Jump to ratings and reviews
Rate this book

Sone Aani Mati: Short Stories By Gadima

Rate this book
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.

109 pages, Kindle Edition

Published January 13, 2019

16 people are currently reading
9 people want to read

About the author

Gajanan Digambar Madgulkar

25 books22 followers
Gajānan Digambar Mādgulkar was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951 and Padma Shri in 1969.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
19 (48%)
4 stars
12 (30%)
3 stars
6 (15%)
2 stars
2 (5%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
2,142 reviews28 followers
February 3, 2022
१. सोने आणि माती

संस्था जास्तीत जास्त तीन हजार रुपये द्यायला तयार होती. तेवढे पैसे मुलीच्या लग्नालाच पुरण्यासारखे नव्हते. एकवीस तोळे सोन्याचा प्रश्न तर मुळीच सुटण्यासारखा नव्हता. बी. ए. ला बसणारी मास्तरांची उपवर मुलगी हे ऐकून धसमसून रडली. मास्तरही रडले. करणार कायॽ नाइलाजच होता.

"परतण्यापूर्वी गुळवणी मास्तर सहज इतिहास संशोधक मंडळात गेले. दसरथाला सापडलेले नाणे त्यांच्या खिशातच होते. त्यांनी ते एका संशोधकाच्या हाती दिले. त्यांनी ते न्याहाळल्यासारखे केले. एकाएकी ते आनंदले. मोठ्या खुशीत येऊन ते मास्तरांना म्हणाले,

"‘अहो, हे सोन्याचं नाणं असावं. रोमन असावं बहुतेक...’ ते सूक्ष्मदर्शक यंत्र शोधू लागले. ते कुठे सापडेना. मास्तरांचे डोकेच चक्करल्यासारखे झाले. मग त्यांनी प्रश्न विचारले नाहीत. त्या नाण्याचे नाव विचारले नाही. त्याचा काळ विचारला नाही, एका गरीब वधूपित्याने त्यांच्यातील संशोधकाला जणू दूर ढकलले. ते मुक्यानेच ओरडले, ‘एकवीस तोळे सोने.’"

२. वासना

" ... मी व्यासपीठावर आणि ती प्रेक्षकागारात. एवढ्या गर्दीत तिचे आणि माझे डोळे एकमेकांना भेटले."

३. शेवटचा शब्द

"त्याघराण्यातली सारीच मंडळी सुंदर होती. कायस्थ जातीला सौंदर्याचे वरदान असते हे तर खरेच; पण सर्व घरच सुंदर माणसांनी भरलेले हे जरा आलौकिकच म्हटले पाहिजे. आमचा गाव तालुक्याचा, लहानसा पण टुमदार. गावाच्या मधोमध एक लहानशी नदी वाहत गेलेली. त्या नदीचे नाव वैजयंती.

"वैजयंती नदीच्या पैलतीरावर अगदी नदीकाठीच चिटणिसांचा भला मोठा वाडा होता. जुना पेशवाई पद्धतीचा, चौकोनी. आतल्या सुखसोयी मात्र अगदी आधुनिक म्हणाव्या अशा. सभोवती सुंदर बगीचा. हा गावच्या गाव पूर्वी कधीतरी चिटणिसांना इनाम होता. आता इतिहासच उरला होता. तशी चिटणीस मंडळी सुस्थितीत होती; पण अगदी श्रीमंती ऊतू जाते आहे असा प्रकार नव्हता. निदान श्रीमंतीचे प्रदर्शन व्हावे अशी वागणूक त्यांची नव्हती."

"सारीच चिटणीस मंडळी अत्यंत धार्मिक असल्याचे साऱ्या गावाला ठाऊक होते. दानतीविषयीही त्यांची प्रख्याती होती. त्यांच्याविषयी गावात आदर होता. वैजयंती नदीवरील घाट व शंकराचे मंदिर चिटणिसांच्या पूर्वजांनी बांधलेले होते. आताही त्यांच्या वाड्यात नेहमी काही ना काही धार्मिक कृत्ये चालूच असत. ... "

"दुसरे दिवशी तर ती सारी दुष्ट वार्ता वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. जातीय दंगलीशी मनुदादाचा काही संबंध नव्हता. कुणी माथेफिरूने त्याला अकारण भोसकलं होतं. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. वडिलांची भेट होईतो तो जिवंत होता. वडिलांशी तो बोलू शकला नाही; पण भेट मात्र झाली. मी आतिशय अस्वस्थ झालो. माझ्या घरातली सारी माणसेही त्या वार्तेने दु:खी झाली. कुण्या वृत्तपत्राने मनुदादाचे छायाचित्र प्रकाशित केलं होतं. हेमा, भाऊसाहेब आणि मनोहर सर्वांच्या मुद्रा सारख्या. तेच धारदार नाक, तसेच नाजूक ओठ, तोच गोरापान रंग, तीच उंच सडपातळ देहयष्टी."

"स्वत: हेमाला मी हवा होतो. भाऊसाहेबांनाही सोयरीक मान्य होती. वैनीसाहेबांचा तर आग्रहच होता; पण काकीसाहेबांनी निकराचा नकार दिला. त्यांना हा मिश्रविवाह वाटत होता. काळाबरोबर बदलण्याची त्यांची मुळीच सिद्धता नव्हती. हेमाच्या आईने तिला हे पत्रात कळविले होते. तिचा उत्साह पार मावळला.

"मनुदादाच्या मृत्यूच्या वार्तेने व्याकुळली नव्हती इतकी त्या वार्तेने हेमा व्याकूळ झाली. यावर उपाय नव्हता. मुळीच नव्हता. चिटणिसांचे घरच वेगळ्या प्रकारचे होते. काकीसाहेबांचे म्हणणे हा त्या घरालेखी शेवटचा शब्द होता. माझ्या आकांक्षांचे तर आभाळच फाटले. आईवडिलांना मुळीच न कळविता मग मी वेड्यासारखा सैन्यात दाखल झालो. आघाडीवर निघून गेलो. हेमाला विसरू शकलो नाही; पण मी तिला कधी लिहिले नाही. कधी लिहिले नाही.

"भुवयांच्या कमानीखालून बऱ्यावाईट घटनांचे कित्येक पूर वाहून गेले. शरीरावर असंख्य जखमा झाल्या. मृत्यूचे महादरवाजे पहायला मिळाले. जपान्यांच्या कैदेत सापडलो. आझाद सैन्यात सामील झालो. धड हातापायानिशी परत देशात आलो. देश स्वतंत्र झाला, तेव्हा देशात माझे कुणी राहिले नव्हते. मी एकटा होतो. पराभूत."

४. गुरुचरित्राचा ग्रंथ

" ... समोरच्या फळांच्या दुकानाशी एक तरुण जोडपे फळे खरेदी करीत होते. ते अमेरिकन असेल वा आणखी दुसऱ्या कुठल्या देशाचे असेल. ते पाश्चिमात्य होते हे निश्चित. जोडपे होते की भाऊबहीण, मित्रमैत्रीण होती- ती एकमेकांची कोण होती, कुणास ठाऊक; इतक्या भयंकर उन्हात ती दोघेजण अनवाणी होती. त्यातल्या तरुणाने डोक्याची चकोटी केली होती. कपाळी नाम लावला होता. गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. ती तरुण मुलगीही पांढरीशुभ्र साडी-चोळी ल्यायलेली होती. गळ्यात तिने कुठल्या तरी देवाचा टाक अडकवला होता. तिचा नाभीभाग सताड उघडा होता. पदर सावरण्यासाठी असतो हे तिला माहीतच नव्हते. त्यांच्या त्या ध्यानांचे स्वत:शीच आश्चर्य करीत मी पुढे चाललो. ‘फार्मर्स’ ची पाटी दिसली. तोंडाला कोरड पडली होती. नुसते पाणी कोण देणारॽ थंडगार लस्सी घ्यावी म्हणून त्या ‘फार्मर्स’ च्या दुकानात शिरलो. त्या दुधाच्या दुकानात भर दुपारी मुद्दाम थोडा अंधार केला होता. वातावरण थंडगार राखलेले होते. तापत्या शरीराला ते सुखद वाटले. थोडा वेळ नीटसे दिसले नाही. दिसले तेव्हा जाणवले की त्या दुकानातली एकही खुर्ची रिकामी नाही. तिथेपण गर्दीचा लोंढा आहेच. गर्दी. गर्दी. गर्दीच गर्दी!

"सेवा करणारी पोरे मुक्याने हालचाल करीत होती. लस्सीचे, दुधाचे पेले, दह्याचे वाडगे गिऱ्हाइकांसमोरच्या मेजावर ठेवीत उचलीत होती. समोरासमोर बसलेली माणसे गप्पा मारीत होती. पेल्यात टाकलेल्या कागदी नळ्यांनी पेयांचे स्वाद वर ओढीत होती. तृप्त होत होती."

"पावसाळा आला. माथेरान आणि मुंबई यांचे नात तुटले. पत्रव्यवहारही वेळच्या वेळी होईनासा झाला. मी माथेरानमध्येच होतो.

"तिथला भयानक पाऊस मला कळला नाही. उन्हाळी पाहुणे परतल्याचे माझ्या ध्यानी आले नाही. बायकोमुलांचे स्मरण झाले नाही. पारीखशेठजींचीदेखील आठवण राहिली नाही.

"पावसाळा संपला आणि मग माझ्या लक्षात आले की, भगवान सदानंदस्वामींचे कपोलकल्पित चरित्र मी लिहून संपवले आहे. आखीव कागदावर लिहिणे मला आवडत नाही. फुलस्केप पांढऱ्याशुभ्र कागदाची साडेसातशे पृष्ठे झाली. मी प्रचंड ग्रंथ लिहून तयार केला.

"‘सदानंदस्वामी’ या एका आभिधानाखेरीज बाकीची आभिधानदेखील खोटी, कल्पित. प्रसंग खोटे, घटना खोट्या. आदिपासून अंतापर्यंत नव्याण्णव टक्के सारा शब्दप्रपंच खोटा."

"दिडकीला महाग होतो मी. आता लक्षाधीश आहे. सदानंदस्वामींचा कुणीही अनुयायी माझ्यासमोर आला तर गुडघे टेकतो. स्वामींना करीत असे तसाच नमस्कार करतो. मला तो स्वीकारणे भाग पडते.

"मी अनेकदा सांगून पाहिले : ‘मी लिहिलेलं सदानंदचरित्र खोटं आहे. कल्पित आहे.’

"माझे म्हणणे कुणी ऐकत नाही. हसतात आणि पावलांना स्पर्श करतात. ईश्वरसाक्ष, ते सारे लिखाण कल्पित होते. खोटे होते. खोटे आहे. त्याचे खोटेपण मला सिद्ध करता येणार नाही. कारण सदानंदस्वामी आता या जगात नाही. त्यांच्यावाचून त्यांचे चरित्र कुणालाच माहीत नाही. कुणालाच माहीत नाही.

"कधी कधी मलाही वाटते की, तो ग्रंथ आपण केवळ लिहिला. तो लिहवला गेला असला पाहिजे.

"कुणाकडूनॽ

"कुणास ठाऊक !"

५. जोडी

"अक्षर युसूफचंच होतं. त्यानं ते पत्र सीमाला लिहिलं होतं.

"‘सीमाराणी,’

"सलमाची पत्र तूच लिहीत होतीस हे मी सुरुवातीलाच ओळखलं. ती सुंदर आहे. तू बुद्धिमान आहेस. चतुर आहेस. पुरुषाला वाटतं, आपल्या प्रेयसीला या दोन्हींचीही देणगी असावी. तू आणि सलमा एकच आहात.

"आमच्या जमातीत दोन विवाहांना प्रतिबंध नाही. सलमाची लेखी संमती मिळवणं सोपं आहे. मला तुझ्यासारखी काव्यात्म भाषा लिहिता येत नाही. तुम्ही दोघी माझ्या जीवनात आला तर.... जन्नत आणि स्वर्ग दोन्ही माझ्या हाती येतील...’"

६. सावलीचा कावळा

"बारा तास विनवणी करूनही कावळा शिवत नव्हता. आईचे अंत:करण पिळवटले. पोटात खाई पडली. तोंडाला कोरड पडली.

"म्हातारीने हात जोडले. तिच्या अधू मनाला वाटले, जाधव बोलला ती गोष्ट खरी असेल. तिने थरथरत हात जोडले. तिच्यासारख्या स्त्रीने देऊ नये असे वचन तिने मुलाच्या आत्म्याला दिले :

"‘सतीश, तुझ्या बायकोला कुमारिका समजून तिचं लग्न करून देईन मी.’

तिला मूर्च्छा आल्यासारखी झाली. जमलेल्या गावकऱ्यातील चार आयबाया धावल्या. त्यांनी तिला आवरले. ती आणखी काहीतरी बोलत होती. सांगत होती.

"म्हातारीचे शब्द कुणाला ऐकू गेले नाहीत; पण काळ्या तिन्ही सांजेच्या वेळी देवाघरचे विमान आल्यासारखा एक कावळा झेपावत आला. त्याने पिंडावर झडप मारली. म्हातारीला ते दिसले. तीन वर्षे झाली त्या गोष्टीला. जाधव पुन्हा आला नाही; पण त्याची पत्रे येत असतात. सुरेखाचे जाधवशी लग्न झाले तर-

"बाळचे काय ! आणि मी...ॽ"

७. चिराग कहाँ : रोशनी कहाँ

"‘कवळी हरवलीॽ’

"‘मग काय तरॽ एकदा जिल्ह्याच्या गावी जाऊन नवीन बसवून आला होता.’

"‘ती पुन्हा हरवलीॽ’

"‘हरवणारच.’

"‘म्हणजेॽ’- मी हातातली फिल्मची पट्टी, कात्री बाजूला ठेवली.

"‘बाबासाहेब, हा पंचावन्न वर्षांचा घोडा. ती तरणीबांड पोर. हा तिच्याशी चाळे करीत होता पाहिलेच आपण ! बायको फार हुशार आहे त्याची. तिनेच ही युक्ती काढली- कवळी दडवून ठेवण्याची. तिची खात्रीच- हा बोतरा आहे हे कळल्यावर कोण प्रेम करील याच्याशीॽ त्या दिवशीदेखील त्यांनीच लपवली होती कवळी. नवी आणली तरी त्या पुन: लपविणार.’

"‘कशावरूनॽ’

"‘त्यांनी स्वत:च सांगितले मला.’

"‘त्यांच्यांकडेही गेला होतास नाही का तूॽ’

"गुरुदत्त गप्प बसला. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मी परत कामाला लागलो आहे असं दिसताच हलक्या आवाजात त्याने विचारले,

"‘मग काय सांगू तिलाॽ’

"‘सांग, ते काही जमण्यासारखं नाही म्हणून.’"

"आमचा भोसले मुलखाचा अबोल माणूस. तो परवा अंगात आल्यासारखे हातवारे करीत आपल्या ऑफिसात आला आणि म्हणाला, ‘बाबासाहेब, यह देखो चिराग कहाँ, और रोशनी कहाँॽ’ बोलता बोलता त्याने माझ्या टेबलावर एक भले मोठे पाकीट हुकुमाचा पत्ता आपटावा, तसं आपटले.

"‘आँ ॽ’ म्हणत मी ते पाकिट उघडले. आत एक निमंत्रणपत्रिका होती. ती म्हणत होती :

"‘कुलस्वामिनीच्या कृपेने आमचे ज्येष्ठ चिरंजीव निवृत्तीनाथ तथा गुरुदत्त यांचा विवाह कु. जयमाला जोशी नागाव यांच्याशी निश्चित केला आहे...’"

८. भोगदा

"गेले दोन-तीन तास आम्ही तो अवाढव्य प्रकल्प पाहत होतो. कुठल्याही व्याख्यात्याच्या बोलण्याकडे कधीच दिले नसेल इतके लक्ष आता त्या आभियंत्याच्या प्रत्येक वाक्याकडे देत होतो. अभूतपूर्व म्हणाव्या अशा कित्येक गोष्टी त्याच्या बोलण्यात येत होत्या. ‘भगीरथ, हा भारतातला पहिला आभियंता. त्याने गंगेचा प्रवाह वळवला. गंगेच्या पाण्याइतके विशुद्ध पाणी जगाच्या पाठीवर कुठेही नाही. प्राचीन भारतीयांना धरणे बांधणे, नद्यांतून उपप्रवाह काढून ते कृषी कार्यासाठी उपयोगात आणणे या विद्या ज्ञात होत्या.’

"या त्याच्या सुस्पष्ट आणि ठाशीव उद्गारांनी आमची आस्मिता सुखावली होती...."

"‘सारेच बोगदे खोदताना वरून गळणाऱ्या पाण्याचा असा त्रास होतो काॽ’ कुणीतरी इंजिनिअर साहेबांना विचारले.

"‘नाही.’

"‘मग इथंच का होतोॽ'

"’दोन कारणे आहेत. एक, इथं पर्जन्यमान आधिक. दुसरं, हे विवर ज्या पर्वतात आपण खोदलं आहे, तो द्रोणाकृती आहे. त्याच्या पाठीवर पाणी साठते.’ नीट समजले नाही; पण पुन्हा प्रश्न विचारणे आमच्यापैकी कुणालाच प्रशस्त वाटले नाही. अज्ञानाच्या प्रदर्शनाला सीमा हवीच."

"रात्री येणारी ती दोन माणसे दुसऱ्या दिवशी सकाळी आली. माझा नाश्ता चालला होता, नोकराने आत येऊन सांगितले, ‘बाहेर कुणीतरी आले आहे.’ मी बाहेर आलो. तीच ती दोन माणसे. त्यांना पाहताच मला जाणवले, या दोन माणसांना देता येण्यासारखे काम माझ्याकडे नाही. आमच्या कुणा ठेकेदाराकडेही ते असणे अशक्य, ती दोन माणसे दोन वयाची होती. एक सत्तरीला आलेला म्हातारा आणि त्याची सहा वर्षांची नात."

मुलगी तर फार लहान होती. आल्यापासून ती गुडघे उभे करून बसली होती. खाण्याची आबाळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती, तिची मुद्राच किंचित सुजरी दिसत होती.

"मी म्हणालो, ‘बाबा तुमची व्यवस्था करतो.’

"‘काम द्या आमाला. भिकेची भाकर नको; तो अनुभव घेतलाय.’ या दोघांना काय काम द्यावेॽ एक शून्य आणि एकदशांश चिन्ह हे टाकायचे कुठेॽ मला काही केल्याने ते गणित सुटेना.

"‘काल रात्री जेवला कुठेॽ’ मी पुन्हा ओरडून त्या म्हाताऱ्याला विचारले. माझे बोलणे आपल्याला मुळीच ऐकू न आल्यासारखे करून तो म्हातारा म्हणाला,

"‘आमाला काम द्या.’"

"‘शेती करालॽ’

"त्याने मान डोलावली.

"‘मी बिघाभर जमीन देतो तुम्हाला.’ माझ्या या बोलण्यासरशी ती मुक्यासारखी गप्प बसलेली मुलगीदेखील चटकन् उभी राहिली. ती दोघेही कुळवंत शेतकरी कुळातली होती, हे उघड होते.

"ती त्यांना बिघाभर जमीन भाडेपट्ट्याने दिली. वर्षभरात त्या दोन वृद्ध आणि दोन कोवळ्या हातांनी ती जमीन बोलती केली. नाथबा सखाराम तसा देशावरला शेतकरी; पण त्या कोकणी जमिनीचा पोत त्याच्या अनुभवी डोळ्यांना बरोबर कळला. त्या तांबड्या रंगाच्या पट्टीत त्याने आंब्याची कलमे लावली. नारळाची रोपे लावली. ती रुजवली. भाताचे पीक घेतले. खंडाची रक्कम सरकारात भरली. आपले पोट भागवले. वेळू झावळ्या जमवून एकान्तशी झोपडी उभारली. म्हातारा आनंदात होता. मुलगी पाडसासारखी बागडू लागली होती...’"

"सर्वत्र उगवलेल्या गवतावर निळीपिवळी चिटुकली फुलं दिसत होती. आम्हाला चालत चालत थोडे पुढे जावे लागले. पुढे एक भला मोठा खड्डा होता. त्याला चारी बाजूने काटेरी कुंपण होते. खडक आणि खोली याशिवाय पाहण्यासारखे काही नव्हते. आजूबाजूला कसल्या तरी शेड्स होत्या. काही धिप्पाड अवजारे होती. खडक फोडीतून निघालेल्या दगडाचे अजस्र ढीग पडलेले होते. भिजकी झाडे निथळत होती. पिकली शेते सुकत होती.

"‘हे काय आहेॽ’ मीच विचारले.

"‘नियतीची करणी.’ इंजिनिअर कडवटपणे म्हणाले.

"‘म्हणजेॽ’ आत डोकावत मी विचारले.

"‘इथून बोगदाच जात होता, गेलाही आहे...’"

"आम्ही डोकावून पाहिले. चौकांतल्या दोन बाजूंना बोगद्याची विवरे दिसत होती. आमच्या साऱ्यांच्या नजरा आणि कान इंजिनिअरसाहेबांकडे लागले होते. ते म्हणाले, ‘‘हा खड्डा आहे एवढा मोठ्ठा. इथे शेती होती. बोगदा त्या शेतीखालून जात होता. या पावसाळ्याच्या आरंभीच आभाळाने पाण्याचे समुद्र सह्याद्रीच्या माथ्यावर पालथे केले. खाली पोकळी असल्यामुळे इथली जमीन खचली आणि एका अपरात्री - हा जमिनीचा एवढा मोठा भाग खाली गेला. आम्हा सर्वांना कानठळ्या बसल्यासारख्या झाल्या. साऱ्यांचे डोळे विस्फारीतच राहिले.’

"आणि- इंजिनिअरसाहेब मध्येच थांबले. नंतर म्हणाले, ‘त्या नाथबा सखारामाची झोपडी इथेच होती. त्यांची ती नात इथेच होती. इथं इथंच त्याने कष्टाने वाढवलेले ते शिवार होते... हे दगडाचे ढिगारे वर काढताना त्यांची छिन्न-विछिन्न शरीरं बाहेर काढली गेली. बस्स !’ त्यांनी खोल श्वास सोडला. त्या हकीगतीने विषण्ण झालेले माझे मन म्हणाले, ‘बोगद्याची दोन खोदकामे मिळावी तेथे मिळाली नाहीत. माणसाचे प्रयत्न आणि नियतीची करणी यांची गाठ पडली नाही. ती दोन भुयारे राहिली. जमिनीखालच्या दोन अदृश्य पोकळ्या. हा बोगदा नव्हे!’"

९. अनुत्तरित

"इंदुबाईचा बाळ्या अकारण मरणाच्या दारात फेकला गेला होता. तो तिचा एकुलता एक मुलगा होता. गरीब घरे उभी असतात मुलाबाळांच्या आशेवर- ती आशा एका क्षणात मातीला मिळाली होती, इंदुबाईला धीर देण्यासाठीही माझ्या तोंडातून शब्द उमटला नाही."

१०. या कानापासून त्या कानापर्यंत

"त्यागावचे नावच हनुमंत हिवरे. गाव अगदी लहान. शे-दीडशे उंबरा असेल नसेल. लोकसंख्याही पाच-साडेपाचशे. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती. हनुमंत हिवऱ्याचा हरभरा आणि देशी शेंगदाणा साऱ्या जिल्ह्यात प्रसिद्ध. गावाभोवतीचे शिवार बहुतेक जिराईत. नांदत्या विहिरींची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढीच."

"गावाच्या उत्तर टोकाला एक लहानशी टेकडी होती. तीवर हनुमंताचे एक जागृत देवस्थान होते. या हनुमंताच्या टेकडीवर अनेक औषधी वनस्पती आपोआप उगवत होत्या. दूरदूरची वैद्यमंडळी त्या औषधींच्या लाभासाठी हिवऱ्याच्या हनुमंताच्या दर्शनाला येत असत. चैत्री पौर्णिमेला तर फारच मोठी यात्रा भरत असे."

"या गावात कुठल्याही रोगाची साथ कधी आली नव्हती. अठरा साली आलेल्या तापसरीतदेखील या गावातले कुत्रेही दगावलेले नव्हते. पूर्वी गाठीतापाची साथ वारंवार येत असे. हिवऱ्याच्या शिवेत जहाल रोगानेही कधी प्रवेश केला नव्हता. सरकारी गॅझिटीअरने या घटनेची नोंद केली होती.

"टेकडीवरचा हनुमंत हाच गावाचा राखणदार आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा होती. कसलाही दुष्काळ पडला तरी, हिवरे संकटात येत नव्हते. त्या गावावर हनुमंताची कृपा होती. विज्ञानयुगाच्या ऐन उत्कर्षकालीही हनुमंत हिवरे श्रद्धेच्या मांडीवर मान ठेवून, सुखाने नांदत होते.

"साऱ्या गावात मांसमच्छर खाणारा, दारू पिणारा एकही माणूस नव्हता. लबाडी, चोरी, चहाडी, शिंदळकी असली पापे करायला कुणी धजावत नव्हते. कुणी चुकून असे केले तर त्याची झोप उडे. तो आपणहूनच जाऊन टेकडीवरच्या हनुमंतापुढे पालथा पडे. स्वत:ला शिक्षा करून घेई.

"शिक्षणाच्या किंवा कामधंद्याच्या निमित्तानं हिवऱ्यातील काही माणसे पुण्यामुंबईसारख्या शहरांकडे जात. नाही असे नाही; पण गाव बरा की आपण बरे, अशीच सर्वांची वृत्ती. गाव खाऊनपिऊन सुखी. कुणी गडगंज श्रीमंत नाही. कुणी अगदी भिकारी नाही. गावात तंटाबखेडा नाही. दुफळ्या नाहीत. काही नाही."

"साऱ्या देशाबरोबरच याही गावातली पाटील-कुलकर्ण्यांची वतने गेली होती. देवस्थानव्यतिरिक्तची सारी इनामे नाहीशी झाली होती. बलुत्याची प्रथा मात्र गावाने अजून टाकलेली नव्हती. गावातील बाराही बलुती अजून पूर्वीच्याच पद्धतीने बिनबोभाट गावकऱ्यांची कामे करीत होती. अरेरावी वा आधिकार मात्र कुणीच कुणावर गाजवीत नव्हता. हनुमंताच्या कृपेने हिवऱ्यात खरोखरच रामराज्य होते.

"गावाच्या शिवारात व प्रत्यक्ष गावातही झाडांची, विशेषत: सीताफळीच्या झाडांची गर्दी होती. हरभऱ्या- शेंगदाण्याप्रमाणेच या सीताफळांचे पीकही महामूर होते. हरभरा, शेंगदाणा यांचा लोक व्यापार करीत; पण सीताफळ मात्र कुणी कुणाला विकू नये असा गावचा रिवाज होता. ही फळे केवळ प्रसाद म्हणून वाटली जात. अशा या गावात एका सकाळी एक चुकलेला वानर आला. तो टेकडीच्या बाजूने आला, असे त्याला पहिल्यांदा पाहिलेली मंडळी अहमहमिकेने सांगू लागली. हनुमंताच्याच वंशातील त्या अनाहूत पाहुण्याच्या आगमनाने सारे हिवरे आनंदित झाले. लहानापासून थोरांपर्यंत हिवऱ्यातील प्रत्येक गावकरी त्याला भक्तिभावाने हात जोडू लागला. त्यापूर्वी माकडवाल्यांनी खेळविण्यासाठी आणलेली माकडेच तेवढी येथे येऊन गेली होती. तो वानर आपल्या सत्काराचा स्वीकार आनंदाने करीत आहे, असे बघणाऱ्यांना जाणवू लागले. त्याला खायला-प्यायला तोटा नव्हताच. आश्विनाच्या आरंभीच तो ठरवून आल्यासारखा आलेला होता. सीताफळांची रेलचेल होती. त्याने त्यावर ताव मारला. एकदोन दिवसातच त्याला त्या एकाहार पद्धतीचा कंटाळा आला. मग गावातील एक एक प्रापंचिक त्याला नैवेद्य करू लागला. वाढलेले ताट त्याला दाखवून उंच जागी ठेवू लागला. तो ऐटीत खाली उतरून त्या ताटाचा फडशा पाडू लागला. ते दृश्य दुरून बघणाऱ्या गावकऱ्यांना धन्यता वाटू लागली.

"महिन्याभरातच तो वानर म्हणजे त्या गावचा एक प्रतिष्ठित रहिवासी झाल्यासारखा झाला. कोणत्या वेळी तो कोठे असेल त्या जागा लोकांना निश्चित सांगता येऊ लागल्या. त्याची बसण्याची ठिकाणे निश्चित झाल्यासारखी झाली. लहान मुलांच्या घोळक्यात उतरून तो खेळू लागला. पंचायतीची सभा चालू असता खुशाल एखादी खुर्ची अडवून बसू लागला. तो आल्याआल्याच पंचांनी गावात दवंडी फिरवली होती की, ‘गावात एक वानर आलेला आहे. त्याला कोणी कसलीही तसदी देऊ नये हो ऽऽ’

"हिवऱ्यात आलेल्या या मनुष्यजातीच्या पूर्वजांविषयीच्या वार्ता वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. त्याला पाहण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्याचे छायाचित्र मात्र हिवऱ्याच्या पंचांनी कुणाला घेऊ दिले नाही."

"आता काय करावेॽ असा प्रश्न साऱ्या नगरीपुढेच पडला. गेल्या सहा महिन्यांत अत्यंत लोकप्रिय झालेला देव, अलीकडे चारदोन दिवसात आतिशय निंदास्पद झाला.

"मुलीबाळींनी तर त्याचा धसकाच घेतला.

"यात्रा जवळ आली होती. त्या निमित्ताने शेकडो स्त्रिया येणार होत्या. देवाने त्यांनाही छळले तर यात्राच बंद पडेल. हिवऱ्याचे नाव कायमचे बदनाम होईल. काय करावेॽ

"दगडाच्या मारुतीच्या साक्षीने गावातली शंभर तोंडे या जित्या मारुतीच्या कर्तुकीची शहानिशा करू लागली."

"अर्जुनाच्या अंदाजाप्रमाणे तो वानर खाली उतरला. अर्जुनाची धोकटी त्याने उघडली. आरसा, साबणाचा कप, ब्रश, वस्तरा या साऱ्या वस्तू नेमक्या बाहेर काढल्या. बराच वेळ तो आरशात बघत बसला. आपल्या माथ्यावरच वस्तरा चालविण्याचा चाळा त्याने केला नाही की स्वत:च्या तोंडाला साबणाचा फेस फासून घेण्याचा उद्योगही केला नाही.

"त्याने नेमका वस्तरा उघडला. अर्जुनाइतक्याच सफाईने ते वस्तऱ्याचे पाते दहावीस वेळा उजव्या तळहातावर भरवेगाने फटाफट उलटेपालटे फिरवले. अर्जुनासारखाच पात्याला ओझरता स्पर्श करून, धार किती लागली आहे याचा अंदाज घेतला.

"अपेक्षित आहे ते आता नेमके घडणार म्हणून अर्जुना आणि सारी पंचमंडळी डोळ्यांत प्राण आणून पाहू लागली. एक क्षण गेला. दोन क्षण गेले. तीन क्षण गेले. चार क्षण गेले. पाचव्या क्षणी खिडकीशी रेललेली सारी उतरंड ढासळली. अर्जुना मटकन खाली बसला.

"त्या वानराने अर्जुनासारखेच हातातल्या वस्तऱ्याचे पाते उलटे केले आणि तो निरुपद्रवी वस्तरा आपल्याच गळ्यावरून या कानापासून त्या कानापर्यंत फिरविला. सरपंचाचे डोके बिथरले. त्यांनी खाडकन् दार उघडले. अंगणात सापडेल तो धोंडा घेऊन ते त्या वानरावर भिरकावणार तो वर वानर पसार झाला. दूर सीताफळीच्या बनातून त्याचा आवाज आला, ‘हुप्प, हुप्प, हुप्प.’

:अर्जुना आडवा पडला. जणू काही त्याचाच गळा या कानापासून त्या कानापर्यंत कापला गेला होता."

११. मन हे ओढाळ गुरू

"मुकुंद पाठक माझाच विद्यार्थी होता. एका श्रीमंत सराफाचा एकुलता एक मुलगा.

"तगडा, सुरेख. ती आणि तो ही उत्तम जोडी होती. कुणीही या संबंधाला होकारच दिला असता.

"‘मैत्रिणी तर म्हणतात की- आम्हाला तुझा हेवा वाटतो.’ हेवा वाटावा अशीच निवड होती ती. मी कसल्या तरी विचारात पडलो. स्वार्थाने माझ्या विवेकाच्या तोंडावर आडवा हात ठेवला. मी गप्पच होतो. ती म्हणाली,

"‘तो अमेरिकेला जाणार आहे. लग्न करून जायचं आहे त्याला.’

"सुषमा जाणार. माझ्या वर्गात ती असणार नाही. माझ्या अंतर्मनातल्या कुठल्या वृत्ती बळावल्या कोण जाणे. शिक्षकाच्या भूमिकेला मुळीच शोभणार नाही असा सल्ला मी तिला दिला.

"मी म्हणालो, ‘मिस् साठे, लग्न ही फार वैयक्तिक बाब आहे. तुम्ही विश्वासाने विचारायला आला म्हणून सांगतो. असं सांगणं अन्यायाचं आहे. तुम्ही ���ोघेही माझे विद्यार्थी आहात.’ ....
28 reviews
November 18, 2024
गदिमा यांचे हे पुस्तक वाचून मन प्रफुल्लीत झाले. मी ह्या साहित्याचा अस्वाद मनसोक्त लुटला. काही गद्य वाचताना अश्रुधारांचा उद्वेग झाला.



Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.