“ Dear friends, do you really want to read and understand Vapurza, then open it to any page, start reading. Do not ever consider to finish reading it in one sitting, from start to end. Never. “
पुस्तकाचं ‘Description’ जरी वरीलप्रमाणे दिलं असेल, आणि यात असं जरी सांगितलं असेल, की एकाच बैठकीत हे पुस्तक वाचू नये, तरीही कसं वाचावं हा निर्णय तुमचाच असू द्या. मी अगदी एका बैठकीत वाचलं नाही. पण सलग वाचलं, कदाचित त्यामुळे असेल, पण यातील काही गोष्टी मला खटकल्या. ललित लेख असल्यानं एकच विचार/कथा, यात नाही हे मान्य; पण एका भागात एखादी गोष्ट/ विचार पूर्ण असावी/असावा ही माझी अपेक्षा अपुरी ठरली. म्हणजे बहुतांश विचार उताऱ्यांमध्ये(paragraphs) आहेत; असं असताना विषयबदल करण्यात घाई दिसते. तसेच या विषयांची मांडणी व्यवस्थित वाटत नाही.
उदा.
“
तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही. ते गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमणं याला महत्त्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय.
पार्टी चालू असतानाच बेल वाजली. पूर्वसूचना न देता कुणीही येणं हाही एक आयुष्यातला अविभाज्य प्रसंग. पण तरीही येणाऱ्या माणसात दोन प्रकार असतात. पहिल्या मैफलीची रंगत वाढवणारे आणि पहिली मैफिल उधळणारे. दार उघडावं हे लागतंच.
”
वरील उताऱ्यांमध्ये परस्परसंबंध नाही. त्यामुळे त्यांचा मेळ लागत नाही; असं बऱ्याच ठिकाणी होतं.
वपुंच्या इतर पुस्तकांमधील काही सुविचार, वाक्य, प्रसंग, उदाहरणं म्हणून या पुस्तकात आहेत. ठळक अक्षरांमध्ये दिलेल्या वाक्यांचं विवेचन काही ठिकाणी मागेपुढे आहे, तर काही ठिकाणी विवेचन नाहीच. ( मांडणी! ) ( मी Kindle आवृत्ती वाचली. Kindle आवृत्तीच फक्त अशी आहे की कागदी आवृत्तीही अशीच, कुणास ठाऊक! ) एकाच विचाराची अनेकदा पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे तेचतेच वाचल्याचं जाणवतं.
यातील काही विचार पटत नाहीत.
उदा.
“
काही काही शब्द एकटे असले की गोड वाटतात. पण तसे दोन किंवा जास्त गोड शब्द एकत्र आले की त्यातली गोडी खतम!
म्हणजे कसं?
बायको याने मिसेस हे शब्द गोड आहेत.
‘दोस्त’ हा शब्दही ‘मस्त’ आहे.
पण ‘बायकोचा दोस्त’ हे दोन शब्द एकत्र कसे वाटतात?
‘बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते, म्हणूनच क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते.’
“
या दोन विचारांमध्ये दुटप्पीपणा वाटतो. म्हणजे एकीकडे “बायकोचा दोस्त” ऐकायला गोड वाटत नाही(?), तर दुसरीकडे “नवऱ्याची मैत्रिण” याबद्दल वरीलप्रमाणे बोलणे टाळले तर आहेच, उलट मैत्रिणीत बायकोपेक्षा क्षमाशीलता जास्त असते हे पटवून देण्याचा प्रयत्न दिसतो😒.
वरील ( आणि इतरही ) काही त्रुटी वगळल्यास वपुंच्या इतर पुस्तकांमधील वाक्यांचा एकत्रित संग्रह असलेलं वपुर्झा एकदा वाचण्यास हरकत नाही.🙂