घातसूत्र -मराठी वाचकांसाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सूत्रबद्ध कादंबरी-सदृश्य अभ्यासू रिपोर्ताज
राजीव जोशी
मराठी साहित्य विश्वात नवनवे प्रयोग होत आहेत,हि एक स्वागतार्ह बाब आहे.कारण अनेक प्रकारच्या दृकश्राव्य आक्रमणातून मराठी साहित्य टिकवण्याचे काम अनेक लेखक करीत आहेत.एकीकडे कथा-कविता आणि कादंबरी ह्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पारंपारिक मार्ग आणि दुसरीकडे नवीन काही शोधण्याचा त्याद्वारे नवनवीन वाचकांना –विशेषतः युवावर्गाला आकर्षित करण्याचे काम अनेक लेखक करीत आहेत.ह्यात आता दीपक करंजीकर या नावाची भर पडलेली आहे.आजवर अर्थशास्त्र,व्यवस्थापन,प्रशिक्षण आणि लेखन करणाऱ्या चतुरस्त्र सृजनशील व्यक्तिमत्वाने विदेशातील अनेक वर्षाच्या वास्तव्यातील अनुभवातून,व्यासंगातून ‘घातसूत्र’ आकाराला आलेली आहे.नेमके ह्यात काय आहे?तुम्ही-आम्ही मराठी वाचकांनी किंवा समस्त भारतीयांनी का वाचावे? जगभरात किंवा बलाढ्य देशातील उलाढालींचा माझ्या दैनंदिन जीवनावर काय पगडा-परिणाम होणार?असे अनेक मुद्दे परखडपणे मांडत आपल्याला जागतिक व्यवस्थेची वास्तव ओळख करंजीकर ह्यांनी करून दिलेली आहे.
पार्श्वभूमी – करंजीकर ह्यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत वास्तव करत असताना ९/११ रोजी आलेल्या एक छोट्या अनुभवातून व अनेक वर्षांच्या निरीक्षणातून असे लिखाण करण्याची तीव्र प्रेरणा मिळाली.जगाला आणि खुद्द अमेरिकेला हादरवणाऱ्या बॉम्ब हल्यामागचे सूत्रधार आणि एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट मांडत अनेक अंतप्रवाहाचा वेध-पृथ:करण कधी तटस्थपणे माहिती,तर कधी विवेकबुद्धीला टोचणी आणि विषण्ण टिपण्णी अश्यारीतीने लिहिली गेलेली आहे.प्रस्तुत पुस्तकाला जेष्ठ पत्रकार कुमार केतकर ह्यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे.रूढ अर्थाने कादंबरी नसली तरी चित्तथरारक पद्धतीने मांडलेला अर्वाचीन इतिहास आहे.उदबोधन-प्रबोधन करणारा समकालीन शोधग्रंथ.[Research-Oriented]
पुस्तकाचे अंतरंग – आपण जेव्हा हे पुस्तक वाचायला सुरुवात करतो,तो तेव्हा दर्शनी दिसतो तेवीस प्रकरणांतून मांडलेला जागतिक घटनाक्रम,त्यामागचे सूत्रधार आणि एकूण संरचना.तब्बल १०४ वर्षांच्या कालखंडाचा वेध घेत असताना एखादी घटना हि सहज नसते,तर विशिष्ठ योजनाबद्ध हालचालींचा परिपाक असतो हे गृहीतक आपल्यासमोर मांडतात,तिथून आपला ऐतिहासिक-राजकीय-सामाजिक व सांस्कृतिक प्रवास सुरु होतो.आपल्याकडे येवून गेलेल्या सिनेमामुळे आपल्याला ‘टायटेनिक’ माहिती असते,पण तो एक अपघात आहे,कारस्थानाचा परिपाक आहे,हे अगदी पहिल्याच प्रकरणात नाट्यपूर्ण पद्धतीने लिहिलेले आहे.जी टायटेनिक म्हणून बुडाली,ती वास्तवात ऑलिम्पिक नावाची बोट होती.घरापाशी रिसिव्हिंग पोल उभारून वीज निर्मिती करू पाहणाऱ्या निकोला टेस्ला नावाचा संशोधक आणि तेव्हा वीजपुरवठा करणाऱ्या जे.पी.मॉर्गनसारखा कॉर्पोरेट-माफियाचा कट आपल्याला कळतो.
पुढे फेडरल रिझर्व्हचे वास्तव उलगडले जाते.अमेरिकेने एफिशिअन्सी म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण करायला हवे तरच जगावर मिळवता येईल सोने-चांदी या मौल्यवान धातुंपेक्षा अमेरिकन डॉलरसारख्या परकीय चलनावर तिसऱ्या जगाचे अर्थकारण असावे म्हणून केलेले डावपेच.[भारतानेदेखील एकदा सोने विकल्याचा संदर्भ] चीनने सोन्याऐवजी चांदीत खंडणी देण्याचे औद्धत्य दिसते.फेडरल रिझर्व्हचा कायदा घातक आहे आणि युद्धखोर सैन्यापेक्षा खाजगी बँकिंग संस्थांचा आपल्या स्वातंत्र्याला धोका आहे हे थॉमस जेफरसनचे विधान कळते.बुडीत कर्जाच्या प्रकरणात लिहिलेली लुईसची कथा रंजक व बोधक आहे,ती आजही तितकीच वास्तव आहे.तसेच पंच मासिकातील प्रश्नोत्तरे अभ्यासनीय.रॉथशिल्ड्स,रॉकफेलर आणि मॉर्गन हे कळीचे सूत्रधार आणि अमेरिकन सरकार हे ह्यांच्याहातातले बाहुले असल्याची २०१७ साली विकीलीक्सने दिलेली माहिती कळते.जगातील महासत्ता पोखरण्यासाठी तिथली मध्यवर्ती बँक ताब्यात घेण्याची खेळी,जगातले अनेक धार्मिक संघर्ष हे संपत्तीच्या सम्राटांनी पोसलेले असतात,आपल्याला मात्र वाटते कि धर्मावर कडवी निष्ठा असणारे धर्मासाठी भांडत आहेत –हे प्रखर सत्य दीपक करंजीकर दाखवून देतात.
जगातील महायुद्धाच्यामागे सत्ता,प्रदेश,संपत्तीपेक्षा अर्थकारण हे खरे कारण आहे हे अनेक उदाहरणांनी दाखवलेले आहे.ब्रिटिशांनी १८१२मध्ये वॉशिंग्टन डीसीवर हल्ला केला,१८१५ साली बँक ऑफ इंग्लंडवर ताबा घेणे ह्यामागे रॉथशिल्डस असणे,पुढे असंख्य देशांच्या बँका गिळंकृत करणे हे सर्व कळते.अनेक घटनांची लिंक लागते आणि अमेरिकेसारखा देश आर्थिक माफियांच्या हातचे बाहुले बनल्याचे विदारक चित्र उभे राहते.करंजीकर स्वतः अर्थतज्ज्ञ असल्याने युद्ध व अर्थशास्त्राची भीषण अभद्र युती उलगडवून दाखवली आहे.ह्यातली विदारकता जाणवते.आपल्या समाजाचा युद्धाकडे बघण्याच्या भाबड्या दृष्टिकोनाकडे आपले लक्ष वेधतात.युद्ध कंपन्यांनी नफा कमवावा पण ती खेळायला लावणाऱ्या खेळीयाना अधिक दोष देतात.नफ्यासाठी शस्त्र बनवण्याची वेळ आणली जाते,हेच दुर्दैवी आहे.हे सिद्ध करण्यासाठी अनेक विधाने व घटनांचे ‘जिगसॉ पझल’दाखवतात.अनेक ‘कोन्स्पीरसी थिअरीज’ काल्पनिक नाहीत हे कळते.हे वाचत असताना तेल –अमेरिकन डॉलर –युरोचा जन्म –क्रेडीट रेटिंगचे जाळे-ब्रिक्स देशांची बँक-ब्रेक्झीट- अश्या अनेक वैश्विक उलाढालींचा संदर्भ लागत जातो.
लेखन-शैलीची वैशिष्ठ्ये –करंजीकर ह्यांनी ८६० पानी ग्रंथ लिहिताना आपला ‘वाचक’ केंद्रस्थानी ठेवलेला आहे.म्हणून जड माहिती आणि अभ्यासूपणा दाखवणारी जंत्री न देता ते जणू आपल्यासमोर बसून वर्णन करीत आहेत अशी शैली वापरलेली आहे.अर्थव्यवस्था –महायुद्ध -आंतरराष्ट्रीय राजकारण-अर्थकारण अशा रुक्ष विषयांत ज्यांना शून्य इंटरेस्ट असला तरीदेखील कुतूहलाने वाचण्याइतके रंगतदार झालेले आहे.कधी कहाणी,तर दंतकथा,त्याकाळात काही घटनात सहभागी असलेल्या मान्यवरांच्या आत्मकथनातील दाखले,अगणित वेबसाईटस,असंख्य पुस्तके आपल्यासमोर ठेवतात.इतके छापील पुस्तक म्हणजे प्रत्यक्षात लिखित पाने किती झाली असतील?शोध-संदर्भ –पडताळणी-पुनर्रचना कशी केली असेल! किती काळवेळ ह्यात व्यस्त झाला असेल? आपण अंदाजही करू शकत नाही.आणि हे सर्व का –तर जे डोळसपणे पाहिले –अनुभवले ते आंतरिक तळमळीने,हे प्रकर्षाने जाणवते.
लेखक स्वतः नट असल्याने नाटक व अन्य माध्यमांशी संबंधित असल्याने डोळ्यासमोर चित्र निर्माण करणे,प्रखर शब्दांचा वापर करणे,प्रसंगी अचूक वाक्ये पेरणे [ आर्थिक भूगोलाचे सूत्रधार –बँक लुटण्यापेक्षा ती स्थापन करणे हा दरोड्याचा राजमार्ग आहे- प्रख्यात जर्मन कवी –नाटककार बरटोल्ट ब्रेख्त] अर्थतज्ञ म्हणून फेडरल रिझर्व्ह हे एक कार्टेल म्हणजे संगनमत ,जसे तेलाचे –साखरेचे असते तसे असणे आपल्याला समजावून सांगतात.
आपल्याकडे रिसर्च लेखन अभावानेच[ वसंत वसंत लिमये ह्यांची ‘लॉक-ग्रिफिनसारखी पुस्तके] हे त्यांनी कोणासाठी केले असेल?कि स्वत:साठी? ते हि अनंत व्यापात व्यग्र असताना! त्यांचे हे सांगणे खरेतर प्रत्येक सुशिक्षित वाचकाने वाचले पाहिजे.विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी मुद्दाम वाचून आपल्या भवतालाबाबतचे भान व जागरूकता जपली पाहिजे.सर्वच वाचकांच्या मनातील आजवर कुरवाळलेल्या देशप्रेम,युद्ध,कॉर्पोरेट-माफिया अशा असंख्य भाबड्या संकल्पना हे पुस्तक वाचल्यावर लख्ख होतील अ��ी अपेक्षा आहे.ग्रंथालीने आजवर आत्म-चरित्रांची नवी पायवाट निर्माण केली व अनवट पुस्तके आपल्याला दिलेली आहेत. बदलत्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर नव्या तरुण वाचकाला वैश्विक-भान देणाऱ्या अश्या साहित्य-कृती द्याव्यात.अशा पुस्तकाला कादंबरी म्हणावी, इतिहास-कथन अशा कोणत्याही लेबल्सपलीकडील पुस्तक जगाच्या पुढील वाटचालीकडे पाहण्याची विशाल दृष्टी देते हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे. समृद्ध बलाढ्य देश-त्यांचे राज्यकर्ते आणि त्यांना कळसूत्रीप्रमाणे वागवणाऱ्या घातक –विघातक सूत्रधारांची हि गाथा अनेकांनी वाचली पाहिजे,तरच आपण सजग होऊ आणि भारत महासत्ताक होण्याच्या वाटेवर असताना हे भान असणे जरुरीचे आहे.पुस्तकाचा सकारात्मक शेवट करताना त्यांनी जगातील सर्व अर्थव्यवस्था कचाट्यातून सुटतील व समग्र मानवजातीचा विचार जेव्हा निर्माण होईल तो सुदिन! असे म्हटलेले आहे.
आंतरराष्ट्रीय अभ्यासक व व्यासंगी पत्रकार कुमार केतकरांची प्रस्तावना,सतीश भावसार ह्यांचे दोन हातानी अवघा पृथ्वी-गोल घेरले असल्याचे प्रतीकात्मक मुखपृष्ठ वास्तव आहे आणि एकूणच पुस्तकाची निर्मिती-मूल्य [फोटो/चार्ट/आकडेवारी] उच्च दर्जाची आहेत.पदार्पणातच काही आवृत्ती संपण्याचा विक्रम या पुस्तकाने केलेला आहे, अजून आवृत्ती निघतीलच,पण हे ग्रंथरूप पुस्तक अन्य भारतीय भाषांमध्ये नेण्याचा जरूर विचार करावा कारण हि आंतरराष्ट्रीय परिस्थितीची जाणीव भारतीय वाचकांना असणे अगत्याचे आहे.