What do you think?
Rate this book


144 pages, Paperback
First published January 1, 1997
1)
माणसं रेस का खेळतात? दारू का पितात ?
दारू प्यायली म्हणजे पशू होण्याची सुविधा उपलब्ध होते. पशू पागल होत नाहीत. ह्याला अपवाद कुत्र्यांचा. माणसांच्या सहवासात राहून दुसरं काय होणार? पशुंच्या बाबतीत तिथं विचारच नाहीत म्हणून नैराश्य नाही. नैराश्य नाही म्हणून आत्महत्या नाहीत. विचार-तणावातून काही काळ सुटका, हे अगणित माणसांचं दारू पिण्याचं कारण! जनावरं कधी 'बोअर' होत नाहीत. म्हैस मरेपर्यंत कडबा खाते. 'जरा मेनू बदला की' असं म्हणते का? सर्कसमधली जनावरं पिसाळतात. तिथंही माणसांचा सहवास आलाच ना? दारूच्या आधारानं माणूस पशू होण्याचा प्रयत्न करतो. तणाव विसरण्यासाठी. दुसरा मार्ग समागमसुखाचा !
2)
आपल्याला स्वतःला एखादं निरपेक्ष काम करताना अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निःस्वार्थीपणानं कुणासाठीही, कोणतंही काम करताना किंवा 'श्रेयस' आणि 'प्रेयस' ह्यांत स्वतःचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असतानासुद्धा तटस्थपणे श्रेयसची निवड करता आली, म्हणजे आपण आपले गुरू होतो. ह्याचाच अर्थ गुरूचं वास्तव्य आपल्यातच चोवीस तास असतं.
आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण 'प्रेयसला' प्राधान्य दिलं की, गुरुत्वापासून लांब जातो. कोणतीही कृती करत असताना आपण ती का करीत आहोत, त्यात जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाइलाजास्तव किती, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्त्विक भाव किती, हे ज्याचं त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी स्वतःचं स्वतःला होतं, ते ज्ञान! 'ज्ञान म्हणजेच गुरू'. ज्याची व्याख्या करता येते, त्याला 'माहिती' म्हणतात. 'परमात्मा तुमच्यातच आहे' असं म्हणतात.
'कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी !'
ह्या कवितेत पाडगावकरांनी 'हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर' अचूक बोट ठेवलेलं आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो, तसा गुरूही! असं जर असेल, तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? संभ्रम आणि द्वंद्व हेच ह्याचं कारण !
3)
आपल्या मनात स्वतःच्या निष्कर्षाबद्दल जेव्हा संदेहच नसतो, तेव्हा ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया उमटताहेत की नाही, ह्याची आपण दखलच घेत नाही. ते आपलं मत पडताळून पाहण्याची इच्छा झाली की समजावं, मनात संभ्रमाचा लंबक झोके घेतो आहे.
4)
अर्जुन संन्यासी होऊच शकत नाही. ज्या माणसाला संसार हिमतीने करता येत नाही, तो माणूस संन्यासी होण्याचंही धारिष्ट करणार नाही. खरंतर संसारातून निवृत्ती ही संन्याशाची व्याख्याच नाही. संसारातून जो तरून जातो, त्याला संन्यास म्हणतात. शेवटी संसार म्हणजे काय? आणि संन्यास म्हणजे तरी काय? संसारामध्ये होणारा दाह आणि संकटांचं अतिक्रमण ह्यामुळंच माणसाला संन्यास घेण्याची इच्छा होते. पण ह्या गोष्टींशी सामना करत संसार करणं ज्याला जमतं, त्यालाच अधिकारी पुरुष म्हणतात. संन्यास ही संसाराची विपरीत अवस्था नव्हे.
संसारात जो तारतम्यानं राहतो, स्वतःची बुद्धी कसोटीला लावतो आणि संघर्षातून पार होतो, त्या सगळ्याची फलप्राप्ती म्हणजे संन्यास ! म्हणूनच कोणतेही निर्णय घाईघाईनं घेण्याची आवश्यकता नाही. पळून जावं, हा संकटावर शोधलेला उपाय नाही. समस्यांशी हळूहळू सामना करण्याची शक्ती मिळवणं ह्यालाच यशस्वी संसार म्हणतात.
5)
माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादीपण असतो. जड बुद्धी असलेला माणूस कधीही उदास होत नाही. कारण आपण आहोत त्यापेक्षा कोण होऊ शकतो, या विचाराचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. मी आनंदात राहू शकतो, मी आनंद निर्माण करू शकतो, असा विश्वास स्वतःच्या बाबतीत ज्या माणसाला आहे, तितका तो अंतर्यामी उद्ध्वस्त असतो.
केव्हातरी सकाळी कोवळी उन्हं पडणार आहेत, प्रकाशाचं साम्राज्य पसरणार आहे, ह्याची ज्याला खात्री आहे, अशा माणसालाच रात्रीचा अंधार जास्त भेडसावतो. ज्याला सकाळच माहिती नाही, त्याला रात्रसुद्धा प्रकाशासारखीच वाटते. ऐन रणांगणात उतरल्यावर एकाही वीराला आत्तापर्यंत विषाद झाल्याचं ऐकिवात नाही. याला अपवाद एकच पुरुष, तो म्हणजे अर्जुन !
६)
'हा काळा आणि हा पांढरा' अशा दोन कप्प्यांत आयुष्याचे सगळे रंग भरता येत नाहीत. काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या मिश्रणानं जो 'ग्रे' म्हणजे 'राखी' रंग तयार होतो, त्याप्रमाणे कौटुंबिक जीवनातले अनेक क्षण राखी रंगाचे असतात, म्हणून आपला सतत अर्जुन होतो.
मुलाचं किंवा मुलीचं चुकत असताना दिसत असूनही नातवंडांची बाजू घेऊन नातवंडांना न्याय देता येत नाही. आपला मुलगा हा त्याच्या मुलांचा बाप आहे, त्यांचा पिता म्हणून त्याला जे स्थान आहे त्याला धक्का लागू नये म्हणून नातवंडांसमोर त्याला चार शब्द सुनवता येत नाहीत. आपण आजोबा असूनही स्वतःच्या मुलांसमोर मुलगा तुम्हांला उलट उत्तरं किंवा दुरुत्तरं देऊ शकतो. त्या वेळेला आजोबांची 'आजोबा' म्हणून जी प्रतिष्ठा आहे, ती काटेकोरपणानं सांभाळण्याची गरज नसते. आई-वडलांकडून जो न्याय मिळत नाही, तो आजोबांकडून मिळवू, ह्या भावनेनं नातवंडं तुम्हांला बिलगतात. त्यांचा विश्वास सार्थ होता, हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मुलाच्या आधारावर जगायचं असतं. नातवंडांवर अन्याय होऊ द्यायचा नसतो. ह्यासारख्या प्रसंगांना 'राखी' रंग म्हणायचा नाही, तर काय म्हणायचं?
आपल्यासारख्यांच्या घरातून संघर्ष होतात, ते इतक्या साध्या साध्या प्रसंगांमुळं. युद्धासारखी पराकोटीची घटना क्वचित घडते; पण साधेसाधे प्रसंग दिवसभर सातत्यानं घडत राहतात. ते संख्येनं जास्त असतात. अनपेक्षितपणे येतात. युद्धासाठी पूर्वतयारी करावी लागते, वातावरणनिर्मिती असते; पण अनपेक्षित घटना इतक्या बेसावध क्षणी कोसळतात की, त्यांतच आपली ताकद संपते.
कुणी आर्थिक पातळीवर पराभूत होतो, तर कुणाची बौद्धिक पातळीवर सतत चाचणी घेतली जाते, त्यामुळं तो थकतो, तर कुणाचा भावनात्मक पातळीवर अंत पाहिला जातो.
७)
गीतेचं मूल्यमापन करणारा मी कोण? वजनं, मापं, तराजू वापरायचे ते स्वतःच्या सीमित विचारांचे. अर्जुनासारखा जीवन-मरणाचा सवाल आजवरच्या आयुष्यात उभा राहिला नाही, कारण धनुष्य तर विसराच, बोटही उगारण्याची हिंमत नाही.