#४४. ‘घर हरवलेली माणसं’ नि ‘माणुस’ हरवलेली घरं
माणसाला आयुष्यात काय हवं असतं? अन्न, वस्त्र व हक्काचं आपलं घर. ते जपणारं आपलं माणुस…
सुख-सोयींनी युक्त, आकर्षक रंगसंगतीचं, किंमती वस्तुंनी सजवलेलं घर ‘माणुस’ जपणारं नसेल तर? ते शोभेपुरतंच राहतं. घराला ‘घर’पण येतं ते माणसांमुळं. जिवाचं रान करुन हक्काचं घर घ्यावं, नि माणसांअभावी ते सुनंच रहावं, मग त्याला घर म्हणायचं? माणसं असुनही यंत्रवत जगण्यानं, सैल झालेले नात्यांचे बंध वरवर कुरवाळणारं घरही भरलेलं असलं तरी रितंच वाटतं. दमल्या-भागल्या तनमनाला, ओढ लावणाऱ्या, ‘आपलं’पण हरवलेल्या चार भिंतींना घर म्हणता येईल? माणसांच्या गोतावळ्यात गजबजलेलं, एकांताचं वावडं असलेलं घरही ‘सार्वजनिक’ वाटावं, कारण ते ‘आपलं’ असं खास उरलेलंच नसतं. अशा गोंधळात, लोकापवादाचं भय, मोकळेपणाअभावी कोमेजलेली मनं यानं ते घर आपलं सुख-समाधान कायमचं हरवुन बसतं.
मानी मनुष्य स्वभाव, वागण्याच्या विक्षिप्त तऱ्हा व त्यातुन निर्माण होणारे क्लेश, आपलेपणाचा ओलावा आटून उरलेली कोरडी माणसं, एकमेकाला साथ देण्यापेक्षा कुरघोडीत आनंद मानणारी मनं, स्वार्थासाठी ‘घर’पण हिरावून घेणाऱ्या, नि मनावर अशा जखमा घेऊन फिरणाऱी माणसं, वपुंनी या कथांतून अचुक टिपली आहेत.
आई-बायकोची मनं सांधताना एकाच घरात होणारं नवऱ्याचं ‘जंक्शन’. यच्चयावत सोयींनी युक्त, हक्काच्या माणसाला पारखं झालेलं, बेगडी प्रेमाचं प्रदर्शन करणारं ‘यंत्र’वत घर. ऐन तारुण्यातच घर सावरण्यात हरवलेली व प्रेम, लग्नसंस्था, संसाराच्या संकल्पनांवरचा विश्वास, हातातुन ‘वाळु’गत, निसटल्याची भावना घेऊन जगणारी मिस सामंत. चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत सासु-सासरे, दीर-जाऊसोबत राहणाऱ्या, नवविवाहित दांपत्याचा हरवलेला एकांत व त्यांची ‘कुचंबणा’. स्वार्थापायी पोटच्या तान्ह्यासह, नवऱ्याचा ‘निरोप’ घेत, उद्ध्वस्त घर मागं ठेवुन जाणारी विद्या. वाढत्या अपेक्षांचं ओझं पोटच्या पोरीवर लादुन, खोट्या प्रतिष्ठेपायी, बळजबरी लग्न ठरवून, तिचं कोवळं वय, मन, भावनांचा गळा आवळणारे ‘असुर’सम माय-बाप. ‘यशस्वी होशील म्हणा’ ही नवऱ्याच्या विक्षिप्त वागण्यानं, ताणलेल्या नात्यावर प्रकाश टाकणारी कथाही कायम स्मरणात राहील अशी आहे. ‘जाणार कुठे?’, ‘तीन शब्द’ सारख्या कथाही पुस्तकाची संकल्पना व एकुण विषयाला साजेशा आहेत.
एक न दोन, नव्या-जुन्या बारा कथांचा हा पावणे दोनशे पानी संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला असुन, आपल्या समर्पक मुखपृष्ठासह आघाडीच्या सर्व विक्रेत्यांकडे खरेदीकरता वाजवी किंमतीत उपलब्ध आहे.
मला वाटतं, वपुंची कथा माणसं वाचायला शिकवते. निरनिराळ्या माणसांचे अनुभव, दुःख, त्यांचे प्रश्न, नातेसंबंधातील ताण-तणाव, विशेषकरून, नागरी जीवनातील समस्या व समकालीन कथाविषय, बोलक्या पात्रांमुळे आपल्या परिचयाची वाटते. वपुंची भाषाशैलीही, आपल्याशी मित्राच्या नात्यानं संवाद साधावी, अशी आहे. ते केवळ समस्या मांडत नाहीत, तर बऱ्याचदा, आपल्या वैचारिक मंथनातून, मुळ कारणांचाही वेध घेतात. त्यामुळं त्यांची कथा अधिक अर्थपूर्ण व प्रामाणिक वाटते. माणसां-माणसांत वाढत जाणारी दरी, बव्हंशी, असंवाद किंवा विसंवादमुळेच असते असं त्यांना स्पष्ट वाटतं.
पृथ्वीवरुन चंद्रापर्यंतचं अंतर लीलया पार केलेल्या माणसाला शब्दांतील अंतरही सहज कापता येऊ नये, यापेक्षा मानवाची दुर्गती ती आणि काय असावी? मग, पुस्तकाच्या प्रस्तावनेत आलेला हा सुविचार साऱ्या कथांचा गाभाच ठरावं हे मनापासून पटतं- “People become miserable because they construct walls instead of bridges”.
~अनिकेत
श्रीगणेश चतुर्थी (१४.०९.२६)