नामदेव माळी यांची छावणी ही कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. ग्रामीण संस्कृतीच्या उदात्तीकरणाची भ्रामक भूमिका ही कादंबरी घेत नाही, त्याऐवजी या कादंबरीमधून ग्रामीण जीवनाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी धारणेतून लिहिली गेलेली असली तरी हा वास्तववाद सराधोपट वाटत नाही. त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची इच्छा आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांच्या भावविश्वाचे प्रत्ययकारक दर्शन छावणीमधून घडते. हे प्राण्यांचे जग आणि त्याच्या भोवतालचे माणसांचे जग नामदेव माळी एकमेकांच्या शेजारी ठेवतात. ही दोन जगे आपापल्या जागी स्थिर राहत नाहीत. ती एकमेकांमध्ये घुसू लागतात, एकमेकांवर मात करू लागतात, एकमेकांवर भाष्य करू लागतात. या भाष्यांमधून ग्रामीण जीवनाचे नवे व चिकित्सक भान छावणीमधून व्यक्त होऊ लागते. - हरिश्चंद्र थोरात