‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु. ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु. ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणार्या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल तर सार्थक झाले समजेन. व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे ऊन पसरेल आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल.. त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते? - अनिल अवचट
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.
डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.
This book is about the de-addiction centre Muktangan started and run by dr.Anil Awachat and his wife Sunnanda who was psychiatrist. Good book for people who like to read about how an organisation developes and works. .. Some of the author's personal experiences are really very touching