१९४३ साली 'अभिरुची'च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात 'हा कोण संप्रति नवा पुरुषावतार?' अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं० वि० जोशी यांच्या- सारख्या मानकऱ्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, पुढे अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले. एकेकसुद्धा भान हरवील असा; 'किमु यत्र समुच्चयम्' ? साहित्याचे विविध ढंग, संगी&#