Dilip Prabhavalkar is an Indian Marathi film, television and theatre actor. Prabhavalkar is also the author of many plays and children's story books.
His writing is remarkable for its wit and deft comic touches and tongue-in-cheek satirical attitude. This attitude is reflected in his newspaper column writing where he deals with the issues around, including political ones, in a humorous manner, yet exposing the hypocrisy of politicians. Three of his nine books published so far- 'Googly', 'Hasgat' and 'Kagdi Baan'- have won literary awards.
स्मार्टफोन्स घराघरांत पोहोचण्याआधी नियमित पत्रव्यवहार हे संवादाचं प्रचलित आणि प्रभावी माध्यम होतं. महत्वाचे संदेश पोहोचवण्याबरोबरच मनातले विचार आणि भावना दुसऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम पत्रलेखनाच्या माध्यमातून होत असे. दिलीप प्रभावळकर यांनी ‘पत्रापत्री’ या आपल्या पुस्तकात तत्कालीन ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून झळकलेल्या समाजातील घटनांवर पत्ररूपी संवादांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले आहे.
या पुस्तकातील १४ पत्रांमध्ये प्रामुख्याने तात्यासाहेब आणि माधवराव यांच्यातील पत्रव्यवहार आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर, समाजातील विसंगतीवर या जोडगोळीची होणारी सविस्तर चर्चा आणि त्यांचे विचार हलक्याफुलक्या शैलीतून प्रभावळकरांनी शब्दबद्ध केले आहेत. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी घडलेल्या आयपीएल मॅचच्या वेळी झालेला क्रिकेटपटूंचा लिलाव आणि सामान्य माणसाला नव्याने समजलेली चीअरलीडर्सची संकल्पना, दुबईच्या साहित्यसंमेलनातील राजकीय हस्तक्षेप, ठिकठिकाणच्या होर्डिंग्सचा सुळसुळाट, क्रिकेटमधलं स्पॉट फिक्सिंग, मालिकांमधला टीआरपी या आणि अशा त्या काळातल्या ब्रेकिंग न्यूज़वर तात्यासाहेब आणि माधवरावांनी केलेल्या खुसखुशीत चर्चा रंजक तर आहेतच पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांकडे पाहण्याचा एक निराळा दृष्टिकोन ही पत्रं वाचकाला देऊन जातात.
या जोडगोळीतील पत्रव्यवहारात प्रसंगी प्रभावळकरांनी कल्पनाविलासाचीही जोड दिली आहे. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ‘ऑक्टोपसची भविष्यवाणी’ या पत्रव्यवहारात २०१० साली झालेल्या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेतले सामने आणि खेडाळूंबरोबरच प्रसिद्ध झालेल्या ‘पॉल द ऑक्टोपस’च्या भविष्यवाणीबद्दल बोलताना जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसाच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा सारख्याच असतात ही वस्तुस्थिती हे दोघंही मित्र मान्य करतात. युरोपातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एखादी शाखा असावी हे मत माधवराव आपल्या पत्राच्या उत्तरातून तात्यासाहेबांजवळ नोंदवतात. माधवराव पुण्यातल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही असंच कोणतातरी प्राणी भविष्यवाणी करण्यासाठी नेमावा अशी कल्पना सुचवतात. त्यांच्या या कल्पनेला दुजोरा देत तात्यासाहेबही शेतकऱ्याचा मित्र म्हणजे गांडूळाला या कामासाठी नेमावं आणि योग्य गांडूळ निवडण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गांडूळशेती करणाऱ्या मांजरे नामक इसमांकडे चौकशी करण्याचा घाटही घालतात. टीआरपीसाठी मीडियाने केलेले असे स्टंट्स आणि महत्वाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक केली जाणारी डोळेझाक यावर आपल्या हलक्याफुलक्या शैलीतून प्रभावळकरांनी भाष्य केले आहे.
या पत्ररूपी संवादांतून हळूहळू तात्यासाहेब आणि माधवरावांच्या कुटुंबियांशीही वाचकाची ओळख होत जाते. त्यात या दोघांच्या पत्नींमधील संवाद आहेत. पुढे तात्यासाहेबांचा नातू आणि माधवरावांचा मुलगा, माधवसुत उर्फ शाम्याही या संवादांचा भाग होतात. धडपड्या आणि साहसी स्वभावाचे तात्यासाहेब, काहीशा भित्र्या स्वभावाचे माधवराव, नव्या पिढीचा प्रतिनिधी विभास, माधवसुत नावाने कविता करणारा माधवरावांचा मुलगा शाम्या या आणि इतर पात्रांची व्यक्तिचित्रणंही तितक्याच प्रभावीपणे वाचकांसमोर उभी केली आहेत. तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब या व्यक्तिरेखांच्या स्वभावांतून आणि संवादांतून वाचकांसमोर उभं राहते.
या पुस्तकात उल्लेख केलेल्या घटनांपासून आज विशीत असलेला वाचकही अनभिज्ञ नाही. उलट सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आता अशा ब्रेकिंग न्यूजचा सुळसुळाट आज अधिक वाढला आहे. त्यामुळे या पुस्तकातील प्रसंगांशी कोणत्याही पिढीतला वाचक सहजपणे रिलेट करू शकेल. एखादी हलकीफुलकी मालिका पाहत असल्याप्रमाणे या पुस्तकाचा आनंद घेऊ शकेल याची खात्री आहे.