सगळ्याच गोष्टी दाद मागण्यासाठी सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. एकदा शुटींगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी जमा झाले होते. कुतुहल म्हणून त्यातला एक माणूस म्हणाला, “किती दिवस झाले राव वर बघून! आभाळाकडे बघणंच सुटलं होतं.” धक्का बसला ऐकून. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत काही ठिकाणी. आग ओकणारा सूर्य असतो खुपदा वर. तेंडूलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा पण खूप अवघड आहे. गावोगाव अशाच गोष्टी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी - अरविंद जगताप
अगदी नावाप्रमाणेच ! मोठा अर्थ असलेल्या लहान गोष्टी. अरविंद जगताप हे 'हवा येऊ द्या' मध्ये पत्र लिहून प्रसिद्ध झाले आहेतच, पण या पुस्तकातून त्यांनी कमाल केली आहे. जवळपास सर्व कथा ग्रामीण पार्शवभूमीच्या आहेत. सत्तेसाठी, पैशासाठी काहीही करू शकणारे लबाड लोक आणि त्यांच्यामुळे होरपळणारे सामान्यजन हे अनेक कथांचे सूत्र आहे. मात्र असे असूनही या कथा केवळ रडगाणे नाहीत. काही कथा वाचकांना हसायलाही लावतात. पाकिस्तानच यान, किस, भरवसा नाय, गायीचं काय करायचं ? या कथा तर नक्की वाचाव्या अशा आहेत. लेखनशैली इतकी उत्तम आहे की कथेतील पात्रांच्या भावना वाचकापर्यंत पोचतात. याबाबतीत जगताप यांचे वपु काळेंशी साम्य आहे. प्रत्येक मराठी वाचकाने नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.
मनाला हात घालणाऱ्या गावाकडच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी आपल्या वैशष्ट्यपूर्ण लेखन शैलीने आपल्यासमोर गाव उभा केला आहे. आपल्या मनातला गाव आणि सद्य स्थितीतील गाव यातला विरोधाभास खूप नेमक्या शब्दामध्ये मांडला आहे. प्रत्येक गोष्ट हलकी फुलकी असून ही गोष्टीचा शेवट आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो