1937 ते 1942 पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे दर्शन ‘लव्हाळी’ या कादंबरीतून घडते.
सर्वोत्तम सटकर ही ‘लव्हाळी’तील मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका अर्थाने ‘लव्हाळी’ चा तोच लेखक आहे. तो आपले संसार-चित्र दहा वर्षातील बदलांसह येथे चितारतो. त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनदर्शनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते. शेंबेकरांच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून-तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही ‘लव्हाळी’ मात्र तशीच राहते.
1937-42 या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कृतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री. ना. पेंडसे यांनी घडविले आहे..
श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
अतिशय सुंदर पुस्तक, स्वताः बराच काळ चाळीत घालवल्या कारणाने पुस्तक अतिशय जवळचे वाटले. पुन्हा ते दिवस आठवले. एका वाक्यात सांगायचे झाले तर चाळीतल्या प्र्यत्येकां साठी. संग्रही ठेवण्या सारखे... सर्वोत्तम सत्कर