' वयात असाच होतो हे वाटून जाणे " यातच या पुस्तकाचे खरे यश आहे असे मला वाटते. वपुंच्या एका पुस्तकात वाचताना एक वाक्य वाचला होत ते म्हणजे "As you write more and more personal, it becomes more and more universal.!!". प्रणव यांच्या लिखाणाला हे तंतोतंत लागू होतं. आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे, माणसांच्या पूर्वग्रहांचे आपल्या मनावर परिणाम झालेले नसतात तेंव्हाचे आपण हीच आपली खरी ओळख असते. या पुस्तकाचा प्रत्येक तुकडा वाचताना याच आपल्या मुळांना आपण परत भेट देतोय असं वाटत.

या कादंबरीची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यातली प्रसंगानुरूप रेखाटलेली स्थिरचित्रे.. एमटीबी सायकल असो, पतंग असो किंवा कल्याण जंक्शन चा बोर्ड असो सगळी चित्रे आपल्याला त्या काळात teleport करायला पुरेशी आहेत. तसेच प्रत्येक पात्रांचं सूक्ष्म आणि जिवंत वर्णन त्या पात्रांना आपल्यासमोर सहज उभं करतं.

प्रणव सखदेव यांची ही कादंबरी मराठी साहित्यात आणि मिलेनियल पिढी च्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाने या प्रत्येकाच्या आयुष्यातील 'त्या' गोंधळलेल्या, तगमगीच्या, हरवलेल्या आणि शोधलेल्या क्षणांना उजाळा दिला आहे. पहिला मित्र, शाळेतील खटपट, क्रिकेटच्या मैदानावरील आठवणी, लायब्ररीतील पुस्तकांचा सुगंध, आजी-आजोबांचा मायेचा स्पर्श, शेजारच्या दादाचे प्रेमप्रकरण आणि पहिल्या ब्रेकअपचा अनुभव – हे सगळे प्रसंग वाचकांना आपलेच वाटतात. विशेष म्हणजे प्रणव यांनी हिंदू-मुस्लिम, जातीवाद ई. गंभीर विषयांवर सैद्धांतिक भाष्य न करता, सहज आणि मार्मिक पद्धतीने सामाजिक परिघावर प्रकाश टाकला आहे.

हे पुस्तक कुणी वाचावं ?? सध्या तिशीतील, चाळिशीतील वाचकांना हे पुस्तक विशेषकरून जवळच वाटणार आहे कारण त्याच्या आठवणी या पुस्तकातून पुन्हा जिवंत होतात आणि अलगद त्यांना कुमारवयात घेऊन जातात. पण तसेच तरुण पिढी आणि किशोरवयीन मुलांनाही हे पुस्तक तितकेच आवडेल, कारण त्यात त्यांच्या सध्याच्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. स्वरूप वेगळं असलं तरी अनुभव थोड्याफार फरकाने तेच असतात. मराठी साहित्यात ‘कमिंग ऑफ एज’ प्रकारातील पुस्तके आवडणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक म्हणजे एक पर्वणी आहे.

शेवटी मला वाटतं तसं 'के कनेक्शन्स’ हे पुस्तक म्हणजे "एका संवेदनशील लेखकाचा आपल्या वाचकांशी मनापासून संवाद.." जर तुम्हाला तुमच्या किशोरवयातील गोड-कडू आठवणी पुन्हा अनुभवायच्या असतील, तर हे पुस्तक नक्की वाचा..

© पुस्तकायन
Profile Image for Bookkida2024.
72 reviews1 follower
May 22, 2025
कधी तरी आठवतं का तुम्हाला… पूर्ण दिवस मैदानात खेळलेलं क्रिकेट, चौकात मिळणारा बर्फाचा गोळा, सायकलवरचा वारा, मित्रांबरोबर केलेली मस्ती, शाळेतील पहिली क्रश, आणि गच्चीवर पतंग उडवताना मिळणारा आनंद? प्रणव सखदेव यांचं ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक अशाच विसरलेल्या आठवणींच्या कनेक्शनला उजाळा देतं – कुमार नावाच्या एका मुलाच्या आणि त्याच्या भोवतालच्या जगाच्या नजरेतून. पण गंमत म्हणजे, कुमार कोणत्याही एका पात्राचं प्रतिनिधित्व करत नाही – तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आतला लपलेला बालक!

प्रणव सखदेव यांनी लिहिलेली ही mosaic प्रकारातील कथा म्हणजे बारा छोट्या छोट्या धाग्यांनी विणलेली आठवणींची गोधडी आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी असली, तरी सगळ्यांचं मूळ एकाच भावना-विश्वात आहे – ते म्हणजे कुमारवय. भाषा अतिशय सहज, ओघवती आणि लयबद्ध आहे – पुस्तक एकदा उघडलं की पुढचं पान वाचल्याशिवाय राहवत नाही. लेखकाचं निरीक्षण अत्यंत प्रगल्भ आहे – त्या काळातला कल्याण परिसर, व्यक्तिरेखा आणि घटनांचं हुबेहूब वर्णन वाचकाला त्या काळात घेऊन जातं.

या पुस्तकातली पात्रं मनाला भिडणारी आहेत – नवनवीन पदार्थ खाऊ घालणारी कडबोई मावशी, गाणं म्हणणारी मेघा ताई, त्याच्या भविष्याची काळजी करणारे फणस आजोबा, माया करणारी भाजीवाली अक्का, क्रिकेटच्या ग्राउंडबाहेर थंडगार चम्मच विकणारे हुसैनभाई गोळावाला, त्याचे जिवलग मित्र दिन्या आणि मन्या, वाचनाची गोडी लावणाऱ्या साळुंकेबाई – ही सगळी पात्रं इतकी खरी वाटतात की ती आपल्याच आजूबाजूला वावरतायत असं वाटतं. विशेष म्हणजे, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं वाटत नाही – ते तुम्हाला नुसत्या आठवणी दाखवत नाही, तर भावनांच्या गाभाऱ्यात नेऊन पोहोचवतं.

हे पुस्तक प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं – विशेषतः ९०-२००० च्या दशकात मोठं झालेल्या मंडळींसाठी, जे अजूनही चिठ्ठ्या, रिबन्स, डब्बा शेअर करणाऱ्या आयुष्याला मिस करतात. कॉलेज स्टुडंट्स, नवखे वाचक किंवा नॉस्टॅल्जिया प्रेमींसाठी ही एक सुंदर भेट आहे. शेवटी, ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक म्हणजे केवळ गोष्टींचा संग्रह नाही – तर आपल्या आठवणींची एक सुंदर ठेव आहे!
Profile Image for Tanvi R.
7 reviews
January 8, 2026
कुमारवय, पौगंडावस्था किंवा टीनेज – बालपण आणि तारुण्य यांच्यामधल्या अडनिड्या अवस्थेची ही तीन निरनिराळी नावं. एकीकडे बालपण दबक्या पावलांनी निसटून जात असतानाच आपण मोठे झालो आहोत याची जाणीव करून देणारी ही अवस्था. या अवस्थेत आपल्या आजूबाजूची मोठी माणसंदेखील ‘अजून तू लहान आहेस.’ आणि ‘इतका मोठा झालास तरी…’ या वाक्यांचे उपयोग आपापल्या सोयीने करत असल्यामुळे मनातला गोंधळ काहीसा वाढवणारा हा काळ. हा काळ काहीसा भ्रमात टाकणारा, आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना हातून अनेक चुका करण्याचा, केलेल्या चुकांमधून शिकण्याचा असला तरी पुढे आयुष्यात हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात चिरंतन जपून ठेवला जातो. अशाच कुमारवयातल्या एका मुलाच्या भावविश्वाचा ठाव प्रणव सखदेव यांनी त्यांच्या ‘के कनेक्शन्स’ या कादंबरीतून घेतला आहे . या कादंबरीचा नायक, कुमार त्याच्या कुमारवयातल्या आठवणी १२ निरनिराळ्या कथांमधून वाचकांसमोर उलगडतो. मोझाईक नॉव्हेल्स या प्रकारच्या या कादंबरीतल्या घटनांना विशिष्ट क्रम नाही. या घटना आठवणींच्या निरनिराळ्या तुकड्यांतून १२ कथांच्या रूपात वाचकाला वाचायला मिळतात.

कादंबरीच्या सुरुवातीला कडबोळी मावशीला भेटायला येण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळाने कल्याण शहरात परतलेल्या कुमारकडून त्याच्या काळातल्या शहराची आताच्या शहराशी होणारी तुलना त्याच्या आठवणींची कुपी उघडते. त्याच्या या आठवणींमध्ये तो राहत असलेल्या ‘संगत’ इमारतीमधील खेळीमेळीचे दिवस आहेत, त्याच्या भविष्याची काळजी असणारे फणस आजोबा आहेत, माया करणारी भाजीवाली अक्का आहे, क्रिकेटच्या ग्राउंडबाहेर थंडगार चम्मच विकणारा हुसैनभाई गोळावाला आहे, त्याचे शाळेतले जिगरी मित्र, दिन्या आणि मन्या, आहेत, वाचनाची गोडी लावणाऱ्या साळुंकेबाई आहेत. या आणि अशा अनेक लहानमोठ्या व्यक्तिरेखांचं कुमारच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे. यांतील काही व्यक्तिरेखांना कुमारने दिलेल्या विशेषनामांची गंमत कथांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी उलगडली आहे. कॉम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्सचा घराघरात शिरकाव होण्याच्या आधीच्या पिढीचा कुमार प्रतिनिधी असल्यामुळे त्याची त्याच्या आजूबाजूच्या लहानमोठ्या माणसांशी असलेल्या संवादाची वीण घट्ट आहे. त्यामुळेच शाळेसमोरच्या दुकानातील आदूकाकांशी कुमारची मैत्री आहे. त्यांचे अनुभव ते सोप्या भाषेत गोष्टीच्या रूपाने कुमारला सांगतात. त्यांच्या लहानपणापासून शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या बोरकूटाच्या पुडीशी ओळख करून देतात. आठवणींतला कुमार जगाकडे निरागस दृष्टीने पाहतो. त्यामुळेच हुसैनभाईंच्या धर्माबद्दलचे मन्याच्या घरच्यांचे विचार समजल्यानंतर ‘सगळ्या धर्मांत चांगले-वाईट लोक असतात’ ही आजोबांची शिकवण त्याला आठवते. त्याचं संवेदनशील मन त्याला कोणत्याही व्यक्तीकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहू देत नाही. त्यामुळेच आईस्क्रीम अण्णा आणि मिस युनिव्हर्स भाभीबद्दल आजूबाजूला होणारी कुजबूज त्याला व्यथित करते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल कुमार विचार करतो, त्या घटनांची स्वतःच्या अनुभवांशी, आकलनाशी त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनातले भावनिक कल्लोळ, त्याच्या आणि त्याच्या सवंगड्यांच्या स्वभावांत, शरीरांत होणारे बदल त्याला गोंधळात टाकतात. ज्या क्षणी त्याला बालपण सरल्याची जाणीव होते त्याक्षणी तो आयुष्य कदाचित असचं असावं हे स्वीकारतो.

“त्या क्षणी मला समजलं, मी मोठा झालोय… त्या क्षणी मला समजलं… मोठं होणं म्हणजे काय ते!
त्या क्षणी… त्या क्षणी… मला समजलं की, ही पोकळी, हे रितेपण इथून पुढे माझ्यासोबत राहणार आहे, कायमच!” कादंबरीच्या शेवटचे कुमारच्या मनातले हे विचार वाचकालाही बालपण सरून अचानक मोठं झाल्याची जाणीव पुन्हा एकदा नव्याने करून देतात.

या कादंबरीतल्या ठिकाणांतले, प्रसंगांतले आणि व्यक्तिरेखांतले बारकावे प्रणव सखदेव यांनी १२ कथांमध्ये प्रभावीपणे चितारले आहेत. त्यामुळे त्या काळातल्या कल्याण शहराचं चित्र ते शहर कधीही न पाहिलेल्या वाचकांसमोरही जिवंत उभं राहतं. कडबोळी मावशी, मेघा दीदी, मिस युनिव्हर्स भाभी आणि इतर सर्वच व्यक्तिरेखा त्यांच्या लकबी, पेहराव, स्वभावासकट डोळ्यांसमोर येतात. त्याचप्रमाणे विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या कुछ कुछ होता है सारख्या चित्रपटातील कॉलेजचं विश्व, मैत्री, प्रेम वगैरेंचा कुमारवयीन पिढीवर असलेला प्रभाव, त्या पिढीत क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक शाळकरी मुलाचं वर्ल्डकप मध्ये खेळण्याचं स्वप्न, त्या काळात शाळकरी मुलामुलींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या बोरकूट, नॉनडस्टचा खोडरबर, लेडीबर्ड-एमटीबी ब्रँडच्या सायकली यांची कथेतील पेरणी त्या पिढीतल्या माझ्यासारख्या मिलेनिअल वाचकांना त्यांच्या कुमार वयात घेऊन जाते, नॅास्टॅल्जिक करून जाते. बदलत्या पिढीनुरूप ठिकाणं, प्रसंग, व्यक्तिरेखा बदलल्या तरी कुमारवयीन मुलामुलींच्या मनातली बाल���ण मागे सारून तारुण्यात प्रवेश करतानाची भावनिक उलथापालथ आणि त्या काळातले अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असतील. कुमारवयातल्या मोरपंखी आठवणींची सैर घडवून आणणारी ही कादंबरी आवर्जून वाचा.


This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Aniket.
27 reviews
December 29, 2025
किशोरवयीन नायकाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या कथांचा संग्रह आपल्याला आपल्या शालेय जीवनात घेऊन जातो आणि प्रत्येक कथेच्या शेवटी अंतर्मुख करून जातो.
Displaying 1 - 6 of 6 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.