“रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" ह्या कविवर्य सुरेश भटांच्या पंक्तींचा पानोपानी अनुभव देणारं "कॅनव्हास" हे अच्युत गोडबोले आणि त्यांची सहलेखिका दीपा देशमुख यांचे अतिशय अभ्यासपूर्ण, तितकेच रंजक आणि भारावून टाकणारे पुस्तक! एकूण 588 पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच आपल्या मनाचा ठाव घेते. मुखपृष्ठाबद्दल विशेष सांगण्यासारखे म्हणजे हे मुखपृष्ठ पुस्तकाच्या लेखिकेने स्वतः डिझाइन केले आहे! त्यावरचे लिओनार्दो चे मोनालिसा आणि पिकासोचे "ले दंवाझेल दाव्हिया" लक्ष वेधून घेतात. ह्या अफलातून अश्या पुस्तकात अच्युत गोडबोलेंनी जगविख्यात अश्या 9 विदेशी कलाकारांच्या एकूणच जीवनप्रवाहाविषयी, त्यांच्या कलेप्रती असणाऱ्या निष्ठेविषयी, त्यांना झालेला प्रस्थापितांचा विरोध, समाजाकडून झालेली अवहेलना आणि तरीही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची त्यांची जिद्द, त्यांचं झपाटलेपण ह्याविषयी भाष्य केले आहे. एकूणच पुस्तकामध्ये माणसातला कलावंत आणि कलावंतातला माणूस ह्यांच्यामधला परस्परसंबंध उलगडून दाखवला आहे!
पुस्तकाला प्रस्तावना दिलीय प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि स्वतः उत्तम चित्रकार असलेले अमोल पालेकर यांनी. प्रस्तावनेचा मथळाच अतिशय बोलका आहे "दृष्टिहीन नजरेवर एक कटाक्ष" ! ह्यात जे नऊ कलावंत निवडलेत ते म्हणजे लिओनार्दो दा विंची, मायकेलअँजेलो, रेम्ब्राँ, पॉल सेजान, ऑग्युस्त रोंद, पॉल गोगँ, व्हॅन गॉग, लॉत्रेक आणि पाब्लो पिकासो.
लिओनार्दो दा व्हिंची हा इटलीत सुमारे ४५०-५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेला कलावंत. हा एक उत्कृष्ट चित्रकार तर होताच पण त्याचबरोबर प्रसिद्ध शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, संशोधक, गणिती, साहित्यिक, संगीतकार,लेखक,तंत्रज्ञ,तत्वज्ञ, इत्यादी नानाविध भूमिका एकाच वेळी निभावणारा थोर कलावंत. तो आपले सगळे निरीक्षणं, अनुभव, एका कोडेक्स लायसेस्टर नावाच्या नोंदवहीत नोंदवून ठेवायचा. त्यात कला आणि विज्ञान ह्यांचा परस्पर संबंध, नदीवर पूल बांधण्यासंबंधी सूचना, निरनिराळ्या यंत्रांचे आराखडे,खगोलशात्रातील नोंदी इ. अनेक गोष्टींवर त्यात त्याने भाष्य केलेले आहे. १९८९ मध्ये लंडनमधे “लिओनार्दो दा व्हिंची -चित्रकार, वैज्ञानिक आणि संशोधक” एक मोठं प्रदर्शन भरवलं होतं. त्यात लिओनार्दो च्या नोंदवहीतील यंत्रांचे आराखडे वापरून त्यानुसार प्रत्यक्षात बनवलेली यंत्रे ठेवली होती. सायकल रस्त्यावर येण्याच्या जवळपास ३०० वर्षे आधीच त्याने सायकलचा आराखडा आपल्या वहीत काढून ठेवला होता ! आजची वाहतुकीची कोंडी आणि त्यावरचे उपाय त्याने त्याच्या वहीत लिहून ठेवलेले आढळले ! सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्याची हि नोंदवही मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स ने तब्बल १७० करोडला विकत घेतली. त्याच्या पूर्ण टीम ने त्याचा अभ्यास केला. नंतर मात्र बिल गेट्स ने हि वही इतरांसाठी उपलब्ध करून दिली. ह्याच्या जीवनावर अनेक पुस्तकं आणिकादंबऱ्या लिहिल्या गेल्यात. त्यापैकी सगळ्यात गाजलेली कादंबरी म्हणजे डॅन ब्राउन ह्याने लिहिलेली “ दा व्हिंची कोड” हि कादंबरी! असा हा बहुआयामी असलेला लिओनार्दो दिसायला सुद्धा अतिशय देखणा होता. तो रस्त्यावरून जात असे तेव्हा आपण एखादे चालते बोलते शिल्पच बघतो आहोत असं लोक म्हणायचे. त्याला जगातील विषमता बघून अतोनात दुःख व्हायचं. युद्ध आणि त्यातून होणाऱी प्राणहानी , रक्तपात ह्याविषयी त्याला प्रचंड तिटकारा होता. असं सांगतात कि जेथे पक्षी विकायला ठेवले असायचे तेथे लिओनार्दो जायचा, विक्रेता म्हणेल त्या किमतीला पक्षी विकत घेऊन त्यांना मुक्त करून आकाशात सोडून द्यायचा. स्वातंत्र्य हा त्यांचाही हक्क आहे आणि आपण तो हिरावून घ्यायला नको असं त्याचं मत होतं. लिओनार्दोचा गुरु व्हेराशिओ. तो नेहमी चित्रातला मुख्य भाग स्वतः रंगवायचा आणि पार्श्वभूमी आणि कमी महत्वाचा भाग त्याच्या शिष्यांना रंगवायला द्यायचा. त्याचे ”बॅप्टीझम ऑफ ख्राईस्ट” हे चित्र रंगवतांना त्याने त्यातले येशू आणि जॉन बॅप्टीस्ट हि मुख्य पात्र व्हेराशिओ ने रंगवली आणि कोपऱ्यात उभे असलेले देवदूत आणि पार्श्वभूमी लिओनार्दोला रंगवायला दिले. गम्मत म्हणजे व्हेराशिओ च्या मुख्य पात्रांपेक्षा लिओनार्दो चे देवदूतच इतके अप्रतिम झालेत कि तेच लक्ष वेधून घ्यायला लागले. विशेष म्हणजे आपला शिष्य आपल्याही पुढे गेलाय हे बघून व्हेराशिओ ने अतीव समाधानाने त्यानंतर कधीही कुंचला हातात घेतला नाही अशी कथा आहे . -- लिओनार्दो ची खूप गाजलेली चित्रे म्हणजे अनॅन्सिएशन, अडोरॅशन ऑफ द मागी, मॅडोना ऑन द रॉक्स, सेंट जेरोम, लेदा, मोनालिसा आणि द लास्ट सपर. मोनालिसा च्या चित्रा बद्दल तर अजूनही अनेक वाद प्रवाद सुरूच आहेत. कुणी म्हणतं ते एका व्यापाऱ्याच्या बायकोचं चित्र आहे. त्या व्यापाऱ्याने लिओनार्दो कडून ते काढून घेतलं होतं. कुणी म्हणतात लिओनार्दो ने आपल्या आईचे आदर्श रूप त्यात रेखाटलंय तर काहींचं म्हणणं हे त्याचेच स्वतः चेच स्त्री वेशातील ते चित्र आहे तर काहींच्या मते मोनालिसाच्या चेहऱ्यावर त्याने काही अल्फाबेट्स दडवून ठेवले आहेत! एवढं मात्र खरं कि मोनालिसाच्या त्या रहस्यमय स्मिताने जगभरातल्या कला समीक्षकांना अजूनही संभ्रमात ठेवलंय आणि त्या स्मिताचा अर्थ लावण्यात ते गर्क आहेत. दुसरं त्याचं प्रसिद्ध चित्र म्हणजे "द लास्ट सपर"! असं म्हणतात कि येशू ख्रिस्ताला त्याच्या जुडास नावाच्या शिष्याने विषप्रयोग करून मारले. एकदा येशू त्याच्या 12 शिष्यांसोबत एका सणाच्या दिवशी भोजनाची चर्चा करीत मेजावर बसलेला असतांना अचानक उद्गारतो " मला ठाऊक आहे, तुमच्यापैकीच एकजण माझा विश्वासघात करणार आहे." येशूच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच बाराही शिष्य एकदम अवाक होतात. त्या वेळेचे त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य , अनपेक्षित पणे बसलेला धक्का आणि जुडास च्या चेहऱ्यावरचे चोरी पकडल्याचे भाव लिओनार्दो ने इतके हुबेहूब चितारले आहेत कि त्याला तोड नाही . हे चित्र बनवायला त्याला जवळजवळ 3 वर्षे लागली! आणि ह्या चित्राला "मानवी बुद्धी आणि प्रतिभा ह्याची सर्वोच्च पातळीवरची निर्मिती" असे गौरवण्यात आले आहे. आजही लक्षावधी लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून हे चित्र बघायला येतात आणि स्वतःला धन्य समजतात! असे अनेक जगप्रसिद्ध कलाकृतींच्या जन्माचे किस्से ह्या पुस्तकात आहेत. वाचतांना आपण आपल्या नकळत त्यात गुंतत जातो. अस्सल सौंदर्याचा ध्यास घेतलेला, कलेच्या साधनेत पूर्ण आयुष्य वेचणारा, दैवी प्रतिभेचा कलावंत म्हणून ओळखला जाणारा मायकेलअँजेलो हा सुद्धा असाच एक बहुआयामी कलावंत! एक उच्च दर्जाचा शिल्पकार, चित्रकार, आर्किटेक्ट, कुशल अभियंता आणि कोमल मनाचा कवीसुद्धा! हा बाकी लिओनार्दो सारखा देखणा मुळीच नव्हता. त्याला स्वतः च्या दिसण्याबद्दल खूप न्यूनगंड होता आणि त्यामुळे तो फारसा कुणात मिसळायचा सुध्दा नाही! त्याच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी त्याचे "मायामी" हे काव्य प्रसिद्ध झाले. असं सांगतात कि मायकेलअँजेलो एकदा 13 वर्षांचा असतांना त्याने आरशात आपले प्रतिबिंब बघितले आणि तो अत्यंत निराश झाला. त्याच अवस्थेत त्याने जवळ पडलेल्या एका कागदावर एक अतिशय सुरेख चेहरा रेखाटला. तो सुंदर चेहरा बघून तो स्वतःच खूप खुश झाला आणि म्हणाला "मी सुंदर नसलो म्हणून काय झालं? असे कितीतरी सुंदर चेहरे मी निर्माण करू शकतो" आणि आपल्या आयुष्यात त्या��े हे शब्द अक्षरशः खरे केले. मायकेलअँजेलो वर BBC आणि इतरांनी अनेक चित्रपट तयार केलेत. जगभरातून असंख्य विद्यार्थी त्याच्या शिल्पांचा आणि चित्���कृतींचा अभ्यास करतात. शरीरशास्त्राच्या सखोल अभ्यास करून केलेल्या त्याच्या शिल्पांमध्ये आजसुद्धा एकही चूक सापडत नाही हे विशेष ! त्याच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये "मेडोना ऑफ द स्टेअर", "बॅटल ऑफ सेंटर", "स्लीपिंग क्युपिड", "बॅकस", "पिएता", " मोझेस", "डे अँड नाइट" आणि कलेच्या इतिहासात अजरामर झालेला डेव्हिड इत्यादी अनेक शिल्पांचा समावेश होतो. त्याच्या प्रत्येक शिल्पाची एक वेगळी कथा आहे ती ह्या पुस्तकात अतिशय रंजक रीतीने विशद केली आहे. अशा ह्या "मास्टर ऑफ पर्फेक्शन" म्हणून नावाजल्या गेलेल्या असामान्य कलावंताने जगाच्या इतिहासात फ्लोरेन्स आणि रोम चे नाव अजरामर करून ठेवलं आहे !
त्याचप्रमाणे चित्रकलेच्या इतिहासात शेक्सपिअर म्हणून नावाजला गेलेला रेम्ब्राँ हाही असाच अफाट बुद्धिमत्तेचा कलावंत. ह्याच्या कुठल्याही चित्राचा मुख्य नायक प्रकाश असायचा. ब्रश चे अनोखे फटकारे आणि छाया प्रकाशाचा अचूक वापर हि त्याची खास वैशिष्ट्ये होती. चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतल्यावर, 19 वर्षांच्या वयात त्याने काढलेले "स्टोनिंग ऑफ सेंट स्टीफन" हे त्याचे पहिलेच चित्र याच अनोख्या तंत्रा मुळे खूप गाजले आणि तो चांगला चित्रकार म्हणून ओळखला जाऊ लागला. "द पोर्ट्रेट ऑफ निकोलस रटस" ह्या व्यक्तिचित्राने त्त्याची ख्याती सर्वदूर ओसरली आणि "दी अनाटॉमी लेसन ऑफ डॉ. ट्ल्प" ह्या चित्राने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. पण जगात काहीही शाश्वत नसतं हेच खरं! त्यानंतर त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले कि आतापर्यंत भरभरून प्रशंसा करणाऱ्या लोकांनी त्याच्याकडे क्षणात पाठ फिरवली आणि तो दुर्भाग्याच्या खाईत लोटला गेला! त्याच्या एकूणच आयुष्यात असे अनेक चढउतार त्याच्या आयुष्यात आलेत. आणि त्या सर्वांना तोंड देत त्याचा चित्रप्रवास बाकी अव्याहत सुरूच होता. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एकेकाळी कलाविश्वातला शेक्सपिअर म्हणून गाजलेल्या रेम्ब्राँचा मुत्यू एक अनाथ म्हणून नोंदवला गेला! पण त्याच रेम्ब्राँच्या प्रत्येक चित्राची किंमत आज सहस्त्र कोटी असावी हा केव्हढा दैवदुर्विलास! त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ अडीचशे वर्षांनंतर एका डच चळवळीने रेम्ब्राँ च्या घराला त्याच्या चित्रांचं म्युझियम बनवलं आणि त्याची सारी चित्र जतन करून ठेवली गेली. त्याच्या जन्मस्थळी त्याला आदरांजली वाहण्यासाठी खास लीडन युरो हे नाणं काढण्यात आलं!
त्यानंतरचा कलावंत पॉल सेजान ! नवकलेचा प्रवर्तक आणि निसर्गचित्रांचा बादशहा! त्याच्या जगप्रसिद्ध कलाकृतींमध्ये "द रेल्वे कटिंग", "द मर्डर", "बास्केट ऑफ ऍपल्स" , "कार्ड प्लेअर्स", "दी बाथर्स" इत्यादींचा समावेश होतो. ह्यातले पोस्ट इम्प्रेशनिझम काढलेले "थ्री बाथर्स" हे चित्र मॉडर्न आर्ट मधलं मास्टरपीस म्हणून ओळखलं जाते. ह्या चित्रावर सेजान ने तब्बल 7 वर्षे काम केलं! आणि 1937 मध्ये हे चित्र 110000 डॉलर्स ला विकल्या गेले . तसंच त्याचं "द बॉय इन द रेड वेस्ट" हे चित्रही खूप गाजलं. त्याची आज किंमत 650 कोटी रुपये इतकी आहे! कार्ड प्लेअर्स मालिकेतलेले त्याचे एक चित्र 2012 साली 1550 कोटी रुपयांना विकल्या गेले! ह्या वादळी कलाकाराचे आयुष्य मात्र खूप खडतर गेलं. त्याला जिवंत असतपर्यंत सतत टीकाकारांच्या, समीक्षकांच्या निंदानालस्तीला, अवहेलनेला तोंड द्यावे लागले. पण त्याने स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही आणी त्याला पटेल अशीच चित्र तो काढत राहिला. त्याचं कलाक्षेत्रातलं योगदान बाकी अतिशय अमूल्य असेच आहे हे निश्चित! ह्यानंतर पुस्तकात एक क्रांतिकारी शिल्पकार ऑग्युस्त रोंद (Augusta Rodin) ज्याला आधुनिक शिल्पकलेचा जनक म्हणूनसुद्धा गौरवण्यात येते त्याच्या हेलावून टाकणाऱ्या जीवनप्रवाहाविषयीचे प्रकरण आहे . मायकेलअँजेलो नंतर इतका ताकदीचा दुसरा कुणी शिल्पकार इतिहासात झाला नाही असे ह्याच्याविषयी बोलल्या जाते. "गेट्स ऑफ हेल", "द थिंकर", "द किस", "द थ्री शेड्स", "एज ऑफ ब्रॉन्झ", "इंटर्नल स्प्रिंग", "I am beautiful”, “हॅन्ड्स ऑफ गॉड", "हेड ऑफ सॉरो", "दी इटर्नल आयडॉल", "बाल्झाक", "वॉकिंग मॅन" या त्याच्या काही जगभर प्रचंड वाखाणल्या गेलेल्या अजोड कलाकृती! ऑग्युस्त च्या विविध शिल्पांमधले हात, बोटं , त्यांची ठेवण हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय मानल्या जातो. त्यासाठी जगभरात असंख्य अभ्यासक, संशोधक आपलं अख्ख आयुष्य खर्च करतात! त्याच्या विरोधकांनी त्याच्या काही शिल्पांना अश्लील ठरवून त्यावर खूप टीकाही करण्यात आली होती. आज मात्र तीच शिल्पं जगभर प्रशंसेला पात्र ठरली आहेत.
त्याच प्रमाणे 1848 साली पॅरिस मध्ये जन्मलेला क्रांतिकारी शैलीचा आणि पुरोगामी विचारांचा फ्रेंच चित्रकार म्हणजे पॉल गोगँ. चित्रकलेच्या आपल्या ध्यासाने त्याला अनेक हालअपेष्टांना, उपेक्षेला, समाजाच्या टीकेला, टिंगलटवाळीला सतत तोंड द्यावे लागले. त्यात त्याचे घर, दार, बायको, मुले या सगळ्यांची वाताहात झाली. तो फक्त चित्रकाराचं नव्हता तर एक चांगला शिल्पकार, प्रिन्टमेकर, वूडकार्व्हर, आणि एक उत्तम लेखकही होता. त्याच्या मृत्यूनंतर 1906 साली त्याची एकूण 227 चित्रे जेव्हा पॅरिसमधल्या प्रदर्शनातून लोकांसमोर आलीत तेव्हा लोक आश्चर्याने थक्क झाले आणि विशेष म्हणजे ती सगळीच्या सगळी चित्रं प्रचंड किमतीला विकली गेलीत!
ह्यातलं शेवटचं भल्यामोठ्या नावाचं चित्र होतं ही तसंच प्रचंड! माणसाच्या जगण्यातल्या अनेक अनाकलनीय गोष्टी त्याने ह्यात चित्रित केल्या आहेत. ह्या चित्रा नंतर त्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. प्रख्यात लेखक सॉमरसेट मॉम ह्याने त्याच्या जीवनावर लिहिलेली "द मुन अँड सिक्सपेन्स" हि कादंबरी खूप गाजली. नंतर 1942 साली त्यावर चित्रपटही काढण्यात आला. गोगँ ने लिहिलेले त्याचे आत्मचरित्र "नोआ नोआ" हे त्याच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी प्रकाशित झाले आणि अनेक भाषांत त्याचे अनुवादही झालेत. असं सांगतात कि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारा साठी आलेल्या धर्मगुरूंनी त्याच्या झोपडीत असलेली अनेक चित्रे अश्लील ठरवून जाळून टाकली.
त्यानंतर आपल्यासमोर येतो अवघे 37 वर्षांचे आयुष्य लाभलेला,हॉलंडच्या एका धर्मोपदेशकाच्या घरात जन्मलेला, हळव्या मनाचा संवेदनशील चित्रकार व्हॅन गॉग! त्यातही त्याने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी चित्रं काढायला सुरवात केली आणि फक्त 10 वर्षांच्या उण्यापुऱ्या कालावधीत 2100 हुन अधिक स्केचेस, 800 हुन जास्त तैलरंगातील आणि 1300 जलरंगातील चित्रं काढली होती ! त्यात त्याने एक्सप्रेशनिझम, फॉविझम आणि सिन्थेटिझम अश्या सगळ्या चित्रशैलींचा वापर केला होता. त्याचे संपूर्ण आयुष्य कमालीचे दारिद्र्य, सततची उपेक्षा, अपमान ह्यात गेले. त्यात सततचे आजारपण, प्रेम आणि व्यवहार दोन्हीमध्ये आलेले पूर्ण अपयश आणि त्यामुळे होणारी घुसमट ह्या सगळ्यांमुळे शेवटी 1 वर्ष तर त्याला वेड्यांच्या इस्पितळात राहावे लागले. तेथेही त्याने 300 पेक्षा अधिक चित्रे काढली. त्याची काही प्रसिद्ध चित्र म्हणजे "पोटॅटो इटर्स", "थ्री पेअर्स ऑफ शूज", "स्टारी नाईट", "डॉ. गाशे", " व्हिट फिल्ड विथ क्रोज", "सनफ्लॉवर", "पेंटर ऑन द रोड", " व्हीन्सेन्ट चेअर्स" आणि अशी कितीतरी अधिक! ह्या सगळ्या प्रवासात त्याला एकमेव आधार होता तो त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्याचा धाकटा भाऊ थिओ ह्याचा. थिओ ने त्याच्या खडतर प्रवासात त्याला सतत साथ दिली. दैवदुर्विलास हा कि आज व्हॅन गॉग च्या प्रत्येक चित्राची किंमत कित्येक कोटी आहे परंतु आपल्या आयुष्यात तो फक्त एकच "रेड व्हाईनयार्ड" नावाचे चित्र विकू शकला! आणि असं म्हणतात कि हे सुद्धा थिओ ने त्याला थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून स्वतः पैसे देऊन कुणालातरी विकत घ्यायला लावले होते! त्याच्या अनेक चित्रांमधून कामगारांचे, शेतकऱ्यांचे दुःख, हालअपेष्टा, वेदना आणि दारिद्र्य ह्याचे चित्रण होते. आयर्विन स्टोन ह्याने त्याच्या जीवनावर लिहिलेली "लस्ट फॉर लाइफ" कि कादंबरी प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्यावर अनेक चित्रपटही निघाले. अकिरा कुरोसावा ह्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याच्या चित्रांवर आधारित "ड्रीम्स" हि अप्रतिम फिल्म काढली. अमस्टरडॅममधे त्याच्या चित्रांचं खास असं म्युझिअम स्थापन केल्या गेलं. आजही तो राहत होता ती ऐतिहासिक खोली बघायला लोक 6 युरोचं तिकीट काढून गर्दी करतात. तो ज्या खुर्चीवर बसायचा तश्या खुर्च्या आजही आव्रगावात करून मिळतात. आपला भाऊ महान चित्रकार आहे आणि एक दिवस हे जगाला नक्की कळेल असा थिओ ला बाकी ठाम विश्वास होता मात्र त्याचा हा विश्वास व्हॅन च्या मुत्यू नंतर खरा ठरला. दुर्दैवाने हे पाहण्यास थिओ सुद्धा जिवंत नव्हता. व्हॅन गॉग च्या मृत्यूनंतर फक्त सहाच महिन्यांनी थिओचाही अंत झाला. "जे कॅनव्हास वर उतरतं ते माझ्या काळजातून आलेलं असतं" हे म्हणणाऱ्या ह्या हळव्या कलावंताचं वादळी आयुष्य वाचून आपण अक्षरशः सुन्न होऊन जातो !
त्यानंतर आपल्या भेटीला येतो अतिशय निर्भिडतेने वास्तववादाचे चित्रण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला, आधुनिक चित्रकलेत स्वतः चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा जगविख्यात फ्रेंच चित्रकार ऑरी द तुलूझ लॉत्रेक ! लहानपणी एका किरकोळ अपघातात दोन्ही पायांची हाडे तुटल्याने त्याचे दोन्ही पाय प्लास्टर मध्ये ठेवावे लागले आणि प्लास्टर काढल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आले कि त्याच्या पायांच्या हाडाची वाढ होणे अशक्य आहे. त्यानंतर काही दिवसांनी वरचा मोठा भाग आणि खुरटलेले छोटेसे पाय असे काहीसं विचित्र दिसणारं रूप त्याला प्राप्त झालं. आपल्या त्या शारीरिक व्यंगाच्या दुःखाने त्याला आयुष्यभर छळलं. ते विसरण्यासाठी तो मग दिवसभर चित्रात बुडलेला राहायचा आणि रात्री नाईट क्लब आणि वेश्यागृहांना भेटी द्यायचा. तेथे त्याला त्याच्या व्यंगावरून कुणी हिणवयाचे नाही. त्या दरम्यान त्याने अनेक वेश्यांची चित्रे रंगवली. आणि त्यामुळे त्याला समाजाच्या प्रखर विरोधालाही तोंड द्यावे लागले. पण त्याची पर्वा न करता त्याने रेषांवर असलेली त्याची हुकमत आणि अचूक रंगांची निवड ह्या जोरावर स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली. एकविसाव्या वर्षी त्याने रंगवसलेल्या "स लझार" ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने त्याला एकदम प्रकाशझोतात आणले. त्यानंतर लिथोग्राफीचे तंत्र वापरून त्याने काढलेल्या "ला गुलू" ह्या चित्राने त्याने तर प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. "फर्नांडो द रिंगमास्टर", "ला टॉयलेट", "द जॉकी", "द किस" हि त्याची काही चित्रे कलेच्या इतिहासात खूप महत्वाची समजली जातात.
ह्यानंतर पुस्तकात रंगवलेला शेवटचा अतिशय प्रतिभासंपन्न, पण वेगळ्या वाटेने जाणारा अनोखा कलावंत म्हणजे स्पेन मध्ये मालागा येथे जन्मलेला पाब्लो पिकासो! त्याच सगळं वागणंही चाकोरीबाहेरचंच होतं. आयुष्यभर त्याने चित्रकलेच्या प्रांतात सतत नवनवे प्रयोग केले. त्याच्या आयुष्यात आलेल्या अनेक सुंदर सुंदर स्त्रिया, त्याच्या चित्रांना असलेली प्रचंड मागणी आणि त्याच्या हयातीतच त्याला मिळालेली अफाट कीर्ती आणि पैसा ह्या सगळ्याच गोष्टींवर अनेक पुस्तकं लिहिल्या गेलीत. विसावे शतक आपल्या कुंचल्याने गाजवणाऱ्या ह्या असामान्य चित्रकाराला एकदा कुणीतरी विचारलं, "तुझं सर्वात आवडतं चित्र कोणतं ?" तर त्यावर तो शांतपणे उद्गारला , "ह्यानंतरचं !" पिकासोच्या वडील स्वतः एक चांगले चित्रकार होते त्यामुळे चित्रकलेचं बाळकडू त्याला अगदी लहान वयातच मिळाले. बोलणं सुरु व्हायच्या आधीपासून त्याच्या हातात पेन्सिल आली आणि त्याने तो तासंनतास रेघोट्या मारीत बसे! पिकासोचं एकूणच जीवन, कलेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हे सगळंच आपल्याला भारावून टाकतं. पिकासोला वयाच्या पंचविशीतच अमाप प्रसिद्धी मिळाली. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने क्युबिझम चे तंत्र वापरून काढलेले "ले दंवाझेल दाव्हिया" हे चित्र खूप गाजलं. ह्यात त्याने परंपरागत सौदर्यांच्या कल्पनांना छेद दिला आहे. त्याच्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये "द ब्लाइंड मॅन्स मील", "द लाइफ", "थ्री डान्सर्स", " थ्री म्युझिशिअन्स", " बुलफाइट", "गेर्निका", "ला फ्लेमी फ्लॉर" इत्यादींचा समावेश होतो. गेर्निका ह्या त्याच्या अजरामर कलाकृती मध्ये त्याने युद्धामुळे झालेल्या संहाराचे अत्यंत विदारक चित्रण केले आहे. हे एक प्रतीकात्मक चित्र असून ते व्हिएतनाम च्या टपाल तिकिटावर छापलं आहे. 1950 मध्ये त्याला शांतता परिषदेत शांततेचं पारितोषिक देण्यात आले. आज पिकासोने रेखाटलेले "कबुतर" जगभर शांततेचे प्रतीक म्हणून वापरण्यात येतं. भारत सरकारने देखील त्याच्या सन्मानार्थ त्याच्या "थ्री म्युझिशिअन्स" ह्या चित्राला पोस्टाच्या तिकिटावर स्थान दिलं आहे. त्याच्या जीवनावर "पिकासो बिफोर पिकासो", "लाइफ विथ पिकासो" वगैरे अनेक पुस्तकं लिहिली गेलीत. त्याच्या आयुष्यात त्याने 13000 चित्र, 1 लाख मुद्राचित्र, 34000 इलस्ट्रेशन्स आणि 300 शिल्प एवढी भरीव कामगिरी करून ठेवली आहे ! मृत्यूनंतर तर त्याच्या चित्रांनी विक्रीचे झाडून सगळे उच्चान्क मोडले. आणि आजही त्याची चित्र जगभर प्रचंड मोठ्या किमतीत जातात. त्याच्यासारखा कलावंत पुढील अनेक शतकातही होणे नाही असं त्याबद्दल म्हटल्या जातं.
पुस्तकामध्ये ह्या सगळ्या कलावंतांच्या अप्रतिम कलाकृतींच्या फोटोंचा समावेश केला आहे. एकूण 37 रंगीत चित्रे आणि अगणित ब्लॅक अँड व्हाईट चित्रे. एकेका कलाकृतीचे चित्र बघत त्याची कहाणी वाचतांना आपण थक्क होतो. पुस्तकात शेवटच्या भागात शिल्प चित्रकलेचा इतिहास, त्यातले वेगवेगळे प्रवाह ह्याविषयी तीन विभागात सविस्तर वर्णन केले आहे. त्यात एकूणच अश्मयुगापासून सुरवात करून कला कशी कशी बहरत गेली त्याविषयी आणि पुस्तकात न आलेल्या अनेक थोर कलावंतांच्या कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती आली आहे. पुस्तक वाचल्यानंतर कित्येक दिवस आपण एका मंतरलेल्या अवस्थेत राहतो हे निश्चित !
This was my first Achyut Godbole work and I must say, I enjoyed it thoroughly. I am fond of biographies and hence the book was right up my alley. I had little to none understanding of the art history of painting, and could not venture beyond the most obvious works viz Mona Lisa etc. However, having gone through this well-researched book now, I believe I have some idea of art movements and am able to identify styles of various noted artists, those covered in the book as well as a few ones that I explored thereafter. For a beginner, the book is a must read. That the book is in Marathi adds its own charm to the reading, while making the book more accessible to those more comfortable reading in their mother tongue vis-a-vis English. I look forward to reading more books by Godbole.
This book is about different style of paintings and painters and their exciting life. if read with interest it gives you artistic joy. I got mine and now in my bookshelf.