आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत! पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच. या आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली.
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.
डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.
Must read book, for anyone who reads Marathi. The book explores different topics related to life science and human biology. This book has wealth of information, which can be used for delving deeper into a topic, or just for small snippets of facts
अनेक गोष्टींबद्दल आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची साध्या सोप्या शब्दात उत्तरं देणारं हे पुस्तक. फंगस, बॅक्टेरिया, मधमाश्या, पक्षीसृष्टी, कीटक, इथपासून मानवी जीवाचा जन्म, रक्त ते अगदी कॅन्सर पर्यंत अनेक विषय सहज सोपे करून मांडतात अवचट. प्रत्येकाला कधी न कधी पडलेले.. पण कधी अर्ध्या माहितीवर समाधान मानत, कधी योग्य उत्तरं न मिळाल्यानं तर कधी वेळेअभावी उत्तरं न शोधताच सोडलेले हे प्रश्न आणि अरेच्या हे तर आपल्या कधी लक्षातच आलं नाही की असं वाटायला लावणारी उत्तरं .. खरं तर लहानांसाठी पण मोठ्यांनीही वाचता वाचता हरवून आणि हरखून जावी अशी ...
निसर्गातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी डॉ. अनिल अवचट यांनी अगदी मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत. प्रस्तावनेपासूनच हे पुस्तक वाचकांची पकड घेतं, ते शेवटपर्यंत सोडत नाही. प्रत्येक मराठी वाचकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. ५/५