अनिल अवचट गेली चाळीसहून अधिक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर लिहीत आहेत. आज लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अवचट मुळात पिंडाने पत्रकार. त्या भूमिकेतूनच ते पंतप्रधान इंदिरा गांधींपासून चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसणारं जग त्यातल्या कंगोर्यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही. अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामाजिक अंतर्प्रवाहांना आवाज देणारा हा दस्तावेज.
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.
डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.
One more good book by writer Anil Awachat. Though the reports in this book are quite old from 1970s , still the form of writing and interesting topics make it quite readable.