तारुण्यात मोकळं व्हायला जागा नसते. असते ती सळसळ, अस्वस्थता, अस्थिरता. आयुष्यात असे क्षण कधी ना कधी येतात जेव्हा आपल्याला स्वतःविषयी प्रश्नं पडतात. मी कोण आहे? मी कशाला आलोय या जगात? मी का ही नोकरी करतोय? मला काय मिळणार आहे यातून? मी कशासाठी जगतोय? अचानक आपलीच लोकं अनोळखी वाटायला लागतात. सभोवताली वाटते ती फक्त एक अगम्य, अपरिमित पोकळी.
अशाच टप्प्यावर ही कादंबरी खेळवते. स्थैर्याच्या शोधात धडपडणारा नायक आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देणाऱ्या वातावरणात वावरताना होणारी घुसमट जी नात्यांना जोडणारा पूल अरुंद करत दरी वाढवते अशा 'आनंद'ची गोष्ट. आपण नेमकं काय करतोय, काय करायला हवंय, सभोवताली जी पोकळी जाणवते त्याचं काय, ती कशी भरायची, अशा अनेक प्रश्नांनी पछाडलेला. त्याचे प्रश्नही असे की अगदी आपलेच आहेत असं वाटावं. कादंबरीचं कथानक पुढे सरकतं तसं त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. खरंतर ही गोष्टच त्याच्या या शोधाची, स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःकडे, जगाकडे पाहण्याची. 'मी आहे, हे जग आहे' हे समजून घेण्यापासून दोघांमधला परस्परसंबंध शोधण्याच्या प्रयत्नाचीही ही कथा. कधी आपण 'आनंद' होऊन या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू लागतो ते आपल्याला समजतही नाही.
अशाच प्रश्नांनी पछाडलेला आणि शहरी जीवनाला कंटाळलेला आनंद येऊन पोहोचतो सोंडूर या गावात. स्थैर्याच्या प्रयोगातील नवीन सेटअप म्हणजे सोंडूर. तिथल्या कौशल्य विकास केंद्रावर आनंद कामाला लागतो आणि तिथेच राहतो.
गाव आवडण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे त्याच्या खोलीतल्या खिडकीतून दिसणारा अन त्याच्या चंचल मनाला, तारुण्याला खुणावणारा गवत्या. गवत्या - नावावरून कोणी जवळच्या मित्राला हाक मारल्यासारखं. अचल, अविचल जो सगळ्या जगाला वाहू देतोय. एक संततधारे समान स्वतः मात्र पिढ्यानपिढ्या निश्चल आहे. बदलत्या वातावरणाप्रमाणे रूपं बदलतो, सगळ्या जगाशी एकरूप, संवादी मात्र तरीही स्थिर, स्तब्ध.
सोंडूर मध्ये आल्यावर आपल्याला भेटतात आनंद चे एक से बढ कर एक सवंगडी. समाजशेवक बाजीराव उर्फ बाज्या, हस्तानंदाचार्य प्रभाकर, जालिंदर, अर्जुन, उस्मान, मेहेर ही धमाल मित्रमंडळी तर गुरुजी, धुंडीमाळ, घारपुरे आणि पंडितरावांसारखी अफाट व्यक्तिमत्त्व असणारी गुरू लोकं. यातील गुरुजी आनंदला आयुष्याकडे, नात्यांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देतात. संपूर्ण कथा आनंद आणि गवत्या भोवती फिरताना मन मात्र गुरुजींभोवतीच पिंगा घालतं. 'फक्त असणं महत्वाचं' हे गुरुजींचं वाक्य खूप काही शिकवून जातं. आनंद त्याच्या सोंडूर मधील आयुष्यात प्रत्येकाकडून काही ना काही शिकवण घेतोच, मग ते मित्रमंडळी असू देत की गवत्या.
आनंदचं वास्तव्य जसजसं पुढे सरकतं तसतसं आपल्याला देवघर, देवघरातली ठाकर मंडळी, कोकणकडा, गहिण्याची गुहा, डोह, माईक, तुंगीबाई ही मंडळी भेटत जातात आणि नकळतपणे आपण पण त्यांच्याशी जोडले जाऊ लागतो. त्याच्या वास्तव्या दरम्यान आंनदला अमेरिकेतुन नोकरीची एक मोठी संधी चालून येते.
वास्तव्याच्या शेवटी आनंद तुंगीबाई वर जातो जी गवत्यापेक्षाही उंच आहे. आनंद जसं तुंगीबाई च्या टोकावर चढून एक नवीन उंची गाठतो, तसंच तो आयुष्यातसुद्धा नवनवीन उंची गाठत जातो. त्याचं सोंडूर मधील वास्तव्य संपुष्टात येत असताना त्याचा स्वतःचा शोध संपतो आणि आपला स्वतःला जाणून घेण्याचा सुरू.