2021 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथा संग्रह. एकूण 3 कथा या पुस्तकामध्ये आहेत.
पहिली कथा ही शीर्षक कथा आहे. कथेचा नायक "बाळू" दहावी पास होऊन पुढच्या शिक्षणासाठी शहरात चालला आहे. त्याच्या बरोबर त्याला सोडवण्यासाठी त्याचे आई वडील, छोटा भाऊ त्यांच्या जुन्या पत्र्याच्या ट्रंकसह कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापूर बस स्थानकापासून होस्टेल च्या रूम पर्यंतचा प्रवास म्हणजे ही कथा. बाळूची खेडूत मानसिकता आणि त्याला दिसणारे आक्राळ विक्राळ शहर ,शहरामधील लोकांकडून खेडूत म्हणुन मिळणारी वागणूक या सगळ्यांचा प्रत्यय या कथेतून येतो. खेड्यापाड्यातील अनेक मुलांना ही कथा त्यांचीच वाटेल .
दूसरी कथा आहे इंदुलकर या सरकारी नोकरी करणार्या आणि लेखक असणार्या गृहस्थांची. ही कथा इंदुलकरांच ऑफिस, घर आणि झोप अशा तीन भागात विभागली आहे. ही कथा तयार करण्याचे आणि एकमेकात गुंफण्याचे लेखकाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मराठी साहित्यात ही कथा मैलाचा दगड ठरू शकेल.
तिसरी कथा आहे: बाजार (The Market). गावच्या आठवडी बाजारावर बेतलेली ही कथा आहे. गावी भरणारा बाजार, त्यात भाज्या विकणारे आणि विकत घेणारे लोक, त्या लोकांचे वेगवेगळे आवाज यांचे हुबेहुब वर्णन लेखकाने केले आहे. या कथेमध्ये लेखकाने शेअर बाजाराचा देखील संबंध जोडला आहे.
निवेदन भाषा आणि शैली यांच्या एकरूपते मधून या कथा रेखीव शिल्पाचे रूप धारण करतात. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह!!