बाकी शून्य..
लेखक : कमलेश वालावलकर
हा काही बाकी शून्य चा परिचय नाही की या पुस्तकाविषयी कोणतं मत नाही. हा आहे माझा अनुभव, This is just my unfiltered, raw but real experience.
बाकी शून्य वाचून संपली. संपली म्हणजे मी ती संपवली. कारण तशी ती सहजासहजी संपणारी नाही. आणि आत्ता ही ती पूर्ण संपलीये असं नाहीच, फक्त डोळ्यांसमोर आता पुस्तकाची पानं नाहीयेत, कारण मी ही कादंबरी लगेच लायब्ररीत परत देऊन टाकली. पण कुठेतरी, मेंदूच्या कुठल्यातरी सांदीकोपऱ्यात ती राहिलंच, कोसला सारखी..
पण ती दडूनच राहील, किंबहुना मीच तिला दडवून ठेवणार आहे. कारण तिला असं ठळकपणे समोर ठेऊन चालायचं नाही.
ही कादंबरी अंगावर आली माझ्या.. हो..
आवडली, नाही आवडली, कळली, नाही कळली हा प्रश्नच नाहीये इथे, ती फक्त अंगावर आली..
शेवटाकडे आल्यावर आणि प्रत्यक्ष पुस्तक संपल्यावर मला ही कादंबरी एक क्षणही माझ्याजवळ, माझ्या असपास नको होती,
माझी लायब्ररी रात्री 8 वाजता बंद होते, 7:35 ला माझी कादंबरी वाचून संपली, आणि 7:45 ला मी घरातून वेड्यासारखी निघाले.. भानावर नव्हते मी तेव्हा, मला ती कादंबरी देऊन टाकायची होती, त्याच दिवशी.. इतकी ती माझ्या अंगावर आली.
मला यात कुठे भयानक वगैरे काही जाणवलं नाही, तसं काहीच नाहीये यात, पण ते सत्य.. बोचरं, टोचणारं सत्य, ते मात्र आहे..
मी जेव्हा लायब्ररीतून परत येत होते तेव्हा मला खूप हलकं वाटलं, परत माझ्या स्वतःत आल्यासारखं.. बहुतेक या कादंबरीनं मला भारावून टाकलं होतं.
पण नेमकं काय केलं तिने?
या कादंबरीनं मला विचारांची भीती घालू पाहिली..
- याज्ञी