Author takes it easy, not forcing it - and just as one thinks it's strange, but forgets expectations, one is startled by something very lifelike into an unexpected laughter!
अनुक्रम
कुणाचा कोण? अर्थात भोकरवाडीतील नाटक
जीव देणे आहे
गर्दी
पत्ता शोधण्याचा प्रकार
बाबू मैलकुल्याचे ‘धोक्याचे वळण’
तास कवितेचा
बापू आणि बनी
थट्टेखोर आबानाना
जागृत देवस्थान
सापडलेला देव
चार लोक
फोडिले भांडार
फुकट
भोकरवाडी बंद
*****
1.कुणाचा कोण? अर्थात भोकरवाडीतील नाटक
" ... पहिली अडचण लक्षात आली ती ही की, बऱ्याच मंडळींना लिहायला येत नव्हतं. फार थोड्या जणांना र-ट-फ करीत वाचता येत होतं. एक गणामास्तर सोडला तर बाकी पुस्तकाचा उपयोग शून्यच होता. गणामास्तराने तोंडी वाक्ये सांगायची आणि बाकीच्यांनी ती म्हणायची असे ठरले. मध्यंतरी गणामास्तर गावाला गेला. त्यामुळे नाटकाचे काम खोळंबले. तालीम अजिबात झाली नाही. नाही म्हणायला बाबू सर्वांकडून तालीम करून घ्यायला तयार होता; पण बाबू शिकवू लागला म्हणजे सगळ्यांचा घोटाळा उडत असे. प्रत्येक पांडव सारखा मारामारी करीत आहे असा भास निर्माण होई. चहापाण्याच्या आशेने माणसे गोळा होत. मग थोडा वेळ आरडाओरड करून एकेकजण काढता पाय घेत. नाही म्हणायला भीम आणि हिडिंबासुर यांची कुस्ती मध्येच होती. त्यांची तालीम मात्र रोज नियमाने होई. भीमाचे काम बाबूने स्वत: पत्करले असल्यामुळे ही कुस्ती रोज झाली पाहिजे, असा त्याचा आग्रह असे. या गोष्टीला अर्थातच हिडिंबासुराचे पात्र सोडून बाकी कुणाचा विरोध नव्हता; पण भीमाशी एकदा कुस्तीची प्रॅक्टिस झाल्यावर हिडिंबासुर दुसऱ्या दिवशी उगवतच नसे. अंग दुखत असल्याच्या सबबीवर चार-आठ दिवस तरी ते पात्र बेपत्ता होई."
"“धुर्वासम्हाराज, आपण स्नान करून मग नदीकडं जावं. निवांत बसावं. थोडी कळ काढावी. इकडं जेवनाखाण्याची वेवस्था झाली की मागारी यावं. पाच पक्क्वाण्णं रेडी हायेत हे ध्यानात आसू द्या. लाडू, पुरनपोळी, शीरखंड, झालंच आपलं तर गुडीशेव–”"
" ... एकूण नाटक पार पडले.
:फक्त शेवट मात्र अनपेक्षित झाला.
"हिडिंबासुराने भीमाला चांगलेच बुकलून काढले. त्याने उरावर बसून भीमाच्या छातीत बुक्क्या मारल्या. मग उजवा हात असा हिसकला की भीमाचे डोळे पांढरेच झाले. पुन्हा भीम काही बराच वेळ जागचा उठलाच नाही!
*****
जीव देणे आहे
"बजरंगने खूप विचार केला. मग त्याने खोलीत शोधाशोध केली. दोर सापडणे शक्यच नव्हते. दुसऱ्याकडून मागून आणणेही बरे नव्हते. ‘जरा जीव द्यायचाय हो. तुमच्याकडचा दोर द्या बरं थोडा वेळ’ असे थोडेच म्हणता येते?"
*****
गर्दी
"रोज जाहिरातींनी वर्तमानपत्रे भरून जाऊ लागली. दोन्ही पैलवानांचे फोटो आणि त्याबरोबर कंत्राटदारांचा फोटो हे रोजच्या रोज पेपरमध्ये झळकू लागले. गावात जिकडे-तिकडे पांडूच्या नावाची चर्चा सुरू झाली. पांडू गावात ऐटीने हिंडू लागला. लोक आपल्याकडे एकसारखे बघताहेत आणि बोटे दाखविताहेत असे त्याला वाटू लागले. एकूण गर्दी जमविण्याचा आपला बेत बिनबोभाट पार पडणार आणि वर चार पैसेही मिळणार हे पाहून गडी खुलला. वरचेवर पोरांना सांगू लागला–
"“जोरात तयारी ठिवा हं. आपण समद्यांनी हजर पायजे जागेवर. वेळ हाय, वखत हाय. माणसं कमी न्हाई पडता उपेगी. न्हाईतर गर्दी हुईल आफाट, अन् आवराय यायची न्हाई.”
*****
पत्ता शोधण्याचा प्रकार
"“ते नागपूरकर कुठे राहतात काही कल्पना आहे तुम्हाला?”
"“कोण नागपूरकर?”
"“ते– एस.टी.त आहेत बघा.”
"“काय, पत्ता काय दिलाय?”
"“इथंच, याच कॉलनीत घर आहे हो. मागं एकदा बऱ्याच वर्षांपूर्वी मी आलो होतो. पण आता सापडत नाही.”"
*****
बाबू मैलकुल्याचे ‘धोक्याचे वळण’
Hilarious results of a drunk worker at night putting up boards directing traffic.
*****
तास कवितेचा
"नातूने मोठ्यांदा गळा काढला. तेव्हा सरांनी पुन्हा एकदा त्याच्या थोबाडीत दिली. ओरडले,
"“आं? रडतोस वर पुन्हा? खबरदार जर–”
"“टाच मारुनि जाल पुढे–” मी म्हणालो.
"‘चिंधड्या उडवीन राईराईएवढ्या’ बबन्या म्हणाला. त्याच्यापाठोपाठ सगळ्या वर्गाने ती ओळ म्हटली. आमच्या म्हणण्याने मास्तरांचा राग कमी होईल असे आम्हाला वाटले; पण झाले उलटेच. त्यांचे तोंड लाल झालेले दिसले. दातओठ खात ते पुन्हा ओरडले,
"“अरेच्या! खबरदार जर–”
"“टाच मारुनि जाल पुढे...” बंड्या तत्परतेने म्हणाला.
"“चिंधड्या उडवीन राईराईएवढ्या.” मी त्याच्यापाठोपाठ तत्परता दाखविली. आता मात्र वाघमारे सर फारच खवळले."
*****
बापू आणि बनी
"बापू मनात म्हणाला, ‘बोल, बोल किती बोलायचं तेवढं बोल म्हातारे. आता थोडाच टाईम आहे. तेवढ्यात काय बोलायचं तिवढं बोलून घे. मग समजंल हिसका.’
"आणखी दहा मिनिटे गेली. बापू अधीरतेने वाट पाहत राहिला.
"अन् एकाएकी बनी ताड्दिशी उभी राहिली.
"म्हातारी आश्चर्याने म्हणाली,
"“का गं?”
"“पोटात गुडगुडायला लागलंय माज्या. लई कळ येतीय. आलीच मी खाली जाऊन.” बनीचा चेहरा कसनुसा झाला."
*****
थट्टेखोर आबानाना
"आबानाना धोतराने तोंड पुसून म्हणाले,
"“उपास? आपल्याला नाही हां उपासबिपास कसला. काय आसंल ते रोजचं जेवायचं.”"
*****
जागृत देवस्थान
"या दहा-बारा वर्षांत हे चित्र बदलले. पार बदलले. याला कारणही तसेच घडले. हा निद्रिस्त देव एकदम जागृत झाला. लोकांना त्याचा प्रत्यय येऊ लागला. रात्री देवळात झोपणाऱ्या काहीजणांना तर मारुतरायाचे उग्र रूपातले दर्शन प्रत्यक्ष घडले. काहीजणांना मारुतरायाने बेदम चोपले, अशाही कथा गावात पसरल्या. मार खाल्लेल्या लोकांनीही ही गोष्ट कबूल केली आणि मग देवळाची कळा पालटली. चार चांगली माणसे याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी बसली. अनेकांनी शपथा घेतल्या. देवळाचा पुजारी हरिभाऊ जपे यांनी रोजची पूजा न चुकविण्याचे आश्वासन दिले. देवळाचा जीर्णोद्धार करायचे ठरले. भराभर वर्गणी जमली. दुरुस्त्या झाल्या. नियमित पूजाअर्चा सुरू झाली. कथा-कीर्तने सुरू झाली. प्रवचने झडू लागली. सकाळ-संध्याकाळ भक्तांची दर्शनासाठी रीघ लागू लागली. मारुतराया जागृत आहे हे कळल्यामुळे नवससायासही बोलले जाऊ लागले."
*****
सापडलेला देव
“जगन्या, कोंच्या देवानं तुला डोस्कं दिलंय रे? आँ? मारुतीच्या हातावर गोवर्धन पर्वत आसतोय व्हय?”
“मग कोनता?”
“द्रोणागिरी पर्वत. कृ्ष्णानं करंगळीनं उचलला त्यो गोवर्धन.”
“एकूण एकच. कुठला तरी डोंगर है ना? मग झालं तर.”
*****
चार लोक
"संभाला काही कळले नाही. तरी पण तो उठून बसला. एका हातावर भार देऊन प्रश्नार्थक दृष्टीने यशवंताकडे पाहत राहिला.
"“हा, बोल.”
"यशवंता बापाजवळ सरकला. त्याचा हात हातात घेऊन थांबला. मग एकाएकी म्हणाला,
"“आता तूच सांग मला. काय सांगशील तसं करतो.”"
*****
फोडिले भांडार
" ... तात्यांना ती गोष्ट ठाऊक होती. इतका दमदार शेतकरी गावात कुणी नव्हताच. सुगी झाल्याबरोबर घरच्यापुरती ठेवायची अन् बाकीची विकायची, हाच आजपर्यंतचा रिवाज होता. घरी जरुरीपेक्षा धान्य महिनोन् महिने ठेवून घ्यायला दम लागतो. तेवढा दम कुणात असणार? एखाद्दुसराच माणूस. बाकीचे आपले हात झाडून मोकळे. पेरणीच्या वेळी बी मिळायची पंचाईत."
*****
फुकट
"अखेर चिता पेटली. नानांचीच पहिल्यांदा पेटली अन् तिची हाय जशी अंगाला लागू लागली, तेव्हा मात्र नानांचा दम उखडला. खाड्दिशी उठून बसून ते म्हणाले,
“अगं?–
” त्यावर काकूही ताड्दिशी उठल्या व म्हणाल्या,
“काय?”
"आपल्याला कबूल! तू तीन खा अन् मी दोन खातो.”
"चौघेजण खांदेकरी आणि एक शिंकाळं धरणारा अशी पाचच माणसं मसणात आली होती. दोघंही नवराबायको ताडकन् उठून चितेवर बसल्यावर त्यांचं काळीज चेंडूसारखं लटकन् उडालं आणि ‘तू तीन खा आणि मी दोन खातो’ हे शब्द ऐकू आल्यावर तर त्यांच्या काळजांनी ठावच सोडला! ते भयंकर भ्याले आणि जीव घेऊन धूम पळत सुटले! या प्रेताची भुतं झाली आणि ती आता आपल्याला गट्ट करणार, या कल्पनेनं पाचही जण धुमाट पळाले. इतके की, त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तोंडाला फेस आला.
"इकडे नाना आणि काकू दोघंही शांतपणानं त्या लाकडाच्या ढिगावरून उतरून खाली आली. शिंकाळ्याचं जे मडकं होतं त्यातनं पाणी आणून त्यांनी नुकतीच पेटविलेली चिता विझवून टाकली.
"मडकं रिकामं झाल्यावर ते नानांच्या हातात तसंच राहिलं. ते बघून त्यांच्या डोक्यात एक विचार आला. मग ते काकूंना म्हणाले,
"“बरं झालं, एक भांडं मिळालं. तेवढंच सही! घेऊन जायचं का घरी?”
"पण काकूंचं तिकडे लक्षच नव्हतं. लाकडाच्या ढिगाकडे अधाशीपणानं बघता बघता भानावर येऊन त्या म्हणाल्या,
"“हो! न्यायला काही हरकत नाही. पण इतकी लाकडं फुकट मिळताहेत अनायासं. मी म्हणते, आपण मेलं तरी नाही का चालायचं?”"
*****
भोकरवाडी बंद
"बाबूने कंठशोष करीत ज्याला त्याला आपण काय ठरवले होते आणि काय झाले ते पुन्हा पुन्हा सांगितले. मग तोही घरी येऊन दमून-भागून उताणा पडला. खरे म्हणजे त्याच्या मनात किती सुंदर सुंदर कल्पना आल्या होत्या. गावातल्या लोकांचा एक मोर्चा, आरडाओरडा, घोषणा, शेवटी एक भाषण... पण लोकांना त्याचे काही नव्हते. ते कसलेही सहकार्य द्यायला तयार नव्हते. ‘बंद’चा अर्थच त्यांना कळत नव्हता. वर्तमानपत्रात आपल्या गावाचे नाव छापून येण्याची एक चांगली संधी या अडाणी लोकांनी वाया घालविली होती. काही इलाज नाही. लोक अडाणी असले म्हणजे असेच होणार!"
*****