What do you think?
Rate this book


Paperback
First published January 1, 2018
अंतार्यात्रा म्हणजे स्वतः ला ओळखण्यासाठी स्वतः सोबत केलेला प्रवास आहे असं मला वाटतं..
साथीदारांना हात देत, कधी त्यांचा हात घेत चालत राहणे, आणि सोबतीने, रेंगाळणाऱ्या आपल्या मनाला ही पुढे रेटणे. असंख्य प्रश्नांच्या ओझ्याखली दबलेल्या स्वतः ला, निसर्गाच्या रुपाकडे आकर्षित करत राहणे. कधी पक्षी - पाखरं ह्यांच्या गुंजनात ओळखीचे स्वर शोधणे तर कधी उंच वृक्षांच्या सावलीत खोडाला टेकून त्याच्यासोबत मुक संवाद साधणे ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याला स्वत्वाच्या चौकटीतून बाहेर काढतो. अशा वातावरणात मनात प्रश्न येतो की शहरात आपल्या कुटुंबासोबत शांतपणे बसून चार शब्द बोलणे - ऐकणे कधी आपल्याला जमते का?
अंतार्यात्रा म्हणजे आपल्या विचारांशी आपल्या मनाचा संवाद असावा बहुदा..
खेड्यापाड्यातील, मनुष्य दर्शन दुर्मिळ असलेल्या निर्जन वस्त्यांमधून चालत असताना, जेव्हा एखाद्या झोपडीत आपले आदरातिथ्य होत असते, तेव्हा स्वतः मध्ये असलेले शहरी सामर्थ्य कुठेतरी आपल्या संवेदनशील मनावर एक चपराक देते. हळहळ, करुणा, दुःख सगळ्या भावनांचा उद्वेग होतो आणि मन हेलावून जाते. ही परिस्थिती बदलायला आपण काही करू शकत नाही ही जाणीव महा वेदनादायी असते. हा सगळा कल्लोळ मनात चालू असताना त्या मानवांच्या चेहऱ्यावर कुठेही अपेक्षा किंवा कमतरतेची रेष दिसत नसते. मग आपले स्वतः शी चाललेले युद्ध नक्की कोणाचे आणि कोणासाठी असते?
अंतार्यात्रा म्हणजे आलेल्या परिस्थितीचा उहापोह न करता स्वतः ला अंतर्मुख करणे आहे असं मला वाटतं..
त्या एवढ्याश्या खुराड्यात, कोपऱ्यातल्या चुलीवर शिजवलेल्या भाताचे दोन घास पोटात गेल्यावर, आपल्या जीवलागांपेक्षा अधिक मायेने विचारपूस करणाऱ्या त्या कुटुंबासोबत आपल्या गप्पांचा ओघ सुरू होतो. त्यांची दुःख ती लोकं रोज रात्री अंगावर रजई सारखी पांघरतात. पूर्वेच्या सूर्य आणि दररोजच्या जेवणाचा प्रश्न हे त्यांना सकाळी या उबदार रजईतून बाहेर काढतात. दोन वेळ पोटभर अन्न आणि कायम डोक्यावर छत असलेलं आपलं शहरी व्यक्तित्व कधीतरी ह्या रजई मधून बाहेर पडतं का?
अशावेळी जाणवतं की फक्त मनाचा गाभारा मोठा असून चालत नाही; त्याची कवाडं पण तेवढीच भव्य असावी लागतात. तसं झालं तर एक छोटंसं झोपडीवजा घर आणि हातभर अंगणात पण राजमहाला इतकं सुख मिळतं! सुखा इतकचं मानसिक समाधान महत्त्वाचं असतं. मी कुठेतरी वाचलंय की सुख हे मानण्यावर असतं. थोडक्यात सुख शोधलेल्या ह्या मंडळींच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित कायम रेंगाळते ह्याचा प्रत्यय येतो. आपल्या मनाला ही सुखाची व्याख्या समजवण्याकरिता आपण मात्र आयुष्यभर अंतार्यात्रा करीत राहतो हे निश्चित.