निरंजन घाटे यांनी विज्ञानासह अनेक विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. गेली चार दशकं ते सातत्याने लिहीत आहेत. पण लेखक असण्यासोबतच ते गाढे वाचकही आहेत. पुस्तकांच्या गोतावळ्यात ते रमतात. पुस्तकांनी त्यांचं जगणं व्यापून टाकलेलं आहे. त्यांच्या वाचनाला विषयांच्या मर्यादा नाहीत. साहसकथांपासून विज्ञानकथांपर्यंत, लैंगिक साहित्यापासून परामानसशास्त्रातील विविध शाखांपर्यंत आणि चरित्र-आत्मचरित्रापासून शब्दकोशांपर्यंत एक ना अनेक प्रकारचं जागतिक वाङ्मय त्यांनी वाचून पालथं घातलं आहे. अफाट वाचन करणारी अशी माणसं विरळाच म्हणायची. त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्या पुस्तकांचे विषय, त्यांचे लेखक, पुस्तकं मिळवण्यासाठी केलेली धडपड हे सारंच अजब.
लेखक निरंजन घाटे हे विज्ञान लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. लेखकाने विविध विषयांवरची इतकी पुस्तके वाचली आहेत की प्रत्येक विषयावर ते पुस्तक लिहू शकतील. एखादा विषय घेऊन त्याचं किती खोलवर वाचन करता येऊ शकतं याचं उदाहरण निरंजन घाटे आहेत.