ही गोष्ट आहे जपानमधील चिमुरड्या सादाकोची. दुसर्या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर पहिला अॅणटमबॉम्ब टाकला, तेव्हा ती केवळ दोन वर्षांची होती. नऊ वर्षांनी सादाकोला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला. विनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलं आणि या गोड, गुणी, चुणचुणीत हसर्या सादाकोची मृत्यूशी झुंज सुरू झाली. चिझुको तिची वर्गातली मैत्रीण. सादाकोला भेटायला दवाखान्यात येते. एक सोनेरी कागद दाखवत सांगते, ‘‘आजारी व्यक्तीनं जर एक हजार कागदी बगळे तयार केले, तर देव त्याची इच्छा पूर्ण करतो, त्याला निरोगी बनवतो.’’ आणि सादाकोची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उसळून येते. हसतमुखाने एक-एक कागदी बगळा बनविताना कॅन्सरशी चिवट झुंज सुरू राहते.