शिवकथाकार विजय देशमुख यांचे ‘शककर्ते शिवराय’ वाचून संपविले. याच्याच बरोबरीने ‘राजा शंभूछत्रपती’ हे त्यांचंच पुस्तक देखील वाचून काढलं. ‘शककर्ते शिवराय’ हे निव्वळ अप्रतिम आहे. ओघवती व रसाळ भाषा आणि ऐतिहासिक संदर्भांचे वेळोवेळी दाखले यांचे सुरेख मिश्रण असलेने हा ग्रंथ ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ असून सुद्धा इतर संदर्भग्रंथांप्रमाणे निरस अथवा कंटाळवाणा होत नाही. हि या पुस्तकाची उजवी बाजू आहे.
परंतु या पुस्तकातील ‘युवराजांचा रुसवा’ या प्रकरणामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे मात्र मला पटलेले नाहीत. या प्रकरणामध्ये ‘संभाजीराजे स्वराज्यद्रोह करून दिलेरखानाला मिळाले’ या घटनेचे तार्किक स्पष्टीकरण देताना त्यांनी ‘इतिहासाचे भीष्माचार्य’ वा.सी. बेंद्रे यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ व कमल गोखले यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या ग्रंथामध्ये ‘त्या’ घटनेच्या दिल्या गेलेल्या स्पष्टीकरणावर टीका केलेली आहे. देशमुख यांच्या मते, बेंद्रे व गोखले यांनी ‘कवींद्र परमानंद’ रचित अनुपुराण या काव्याला प्रमाणभूत मानलं आहे जे संभाजीराजे व संभाजी पुत्र शाहू यांना पक्षपाती आहे. परंतु त्याच वेळी ते मल्हार रामराव चिटणीस याच्या बखरेला मात्र उजवे माप देतात व संभाजी राजांच्या ‘रायगडावरील स्त्री प्रकरणा’ला सत्य असल्याची टिप्पणी हळुवार करून जातात. तसेच ते या बाबतीत संभाजी राजांच्या शाक्त पंथावरील श्रद्धेला देखील दोष देऊन जातात.
मुळातच जेंव्हा तुम्ही चिटणीस बखरीला सत्य मानता तिथेच तुमच्या इतिहासनिष्ठेवर शंका उपस्थित होते. कारण चिटणीस बखर हि बाळाजी आवजी चिटणीस यांच्या वंशजाने लिहिली आहे व ती सुद्धा पेशवे काळात. या बखरीमध्ये दिलेले कित्येक मुद्दे नंतरच्या काळात इतिहासकारांनी सप्रमाण खोडून काढले आहेत. परमानंदकाव्यम जर तुम्हाला संभाजी व शाहू काळात लिहिले असल्याने विश्वास ठेवण्यास योग्य वाटत नसतील तर त्या निकषांवर चिटणीस बखर तर तुम्ही टाळलीच पाहिजे ना? आणि संभाजी राजांच्या शाक्त पंथावरील श्रद्धेला दोष द्यायचा असेल तर तुम्ही शिवरायांना सुद्धा दोष दिलं पाहिजे ज्यांनी स्वतःला शाक्तपंथानुसार सुद्धा एक राज्याभिषेक करून घेतला होता. साहजिकच संभाजीराजांच्या मनात शाक्तपंथाविषयी जी काही श्रद्धा निर्माण झाली होती ती शिवरायांकडे बघूनच झाली असणार. देशमुख यांना अनाजीपंत आदि मंत्र्यांवर अजिबात संदेह जाणवीत नाही. त्यांच्या दृष्टीने या मंत्र्यांची स्वराज्य निष्टा हि वादातीत होती. मग मी एक प्रश्न विचारतो. या मंत्र्यांनी केलेल्या पहिल्या स्वराज्य द्रोहाकडे दुर्लक्ष करीत संभाजी राजांनी त्यांना अटकेतून मुक्त केले होते आणि पुन्हा मंत्री मंडळामध्ये त्याच हुद्द्यांवर समाविष्ट करून घेतले होते. इतका उदारपणा दाखवून देखील या मंत्र्यांनी शाहजादा अकबर याच्या मदतीने पुन्हा एकवार संभाजी राजांचा घात करायचा प्रयत्न केला होता. ते सुद्धा तेंव्हा ते स्वराज्याचे छत्रपती होते आणि स्वराज्याच्या चार चार शत्रूंशी अविरत झुंझत होते. मंत्र्यांच्या या कृत्यातून स्वराज्यनिष्ठाच दिसते का? देशमुख सरांनी या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे का?
मी बेंद्रे आणि गोखले यांचे संभाजीराजांवर लिहिलेले ग्रंथ वाचले आहेत. बेंद्रे यांनी संभाजीराजांची कलंकित प्रतिमा पुसून काढण्याचे महत्कार्य केले आहे परंतु हे करताना त्यांनी काही नकारात्मक गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे हे मला मान्य आहे. त्या बाबतीत मी कमल गोखले यांच्या ग्रंथाला जास्त वास्तविक मानतो. गोखले यांनी संभाजीराजांच्या स्वराज्यद्रोहि कृत्याचे विश्लेषण देताना जो सप्रमाण तर्कवाद केला आहे तो मला बेंद्रे यांच्यापेक्षा उजवा वाटतो. तो इथे मांडणे मला रास्त वाटत नाही. जिज्ञासू इतिहासप्रेमीनी स्वतः वाचूनच स्वतःचे मत ठरवावे. परंतु देशमुख यांनी मांडलेला तर्कवाद मला निराशच करून गेला आहे.
‘राजा शम्भूछ्त्रपती’ हे पुस्तक लिहिताना देशमुख यांनी त्याला संदर्भ ग्रंथ बनविण्याचे टाळले आहे व केवळ ‘शम्भूराजांची प्राथमिक ओळख’ करून देणारे एक छोटेखानी पुस्तक एवढाच उद्देश समोर ठेवला आहे असं माझं मत पडलंय. कारण या पुस्तकात, ‘शककर्ते शिवराय’ मध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक संदर्भ वारंवार दिले गेले आहेत, अभावानेच अशा संदर्भांचा वापर इथे केला गेलाय. या पुस्तकात त्यांनी एक वाक्य लिहिलंय. ‘अनाजीपंत, मोरोपंत आदि मंत्र्यांनी जेंव्हा शंभूराजांना अटक करण्यासाठी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राजाराम यांच्या वतीने आदेश दिला, तेंव्हा हंबीरराव यांनी *धूर्तपणाने* त्या मंत्र्यांनाच कैद केलं कारण पूर्ण लष्कराचा पाठींबा हा संभाजीराजांना होता आणि हे हंबीरराव जाणून होते.’ या वाक्यातून देशमुख यांना काय सुचवायचं आहे? त्यांना असं म्हणायचं आहे का हंबीरराव यांनी स्वराज्य निष्ठेने नव्हे तर *धूर्त अथवा स्वार्थी* भावनेने संभाजी राजांची पाठराखण केली होती? आणि इतकं मोठं वाक्य लिहिताना तुम्ही त्याला इतिहासातील प्रमाण का देत नाही? हंबीरराव मोहिते यांचे चरित्र पाहिले तर त्यात १०० नंबरी खरी स्वराज्यनिष्ठाच आढळते. स्वतःच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला राजपदाचा योग असताना देखील त्यांनी त्या विरोधात संभाजी राजांचा पक्ष धरलेला आहे. यात त्यांचा धूर्तपणा दिसतो कि स्वराज्याप्रती निष्ठा? आणि अनाजीपंत आदि मंत्री गणांच्या दुसर्या स्वराज्यद्रोही कृत्याविषयी लिहिताना मात्र देशमुख सरांनी जास्त उहापोह न करता एका वाक्यात त्याचे विश्लेषण संपविल आहे. का बरं असं?