तुका म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या अनेक कथा, अभंग, महात्म्य वगैरे आपण ऐकलेले असते, पण ही कथा (किंवा कथन) विलक्षणच. तुकाच्या लहान भावाच्या तोंडून या पुस्तकात ही कथा येते.
आपल्या दादाविषयी अतोनात माया, प्रेम, आदर आणि त्याच वेळी प्रपंचाविषयी आसक्ती, बायकामुले, घरदार याविषयी आत्मीयता या दोन्हीमध्ये अडकलेला भाऊ कान्हा ही गोष्ट आपल्याला सांगतो. तुका नाहीसा झाल्यावर होणारी जीवाची तगमग, तो सापडावा यासाठी केलेले अतोनात प्रयत्न, पण त्याच वेळी त्याच्या 'वैराग्यामुळे' त्यांच्या कौटुंबिक जीवनात सतत आलेली वादळं, सांसारिक अडचणी वगैरेंचा उहापोह या कथेत फार सुंदर प्रकारे आढळतो.
तरलेले अभंग, पुष्पक विमान वगैरे चमत्कृतीच्या नादी फारसं न लागता लेखकाने अश्या घटनांचा शांतपणे आणि अलिप्तपणे उल्लेख करून कथेचा गाभा जपला आहे. निव्वळ ७४ पानांचं हे पुस्तक नक्कीच वाचनीय.