शेक्सपीयरच्या नाटकांची आत्तापर्यंत अनेक प्रकारे भाषांतरे झाली आहेत. बुकीश नाटकाच्या जमान्यात इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासकांनी शेक्सपीयर मराठीतून वाचता यावा म्हणून जवळ जवळ शब्दश भाषांतरे केली. शेक्सपीयर रंगभूमीवर सादर करायचा तर पार्श्वभूमी देशी हवी या समजुतीने प्रयोगानुकूलतेने त्यात फेरफार करून रंगावृत्त्या झाल्या. त्याही पलीकडे फक्त कथाभाग मुळाबरहुकूम ठेवून संपूर्णपणे मराठी पेहराव चढवून रूपांतरेही झाली आहेत. शेक्सपीयरच्या नाटकांतील नाट्य जितके महत्त्वाचे त्याहूनही अधिक त्यातील काव्य मनोरम श्रेष्ठ कवी आणि समर्थ नाटककार असलेल्या वि. वा. शिरवाडकरांच्या या रूपांतराचा तो मुख्य गाभाच आहे. नाटककार आणि कवी ही शेक्सपीयरची दोन्ही अंगे आत्मसात करून शिरवाडकरांनी ऑथेल्लोची प्रतिकृती महेश्वर उभी केली आहे. त्यांनी जरी पात्रांची नावे आणि पार्श्वभूमी बदलली असली तरी खऱ्या अर्थाने त्यांनी शेक्सपीयर मराठीत आणला आहे. या आवृत्तीत नाट्यप्रयोगाविषयी लेखक, प्रकाशक आणि नाट्यकर्मी दत्ता भट, नीलम किर्लोस्कर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत.
वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातुन पास झाले.
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धर्नुधारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.
१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भूरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले. 'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले.
कुसुमाग्रज एक आगंळ व्यक्तिमत्व त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळीचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
साहित्यसूर्य मावळला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरच प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे. अशा ह्या देवस्वरूप व्यक्तिमत्वाला आमचे कोटी कोटी प्रणाम.