भट्ट यांनी विविध पुस्तकांतून गुजरातच्या निरनिराळ्या भागांचं, तिथल्या-तिथल्या समाजजीवनाचं अत्यंत प्रगल्भ दर्शन घडवलेलं आहे. तत्त्वमसि, अकूपार या कथा अनुक्रमे नर्मदा खोरं आणि गीर अभयारण्याच्या परिसरात घडतात तर सागरतीरीमध्ये भट्ट आपल्याला सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर नेतात. त्यांच्या या कादंबरींमध्ये काही समान दुवे आहेत. 'सागरतीरी'तही कथानायकाचं नाव शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. या निनावीपणामुळे ती कथा प्रथमपुरूषातूनच वाचली जाते आणि vicariously ती कथा आपण आपोआपच जगतो. संपन्न अनुभव म्हणजे काय याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. ती कथा तुमची, माझी प्रत्येक वाचणाऱ्याचीच होऊन जाते.
भट्टांच्या इतर कथांप्रमाणेच 'सागरतीरी'तही निसर्गाप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यातल्या समस्त जैवविविधतेसह आनंदानं एकत्र जगणाऱ्या, साध्या पण उदात्त, रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या गरीब पण सुखासमाधानाच्या बाबतीत अतिशय संपन्न राहणीमान असलेल्या लोकांच्या आयुष्याचे फार जवळून आणि सुंदर दर्शन त्यांनी घडवलं आहे.
अकूपारची सांसाई, तत्त्वमसिची सुप्रिया आणि सागरतीरीची अवल. मुक्त-निर्बंध, खंबीर, स्वाभिमानी, निःस्वार्थी आणि स्पष्ट विचारांची नायिका हेही भट्ट यांच्या कादंबरींचं लक्षण. अवल अशीच आहे, पुस्तकी शिक्षण थोडंफारच झालेली पण व्यवहार, धर्म, भावना, नैतिकता या साऱ्या गोष्टींची तिला व्यवस्थित जाण आहे. तसं पाहायला गेलं तर जेमतेम सव्वाशे पानांच्या या कथेत अवल मोजक्याच वेळी आपल्याला भेटते पण त्यातही तिचं पात्र लेखकाने इतकं सुबक रेखाटलं आहे की हिला तर आपण नीटच ओळखतो असा भास होत राहतो. त्यांच्या इतर कथांप्रमाणेच 'सागरतीरी'तही नायक-नायिकेमध्ये असणारं एक अव्यक्त, गूढ, आदरणीय नातं दिसून येतं. म्हटलं तर ठसठशीतपणे जाणवणारं, नि काही प्रसंगात हळुवारपणे काळजाला हात घालणारं असं.
या नात्याचं वर्णन इतकं प्रभावशाली आहे की अवल नि नायकाचा शेवटचा संवाद संपताना, हा अवलचा कथेतला शेवटचा सहभाग आहे हे जाणवत असल्याने हुरहूर लावून जातो.
कथेची सुरुवात तिथल्या परिसराप्रमाणे थोडी रूक्ष (कथानायकाच्या त्यापरिसराप्रति सुरूवातीला असणाऱ्या भावनांमुळे कदाचित) भासते. पण जसजसे नायकाचे त्या परिसराशी, तिथल्या लोकांशी बंध जुळत जातात तसा वाचकही अलगद बांधला जातो. आणि हळूहळू चाललेली कथा शेवटच्या वादळाच्या प्रकरणात सुरेख वेग घेते आणि वाचकाला crescendo चा अनुभव होतो. आणि शेवटाला या वादळी अनुभवातून निसर्गाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या जाणिवांची आणि या सगळ्यांच्या एकसामायिक जगण्याची नायकाला पटलेली ओळख व त्यातून आपणही इथलेच होऊन गेल्याची त्याची भावना अशा समतोलानं कथेचा शेवट करत लेखकाने हा काहीसा Ascending storytelling (which has a rather scholarly name of 'Fichtean curve') परिणाम फार सुंदर साधला आहे. बाकी सबूरिया, सर्वण, किष्ना तांडेल, बेली, मुखिया, हादाभट्ट, बंगालीबाबा आणि मुख्य 'अनंतमहाराज' दर्या या लोभस पात्रांना भेटण्याकरता पुस्तक वाचा.
सागरतीरी
मूळ पुस्तक સમુદ્રાન્તિકે : ध्रुव भट्ट
मराठी अनुवाद: अंजनी नरवणे
जाता जाता:
ध्रुव भट्ट हे गुजराथी साहित्याचा शाश्वत, पथदर्शी ध्रुवतारा आहेत. त्यांची तत्त्वमसि, अकूपार, अतरापि आणि आता हे सागरतीरी ही सगळी मराठीत अनुवादित पुस्तके वाचल्यामुळे त्यांचं इतर साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा होते आहे. पण इतर पुस्तके तिमिरपंथी, कर्णलोक, अग्निकन्या इ. मराठीत अनुवादित सापडत नाहीत. कुणाला कल्पना असल्यास कळवावे. अन्यथा गुजराथीतच वाचावी लागतील.