चांगदेव चतुष्ट्यचा अंतिम भाग म्हणजे नेमाड्यांची 'झूल'. हा भाग म्हणजे काय तर, जर चार लोक पारावर बसून गप्पा मारत बसले तर कसे, काही बोलतात, काही करतात. या कादंबरीतील पात्रं पण तशीच काहीशी वागतात-बोलतात. या पात्रांची नावं बाकी झकास आहेत उदारणार्थ जातीने धनगर असलेले भोळे, छोटा मेंदू मोठा आणि मोठा मेंदू छोटा असलेलं देशपांडे, कुलकर्णी ला कुकर्णी, चांगला देशपांडे, संस्थाचलक माठुराम, ठोसर वगैरे.
राजकारणी लोक शैक्षणिक संस्था व विद्यापीठे केवळ आपल्या फायद्यासाठी वापरात असतात आणि यात साऱ्या तरुण वर्गाला हाताशी धरलेलं असतं आणि यात भरडलेही तेच जातात याची त्यांना जाणही नसते. हि शिक्षणालयें शिक्षण कमी आणि भानगडी जास्त अशी. अर्थात हे सारं वास्तविक आहे, केवळ कादंबरीतच नाही. दुसरं म्हणजे कादंबरीत जातीयतेचं गटार अगदी ओतप्रोत - काठोकाठ भरून वाहते, प्रत्येकजण जातीभिमानी आहे, जातीला जातीविषयी अविश्वासही असतो. एक पात्रं तर असं म्हणतं कि उद्या जर महारांचं राज्य आलं तर निम्मे ब्राम्हण स्वतःला महार म्हणून घेतील! यात वास्तव आहे. स्वतःला सत्तेजवळ जाता यावं म्हणून लालची लोक असं करतात. त्याला जातीचे संदर्भ कितपत असतात देवजाणे. यातूनच जातीयतेची विषवल्ली वाढली, टिकली आणि फोफावली. सत्ताधारी येनकेन प्रकारे स्वतःची सत्ता टिकवतो यात समाजाचं हित-अहित फारसं लक्षात घेतलं जात नाही. कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्याही तेच राहणार! काल जातीचे संदर्भ होते, आज लोकशाही/हुकुमशाही वगैरेंचे आहेत उद्या ज्ञानाचे असणार?
बाकी या भागात चांगदेवला हे समजतं कि कुठेही जा परिस्तिथी जवळपास सारखीच असते, इथंही त्याचा नेहमीप्रमाणे मोठा मित्र परिवार (भोळे, चिपळूणकर, चांगला देशपांडे, देसाई वगैरे) असतो. तरीही त्याचं एकटेपण काही त्याची पाठ सोडत नाही, आणि इथंही तो दिशाहीनच असतो, परंतु तटस्थ असतो, तो ना बामणांची कड घेतो ना ब्राम्हणेतरांची बाजू.