..... अनेकदा तर असे वाटते, की, सुनिताबाईंशी अशा तऱ्हेचा पत्रव्यवहार होता म्हणूनच जी. एं. च्या वाङ्मयविचारांची आणि जीवनचिंतनाची श्रीमंती आपल्याला न्याहाळता आली. एरवी सात दरवाज्यांमागे स्वतःला बंद करून घेणाऱ्या कलावंतांचे असे तालेवार लेखन अशा विश्रब्धपणेघडते ना. याची जाणीव असल्यामुळेच सुनीताबाईंनी जी. एं. ना लिहिण्यासाठी नाना निमित्ते दिली. त्यांच्यापुढे नाना प्रश्न ठेवले. जीवनाच्या अंधाऱ्या बाजूविषयी विलक्षण कुतूहल असणारे जी. ए. त्या प्रश्नांनी निर्माण केलेल्या अंधारात कसे उतरतात, हे त्या उत्कंठेने आणि आनंदाने पाहत गेल्या....
मुळात त दोघांचे मैत्र हे दोन समृद्ध आणि समानशील अशा प्रौढ स्त्री-पुरुषांमधले निर्माणक मैत्र होते. पहिल्याच पत्रात दोघांनाही परस्परांच्या स्वतंत्र व्यक्तित्वांची जाणीव झाली होती.... जी. ए. हे एक अत्यंत प्रतिभाशाली आणि अनवट जातीचे कलावंत असल्याचे सुनीताबाईंना माहिती होतेच पण सुनीताबाई याही केवळ पु. लं.च्या पत्नी नव्हत्या. सकस आणि समृद्ध वाचन असणाऱ्या, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणार्या.... त्याचबरोबर स्नेह देण्याची, लोभ करण्याची अपरंपार ताकदही त्यांच्या ठायी होती... तसा लोभ करण्याची उर्मी मनात दाबून ठेवून, विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. एं. च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव केला...