#जरीला : #भालचंद्र_नेमाडे
जरीला म्हणजे चांगदेव चातुष्टय मधील मधील तिसरा भाग.
चांगदेवला मुंबई नोकरीसाठी सोडतो (#बिढार) तर दुसरं गाव तिथल्या वातावरणाला कंटाळून सोडतो (#हूल). परंतु #जरीला मधलं गाव सगळं ठीक ठाक असून ही सोडतो. या भागात चांगदेवच्या वागण्यात, त्याच्या जाणिवा-नेणिवा यातील होणारे स्थित्यंतरं चितारतली आहेत. इतर तरुणांप्रमाणं चांगदेवही स्वतःच्या विश्वात गुरफटलेला असतो, मग भलेही ते आभासी का असेना. तो नेहमीच मस्तीत जगतो, फारशी भविष्याची चिंता न करता. वरून निष्काळजी वाटणारा चांगदेव फार संवेदनशील असतो, अगदी घरातील कोष्ठ्यच जाळंही तो काढत नाही, त्याच्याबरोबर स्वतःची तुलना करतो बसतो. शेवटी ती खोली सोडताना त्याच्यासाठी तो खिडकी उघडी ठेवतो.
एकटेपणा दूर करण्यासाठी तो बरीच धडपड करतो, सुरवातीला साऱ्याच्या गराड्यात तो राहत असतो, तर नंतर, एका डॉक्टर बाईशी गप्पा मारायला लागतो, तर कधी गावाबाहेरच्या वयस्करांसोबत गप्पा मारायला जातो. चांगदेव स्वतःहून त्याच्या काकाच्या घरी जातो अन त्याचे लग्नाबद्धलचे विचार बदलतात. संसारी माणूस प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिकलेला असतो हे त्याला समजतं. खरं तर त्याने लग्नाचा कधी विचारच केलेला नसतो पण इतरांचे बघून अन सतत येणाऱ्या पारूच्या आठवणीमुळे अस्वस्थ होऊन लग्नासाठी उतावीळ होतो आणि तोही लग्नाचा खटाटोप करू लागतो. पण येथेही निराशाच हाती लागते. यावेळी मानवी व्यवहार त्याला त्याच स्वरूप दाखवून देतात आणि त्याची त्यालाच किव येते.
कित्येक वर्षांनी तो त्याच्या गावी जातो, त्याच्या आई-वडिलांची झालेली दारुण परीस्थिती त्याचं मन पोखरायला पुरेशी असते. पण इथूनही तो त्यांना काही मदत वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता नेहमीप्रमाणे पलायन करतो. आपण कधीच पैशाच्या बाबतीत कधी गंभीर विचार का केला नाही हा प्रश्नही त्याला यावेळी पडतो. त्याचे पूर्वज गावचे पाटील-वतनदार असलेले. पण आता मात्र त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत. आपली तर दमडीचीही मदत नाही याचीही त्याला खंत वाटते. आयुष्यात काय मिळवलं किंवा काय गोळाबेरीज केली ह्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. केवळ निरर्थकपणे ध्येयशून्यतेने जगत असलेले बेफिकरी आयुष्य एवढाच काय तो प्रकार असतो. एव्हाना सहज पैसे उडवणारा किंवा पैशांची पर्वा न करणारा चांगदेव निष्ठुर अन व्यवहारिकपणे जुने स्नेही पवार यांच्याकडे राहिलेले पैसे मागतो.