“माणसाचा मृत्यू ही खरे तर किती सरळ साधी गोष्ट आहे! पण माणसाला ते मान्य नाही. निसर्गाने जे काही गमावले आहे ते सगळे त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात परत मिळते. पण मृत्यू सुंदर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे एक अपघात म्हणून न पाहता एक सृष्टी नियम म्हणून पाहातो तेव्हा तो जन्माइतकाच सर्वसाधारण असतो. मृत्यूत विशेष असे काही नाही. माणसे इथोपियात मरतात, माणसे इंग्लंडमधे मरतात आणि विस्कॉनसिनमधेही मरतात. आणि शेवटी या जीवसृष्टीत अमरत्वाचा मक्ता घेऊन कोण मागे उरले आहे? या वर्षी दिसते ते गवत आणि दिसणार्या वनस्पती या काय मागच्या वर्षातील आहेत का? निसर्गातील गवताचे प्रत्येक पाते, फांदीवरील प्रत्येक पान हे ऋतूबदलात आनंदाने धारातिर्थी पडते आणि तेवढ्याच आनंदाने परत फुटते. ऋतुचक्रातील चार महिन्याची ती करामत असते. मृत वाळलेली झाडे, सुकलेले गवत व वनस्पती या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग नाहीत का? आहेत ! शिशिरातील रंग बदललेली मनाला भुरळ पाडणारी झाडे शेवटी मृतवत होणार्या पानांच्या रंगामुळेच प्रेक्षणीय आहेत ना?
खरे तर ते दृष्य म्हणजे नोव्हेंबरच्या वार्याने निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारलेल्या वेदनाच असतात की ! तरी पण आपण त्याचा आनंद लुटतो.”
हेन्री डेव्हिड थोरो - त्याच्या जर्नलमधे.
" वॉल्डन व हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र. '' या पुस्तकातून.