शरलॉक होम्सची ओळख एकोणिसाव्या शतकाची अखेर जवळ आलेली आहे अशा वेळी चला जाऊ या त्या जुन्या लंडन शहरात. जगातलं ते पहिल्या क्रमाकांचं गजबजलेलं शहर. वेळ सायंकाळची. पण एवढ्यातच तिथे शुकशुकाट दिसतो आहे. धुक्याच्या दाट आवरणात ही महानगरी गुरफटलेली आहे. रस्त्यातल्या गॅसच्या बत्त्या म्हणजे अवकाशातले मंद प्रकाशाचे पुंज वाटताहेत. टाप् - टाप् - टाप् - - - त्या निर्जीव शांततेचा भंग करीत एक चौचाकी बग्गी येऊन एका इमारतीपुढे उभी राहते. गाडीवानाच्या चाबकाची बारीक छडी अवकाश भेदायला निघालेल्या एखाद्या रॉकेट रेषेसारखी ताठ उभी आहे. गाडीच्या कंदिलाचा क्षीण प्रकाश असं दाखवतो की गाडीवान खाली उतरला असून त्याने बग्गीचं दार उघडलं आहे. आतून बाहेर पडत आहे काळोखात ओळखू न येणारा पण राजनैतिक जगात ज