शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव अशा कार्यकर्त्यांच्या प्रजेविषयी च्या धोरणांची दिशा ठरविणाऱ्या प्रेरक अभंगांची रचना करणारे तुकाराम. मध्ययुगीन मराठीतील संत, पंडित आणि शाहिरी या काव्य परंपरेपासून बहिणाबाई सारख्या लोककवयित्रीइतकाच पु. ल. देशपांडे, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ अशा आधुनिक साहित्यिकांवर प्रभाव टाकणारे तुकाराम. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे न्या. रानडे, महात्मा फुले, महर्षी शिंदे यांना प्रभावित करणारे तुकाराम. लो. टिळक, स्वा. सावरकर, गोळवलकर गुरुजी यांच्यासारख्या राजकीय विचारवंतांच्या चिंतनाचा भाग असणारे तुकाराम. महात्मा गांधी, गुरुदेव टागोर यांना ज्यांच्या अभंगांनी भक्तिविषयक विचारांचे खाद्य पुरवले ते तुकाराम.
तुकाराम वारकऱ्यांपुरता मर्यादित नाही; तो रोजच्या जगण्यात सोबत करणारा, आपल्यासारखाच घडपडणारा मित्र आहे; पण यापलीकडे जाऊन जीवनाचे साध्य काय असावे याची मांडणी करणारा तत्त्वज्ञ आहे आणि तिथे पोहोचण्यास मदत करणारा मार्गदर्शकही आहे. महाराष्ट्रातील विचारवंतांना, नेत्यांना प्रेरणा देणाऱ्या तुकारामाच्या अभंगांनी मराठी भाषेला समृद्ध केले आणि सर्वसामान्याना जगण्यासाठी ऊर्जा दिली. तुकाराम आणि महाराष्ट्र वेगळा करून पाहता येतच नाही, याचे भान देणारा ग्रंथ.
तुकाराम केंद्रित मराठी संस्कृतीचे समग्र दर्शन घडले. तुकाराम महाराज व एकूणच वारकरी संप्रदायाचे एैतिहासिक, सांस्कृतिक ,सामाजिक आणि राजकीय महत्व पुस्तक अधोरेखित करते . पुस्तकास साहित्य आकदमी पुरस्कार मिळालेला आहे .